शिक्षकाची व्यथा
शिक्षकाची व्यथा
अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या कुटुंबात जन्म झाला. आई-वडील ऊसतोड मजूर कामगार. घराशेजारी शाळा असल्याने कसबस प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. माध्यमिक शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागायचं. जाण्यासाठी ना सायकल, ना बस साठी पैसे, ना पायात चप्पल तसेच अनवाणी चालत रोज शाळा गाठायची. घटक चाचणी , सहामाही किंवा वार्षिक परीक्षेची फी भरता यावी यासाठी गावातील किराणा दुकानात काम करण्याची वेळ यायची. कशी बशी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. आता वेध लागले कॉलेजचे. इंदापूर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला. आनंद झाला ! घरच्यांना वाटलं पोर पांग फेडेल. म्हणून त्यांनी व्याजाणी पैसे घेऊन शिक्षणासाठी पैसे देऊ लागले. मीही माझा खर्च भागावा म्हणून फोटोग्राफी च्या एक दुकानात काम करायला लागलो. थोडेफार पैसे मिळायचे त्याचा आनंद असायचाच पण त्याचबरोबर काहीतरी नवीन शिकायला मिळतंय याच समाधान असायचं. यामध्ये कॉलेज काम आणि घर यात दिवस जात जात अशीच दोन वर्षे काढली. चांगल्या मार्कने इयत्ता 12 वी पास झालो. पुढे B.Sc साठी प्रवेश घेतला.
आता पैशाची गरज जरा वाढू लागली त्या दरम्यान मला मेडिकल दुकानात काम करण्याची संधी मिळाली. पगारही चांगला मिळायचा. सकाळी 7 वाजता घर सोडायचे. सकाळी 7 ते 12 कॉलेज आणि नंतर 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत मेडिकल असा क्रम चालायचा. आयुष्याची महत्वाची 3 वर्षे हाल अपेष्टा आणि आनंद सहन करत पदवी उत्तीर्ण झालो. घरच्यांना आनंद झाला. आई तर सर्व बायकांना म्हणायची माझ्या दादाला कमीत कमी 20 हजाराची नोकरी नक्की लागेल. आनंदी असायची ! पुढे M.sc ला प्रवेश घेतला. पाहिले वर्ष जुन्या नियोजनाप्रमाणे गेले पण दुसऱ्या वर्षात कॉलेज मध्ये जास्त वेळ देने अनिवार्य होते त्यामुळं कॉलेज मध्ये जास्त वेळ जायचा या दरम्यान मला मेडिकल सोडावं लागलं. पुढे परीक्षा झाल्या आणि M.sc ही चांगल्या गुणांनी पास झालो. पास झालेल्या त्याच वर्षी रयत शिक्षण संस्थेत interview दिला आणि selection झालं. घरच्यांना वाटलं आता आपले चांगले दिवस आले. जॉब सुरू झाला रोज जायचो यायचो. पहिला पगार आला 6000. घरच्यांना वाटलं ठिकाय हळू हळू वाढेल. संपूर्ण दिवस कॉलेज मध्ये जायचा. दिवसांवर दिवस जात होते. दरम्यान मी B.Ed साठी एक्सटर्नल प्रवेश घेतला होता. जी सुरुवातीला पगार एक महिन्यात झाली त्याचा कालावधी वाढू लागला. 3 महिन्यांनी पगार होऊ लागला. चांगला in shirt करून यायचो. रुबाबदार दिसायचो पण यायला जायला पैसे नसायचे ही मोठी व्यथा होती. त्या 3 महिन्या दरम्यान मित्रांकडून उसने पैसे घ्यावे लागायचे, त्यातूनच घरखर्च ही चालायचा. पगार होयचा तेवढा उसने पैसे फेडण्यातच जायचा. आता तर पगार 3 महिन्या ऐवजी 6 महिन्यांवर गेला.
मध्यंतरी आलेले जरा चांगले दिवस ते अजून खराब झाले. आयुष्यात ज्या आई वडिलांना वाटायचं पांग फेडेल, सुखाचे दिवस आणेल त्याच्या उलट त्यांच्या हाल अपेष्टा होयला लागले. एवढे शिकू , काम करून आपण आई वडिलांना सुखी ठेवू शकत नाही याची दुःख अजूनही मनोमन आहे. शिक्षकांची कधी चांगली वेळ येईल हे कोणीही सांगू शकत नाही किंतु शिक्षकांच्या ह्या परिस्थिती विषयी कोणीही बोलण्यास तयार नाही. उलट जे शिक्षक कायम पदावर काम करतात ज्यांना 70 हजाराच्या आसपास पगार आहे अशा लोकांच्या काही समस्या असतील खूप मोठ्या प्रमाणात आवाज उठतो. मग आमच्या बद्दल का नाही हा खूप मोठा प्रश्न पडतो. आम्ही विद्यार्थी घडवतो , आमचे विद्यार्थी चांगल्या पडवरती जातात . बक्कळ पगार मिळवतात पण त्यांना शिकवणाऱ्या आमच्या सारख्या शिक्षक वर्गाचा कोण विचार करणार ? प्रश्न पडतो आमचा विचार करणारे कोण आहे की नाही ? रोज उसने पैसे घेऊन कॉलेज पर्यंत किती दिवस यावे लागणार ? हे सर्व झाले वैयक्तिक ! पण आमच्या घरच्यांचं काय ? त्यांचं स्वप्न काय तरी फक्त सुख मिळावं ? मग त्यांचं स्वप्न चुकीचं आहे का ? का त्यांनी स्वप्न पाहू नये ? असंख्य प्रश्न आणि असंख्य अडचणी आहेत त्या आता जास्त मांडत नाही कारण मला माहित आहे आपल्या ह्या दुःखावर फक्त हसणारे आहेत भावनिक होणारे कुणीही नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो.
