शीर्षक- रुसतो पाऊस जेव्हा
शीर्षक- रुसतो पाऊस जेव्हा
झाली व्याकूळ अवनी चहुकडे रणरण
असा भीषण दुष्काळ कुणी गाठतो सरण
तप्त तप्त चोहीकडे.. नाही पाण्याचा टिपूस
कधी मिळणार पाणी, याची सर्वांनाच आस
पड धो-धो रे पावसा करू नकोस कंटाळा
तुझ्यासाठी माझा प्राण आता कंठाशीच आला
घन ओथंबून आले, झाले ढगाळ आकाश
सावळाच कृष्ण भासे, मना होतसे आभास
थंडगार सुटे वारा, मना वाटतो आल्हाद
कडाडून गर्जे मेघ, फुटे पावसाचा बांध
वृक्षवल्ली तरारल्या, आली पानांना लकाकी
नभांगणी विद्युल्लता प्रकाशली एकाएकी
बळीराजा सुखावला, लागे शेतीच्या कामाला
सवे घराची धनीण जाऊ लागे पेरणीला
आला प्रेमभरे पूर, पाणी गढूळसे झाले
उंच पर्वतावरून झरा धबाबा आदळे
नवनवेली युवती भूमी साज शृंगारली
प्रिय सागरा भेटाया वेगे सरिता निघाली
प्राणी-पक्षी निवांतले,गेले खूप आनंदून
ऐकू येते दूर रानी धुंद बासरीची धून
अशा रम्य सांजवेळी पक्षी येती घराकडे
परसात प्राजक्ताचा सडा सुवासिक पडे
निज येता पहुडले, पुन्हा रुसला पाऊस
वृक्षतोड करण्याचा मानवाला का हो ध्यास?
दचकून आली जाग,आक्रंदला मेघराजा
"लावा हजारोंनी वृक्ष, पुन्हा पाहिजे का सजा? "
घ्या रे सर्वांनी शपथ नको जमिनीची धूप
पर्यावरण रक्षण्या झाडे लाऊ खूप खूप
