शब्दप्रेमी
शब्दप्रेमी
शब्द नि शब्द जोडून जेव्हा ओळ होते,
ओळींनी होतो उतारा,,
त्या उताऱ्यांनी बनतात धडे,
आणि त्या धड्यांनी जन्मते पुस्तक..
आता पुस्तकाची ओळख व्हावी,
त्याला नाव द्यावे ह्यासाठी
परत त्या एका शब्दाचीच गरज,,,
म्हणून वाटते
आता व्हावे मी शब्दप्रेमी…
चित्रपट पाहते, त्यातले डायलॉग ऐकते,
आणि मग गप्पांमध्ये मी सहजच म्हणते,,
"सस्ते चिजों का शौक
हम भी नहीं रखते"
गाण्याच्या सुरांपेक्षा,
जवळचे वाटतात त्यातले बोल,
हे शब्दच जे भेटतात आपल्याशी रोज...
म्हणून वाटते
आता व्हावे मी शब्दप्रेमी...
पुस्तकं वाचते,
स्वतःशी भेट घडत राहते,,
शब्दांची किमया, त्यांची जादू
अजून फार काही माहित नाही,
पण ते माझ्याशी बोलतात,
माझे सोबती होतात,
माझी प्रेरणा बनतात,
म्हणून वाटते
आता मी व्हावे शब्दप्रेमी…
अव्यक्त माझ्या मनाला व्यक्त केलंय त्यांनी,
मनाच्या डायरीत माझ्या घर केलंय त्यांनी,
भुलताना, हसताना ते माझे सोबती,
अश्रूंनाही सावरणारे तेच
शब्द माझे...
म्हणून वाटते
आता व्हावे मी शब्दप्रेमी…
