रिमझिम पाऊसधारा..
रिमझिम पाऊसधारा..
धरणीवर या साऱ्या,वाहे मंजुळ वारा..
आल्या हो आल्या रिमझिम पाऊसधारा..|| धृ ||
हिरवळ सजली डोंगरमाथी,
किलबिल पाखरांचं मंजुळ गान..
सजले माणिक सृष्टीवरती,
आहे सौंदर्याची खाण..||
पारिजातकांचा भव्य सडा,
रम्य पहाटे शिंपडला..
सुगंध अंतरी साठवुनी,
रंग सोहळा अनुभवला..||
भरा हो भरा, रंगपुष्पांनी ओंजळ भरा..
आल्या हो आल्या, रिमझिम पाऊसधारा..||१||
मेघातून पडले अलवार,
टपोरे मोती पाण्याचे..
सजले वेलींच्या पानावर,
घेता रूप दवबिंदूचे..||
शोभे डोईवरती,
इंद्रधनू ते सप्तरंगी..
शाल जणू पांघरली,
सृष्टीने रंगीबेरंगी..||
चिंब न्हाऊनी सजली हो, सजली वसुंधरा..
आल्या हो आल्या, रिमझिम पाऊसधारा..||२||
सृष्टीवर या मेघ बरसता,
मोर आनंदात नाचे खास..
तृष्णा शमावी सर्वांची,
लागे मना एकच आस..||
तहानलेल्या रानावर,
होता वर्षाव पावसाचा..
हसू उमटले चेहऱ्यावर,
दिवस हा बळीराजाचा..||
पाहुनी घ्या हो, बळीराजाचा आनंद सारा..
आल्या हो आल्या रिमझिम पाऊसधारा..||३||
रूप देखणं हे सृष्टीचं,
मृदगंध पावसाचा..
करून देई ओळख आम्हा,
आकाश-धरणीच्या नात्याचा..||
काय वर्णावी आता,
निसर्गसौंदर्याची किमया..
मिळते त्याच्या मिठीत जाता,
निरपेक्ष प्रेमाची छाया..||
जाणुनी घ्या हो, निसर्गाचा संदेश खरा..
आल्या हो आल्या,रिमझिम पाऊसधारा..
आल्या हो आल्या,रिमझिम पाऊसधारा..||४||
