पैठणी
पैठणी
तुला रोज मन मारून जगताना पाहिले ....
डोळ्यातले पाणी लपवून जोर जोरात हसताना पाहिले ,
तुला कधी साडी साठी हट्ट करताना नाही पाहिले ,
आई अग तुला पैठणीत बघायचेच राहिले........
बाबांचा अपुरा पगार तुला खूप वाटत होता
जुन्या पेटीतल्या चिल्लर चा डबा हळूच साठत होता
नोटांना पण धाग्याने बांधून ठेवल्यास गाठी
आई अग आयुष्यभर जशी जपून ठेवलिस नाती
स्वतः साठी कधी तुला जगताना नाही पाहिले
आई अग तुला पैठणीत बघायचेच राहिले.............
चार खोल्यांचे ते घर, तुला वाटत होता महाल
भिंती वराचा रंग जरी झाला होता गहाळ
बंगल्या साठी कधी हट्ट करताना नाही पाहीले
आई अग तुला पैठणीत बघायचेच राहिले ..........
घराकडे जाणारा तो अरुंद रस्ता
पायपीट करीत त्यावर काढीत होतीस खस्ता
गाडीने जाऊ असा कधी म्हणताना नाही पाहीले
आई अग तुला पैठणीत बघायचेच राहीले.........
एवढ्याशा झरोक्यातून दिसणारे ते जग
बघत होतीस सुखाने....
खिडकीतून दिसणारी चक्की, भट्टी आणि दुकाने
ताजमहाल दाखवा असा हट्ट करताना नाही पाहीले
आई अग तुला पैठणीत बघायचेच राहीले...........
स्वयंपाकाची पण तुला तितकिच आवड
ढिगभर कामातून लेकरांसाठी काढीत होतीस सवड
हॉटेल मध्ये जाऊ , असा हट्ट करतांना नाही पाहिले
आई अग तुला पैठणीत बघायचेच राहिले.........
तू जाताना पापण्यांच्या ओलावल्या कडा
त्यादिवशी ही अंगणात प्राजक्ता चा पडला होता सडा
पण त्याचा सुगंध तुला घेताना नाही पाहिले
आई अग तुला पैठणीत बघायचेच राहिले.......😔😔
