पाऊस रंग
पाऊस रंग
1 min
384
पाऊस तुझ्या माझ्यातला
टपोरे थेंब झेलण्यातला
तुझ्या तृषार्त नजरेतला
माझा तुझ्यात भिजण्यातला
पाऊस सरसर रानातला
हिरव्यागार शेतातला
मातीच्या गंधातला
शेतकऱ्याच्या श्वासातला
पाऊस पौर्णिमेच्या रातीतला
समुद्राच्या ओढाळ गाजेतला
शुभ्र चंदेरी वाळूतला
खाऱ्या खाऱ्या वाऱ्यातला
पाऊस अल्लड वयातला
मित्रांच्या छत्रीतला
गरम दाणेदार कणसातला
अभ्यासाच्या बुट्टीतला
पाऊस छोट्या खोपटातला
पसरलेल्या भांडयातला
ओल्या थंड चुलीतला
रिकाम्या पोटातला
पाऊस मोठ्या शहरातला
खड्यांच्या रस्त्यातला
रेल्वेच्या रुळातला
सहनशील वृत्तीतला
पाऊस रौद्र रुपातला
निसर्गाच्या क्रोधातला
फुटलेल्या धरणातला
वाहत्या निष्पाप जीवातला
