पाणी
पाणी
पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे ब्रम्ह
पाणी म्हणजे निसर्गाची खळाळती साद....
ही समीकरणे जुनी झालीत मित्रांनो
पाणी म्हणजे आता आंतर-राज्यीय वाद ....!
पाणी म्हणजे कलह
पाणी म्हणजे कावेबाजी
पाणी म्हणजे मोर्चा ......,
पाणी म्हणजे फुटलेली पाईप लाइन
गळती आणि दुरुस्ती
पाणी म्हणजे अधिवेशनात सिंचनाच्या चर्चा....!
पाणी आताशा जीवाचे
पाणी पाणी करते
धरणांमधे नाही
पाणी पुनर्वसनात अडते....!
पाण्याने घेतलेत आता,
रंग राजकारणाचे
पाण्यावरून पेटणार आहे म्हणतात
तिसरे महायुद्ध जगाचे ....!
पाण्याचे दुर्भिक्ष्य जगाला
तसे नविन नाही
भगीरथाने गंगा उगाचंच,
पृथ्वीवर आणली नाही ....
पाण्याचे वाद,
इसवीसनाच्याही पूर्वीचे
सिध्दार्थालाही मिटवता आले नाही
भांडण शाक्य-कोलीयांचे....!
स्वर्गातून आली गंगा, पृथ्वीवर विटली
मागे हटली यमुना, नर्मदाही पेटली
खेड्यामधे नदी शेतकर्यांच्या डोळ्यांमध्येच आटली
उरलेली शहरात बिसलेरीच्या बाटल्यांमधे गोठली ....!
पाणी आताशा तलावात नाही
फाइलींमधे साठते
एक दिवस आड नळाला येते
' सततधार ' फक्त रिसॉर्टमधेच भेटते....!
जलस्त्रोत आटले नाहीत हो
उलट झालेत भलतेच " रीच "
समुद्र असो की नसो
कुठेही तयार होतात " बीच"....!
टॉवर्स मधे २४ तास
चाळीमधे २ तास
अर्धा तास झोपडपट्टीत
आणि खेडोपाड़ी नुसता भास....!
पाण्याची गणितं अशी उलटी मांडणी करतात
टँकरमुक्त गावांच्या घोषणा हवेतच विरतात
पाण्याने हौद नाही, हंडे नाही,
बर्याच ठिकाणी तर फक्त डोळेच भरतात
तरी अजूनही म्हणता येईल की
पाणी पूर्णत: पेटलेले नाही
निसर्गाचे भान अजूनही
म्हणावे तसे सुटलेले नाही
अजूनही समुद्राची वाफ होते
अजूनही ढग तट्ट फुगतात
अजूनही मोसमी वारे
आपल्याशी 'माणुसकी ' नेच वागतात
पाऊस येतो, तळी साचतात
नद्या वाहतात , झरे नाचतात
गरिबांचे पाणी प्रश्न
हळूहळू 'अमिर ' फाउंडेशन पर्यन्तही पोचतात
असो, जर
झिरप हवा, ओल हवी
पृथ्वीची माया खोल खोल हवी
तर,
पाणी मातीत जिरवावेच लागेल
वापराचे धोरण ठरवावेच लागेल
कारण भगीरथ पुन्हा येणे नाही
नवीन गंगा देणे नाही
पाण्याची ..... पाण्यापासून .... पाण्यासाठी,
अशी प्रत्येकाची नीती हवी
पुढच्या पिढीसाठी उरतेय ना
पाणी वापरताना ही भीती हवी
पाणी म्हणजे जीवन
पाणी म्हणजे ब्रम्ह
पाणी म्हणजे निसर्गाची खळाळती साद
हे समीकरण कधीही बदलू नये
हो,
वर्तमानाने भविष्याशी कधी
जीवघेणे खेळ खेळू नये ....!!!!
