STORYMIRROR

सुनील काजारे

Others

3  

सुनील काजारे

Others

ओढ तुझ्या आगमनाची!

ओढ तुझ्या आगमनाची!

1 min
253

तप्त काहिली सोसेना, माथी तापले हे ऊन

शेत-शिवारं गेली सुकून, पाण्याविना

झुळूक वाऱ्याची गडप, वृक्षवेली झाल्या स्तब्ध

किलबिल पाखरांचे शब्द, हरवले

तृष्णा पाण्याची शमविण्या, गुरे धावती मुकाट

पाहूनी सुकलेले नदीकाठ, होती सैरावैरा

किती भटकावे वणवण, झळा उन्हाच्या झोंबती

पाती गवताच्या लोंबती, करपलेल्या

धूळभरल्या वाटेची, चूल भरतोय वारा

वाढे उन्हाचा तीव्र पारा, भरभर

अवघी तापली वसुंधरा, छळती पोळलेले वारे

मिटली घरांची सर्व दारे, भर उन्हापायी

वरती पेटले आकाश, साहवेना जीवघेणे धग

वैतागले सारे जग, झाले लाहीलाही

गाळी अंग अंग घाम, रवी ओकतसे आग

पडे रात्रंदिन जाग, होई तळमळ

ग्रीष्म ऋतूचा हा चटका, करी तगमग

आता बरसू देरे मेघ, वरुणा

पावशा आळवी तुजला, गिळण्या पहिल्या सरीचा थेंब

करुनी टाक ओलीचिंब, ही तरुधरा

जग आसुसले तुझ्या भेटीला, आता रुसवा तू सोड

लागली नितांत ओढ, तुझ्या आगमनाची!


Rate this content
Log in

More marathi poem from सुनील काजारे