नवरात्र
नवरात्र
नऊ दिवसाचे नऊ तिचे रूप
काय वर्णू बाई तिचे स्वरूप !!धृ!!
प्रथम दिनी ती आहे शैल पुत्री
योग धारणे करी कृपा आदीत्री
भोळा ग सदाशिव आहे तिचा नृप !!१!!
द्वितीय दिनी माता ब्रम्हचारिणी
आत्म ज्योतरुप जागवी कुंडलिनी
दिव्य आत्म्याचे तूच ते प्ररुप !!२!!
तृतीय दिन रूप ते चंद्रघंटा
स्मरणे मात्रे दूर करी चिंता
मनी नीत स्मरावे हे चित्वस्वरूप !!३!!
चतुर्थ दिनाला होई कूष्मांडा
नवरूप देई ती शुष्क बीजांडा
चैतन्यदायी माता ही आत्मरुप !!४!!
पंचमीला प्रकटे होऊन स्कंदमाता
कार्तिकेय जननी अशी तिची वदंता
आळवू कसे मी तिचे ब्रम्हरुप !!५!!
षष्टीच्या दिवशी होते कात्यायनी
अखंड अखंड सौभाग्यदायिनी
मोहवी मनाला हिचे रत्नरूप !!६!!
सप्तमीला जागे ही कालरात्री
दे दान कांते प्रिये घटी सत्पात्री
वर्णू कसे मी शब्दी ते अणूरूप !!७!!
अष्टमीला अष्टभुजा महागौरी
दशदिशा ढाळती तुझ्यावर चावरी
पावन जगी माते तुझे गौररूप !!८!!
नवमीला अंबे तू होशी सिद्धदात्री
तुझ्या दरबारी मी अज्ञानी यात्री
देखीतो जगी मी तव चराचररूप !!९!!
दशमीला भजते तुझे विराट रूप
दावी जगाला तुझे ब्रम्हांडरूप
मंत्रमुग्ध स्मरते मधु नवरूप !!१०!!
