नवनिर्माण
नवनिर्माण
1 min
175
तापलेली धरणी आसुसली गारव्याला
तिचे निःश्वास उसासे गळ घालती उन्हाला
उन सांगे सुर्य देवा पुरे संताप जीवाचा
मेघराजाला सांगावा द्यावा धरती मातेचा
सुर्य देवाने त्वरित दिला संदेश मेघांना
आता बरसू द्या जल तृप्त करा सकलांना
झाली सुरू बरसात, मिळे क्षणात गारवा
मृदगंध पावसाचा जागवी सुप्त भावा
बळीराजाचा आनंद , फुले मृदगंधा सवे
हिरवाई शिवाराला मज आणि काय हवे
प्रीत बहरू येईल, धुंद मने मिळताना
मृदगंध पावसाचा आसमंत व्यापताना
जेव्हा चाहूल लागते एक नव जीवनाची
तेव्हा लालसा जागते अनावर निर्माणाची,
मृदगंध पावसाचा नवआशा जागवितो
झटकून मरगळ नव्या चैतन्यास बोलवितो