मुलगी म्हणून जगताना...
मुलगी म्हणून जगताना...
लहान होते तेव्हापासूनच
जाणीव करून दिली मुलगी असण्याची
बंधने आली बोलण्याची अन् मर्यादा आली हसण्याची
मी हसत हसत पाळली बंधने
अन् न बोलता जुमानल्या मर्यादा
पण चाहूल लागता अत्याचाराची
आता मी गप्प कशी बसू?
प्रश्न पडतो मनाला
मुलगी म्हणून जगताना।।१।।
परवा रिक्षाने जाताना
स्पर्श होता त्या नराधमाचा
पाहिला प्रथमच साध्या वेषातला राक्षस मी
वाटलं द्यावी लावून एक कानफडात
पण मर्यादा आली आडवी
प्रश्न पडले मनाला
मुलगी म्हणून जगताना।।२।।
जात असतील भाऊ-बहीण जरी
रस्त्याने जात असतील भाऊ-बहीण जरी
तरी, लफडं असेल हं यांचं
ही मनस्थिती किती भयंकर
कशी बदलू मी ही मानसिकता??
प्रश्न पडले मनाला
मुलगी म्हणून जगताना।।३।।
आधी बाप, भाऊ मग नवरा, मुलगा
किती किती ही बंधनं
कधी संपतील या मर्यादा
की देऊ झुगारून या बंधनांना
पण मग समाज काय म्हणेल??
प्रश्न पडले मनाला
मुलगी म्हणून जगताना।।४।।
बातमी ऐकता बलात्काराची
थरकाप होतो देहाचा,
हादरे बसतात हृदयाला
पण मग चूक नेमकी कोणाची
मुलीची, समाजाची की बघणाऱ्याच्या दृष्टिकोनाची
प्रश्न पडतो मनाला
मुलगी म्हणून जगताना।।५।।
मन म्हणतं, घे उंच भरारी गगनात
पण त्यासाठी मला दडपण नकोय साथ हविये
भीती नको बांधिलकी हविये
मग बघाच कशी मान उंचावेल तुमची माझ्या कर्तृत्वाने
अभिमान वाटेल मी लेक असण्याचा
प्रश्न नाही, ओझे नाही
आनंद वाटेल मुलगी म्हणून जगताना
मुलगी म्हणून जगताना।।६।।
