मृद्गंध
मृद्गंध
1 min
41
घन ओथंबून येताना
नभ कातर गहिरे होते
हरवले, विसरले काही
मृद्गंध होऊनी येते ll
घन ओथंबून येताना
आकाश असे दरवळते
मनी आर्त दाटलेले
गाणे ओठावरती येते ll
घन ओथंबून येताना
मन सैरभैरसे होते
सौहार्द आपले स्मरते
अन पुन्हा तुझी मी होते ll
घन ओथंबून येताना
मी अशी मागुती जाते
अन तुझिया गीतामधली
हळुवार भावना होते ll
घन ओथंबून येताना
मी भावगीत हे गाते
निमिषार्ध थांबुनी येथे
तू ऐकशील रे का ते ll
