मौसमी पाऊस वारा
मौसमी पाऊस वारा
काळया मेघांची ही दाटी, निळ्या आसमंती
गेले अंधारून सारे, आले आभाळ भरून
उर येई भरून, मनी होई हुरहूर
गेला रानोवनी ग वारा, झाडा झाडां वेलीतून
मन पाखरू होवून, वाऱ्यासवे जाय
मौसमाचा पाऊस, तो येईल घेवून
ढग वाजती जोरात, धुरकट चोहिकड
वाट पाहे आसमंत, चातक होऊन
अशी कडाडली वीज, रुपेरी लकाकत
काही क्षणांचा विलंब, तो येईल कोसळत.
आला आला ग पाऊस, मोत्याच्या धारांतून
न्ह्यायली झाड वेली, पक्षी पाखरे घरट्यातून
शांत झाली काहीली, ग्रिष्मी तापल्या धरतीची
गांधळला परिसर, किमया मातीच्या गंधाची
वाऱ्या पावसाचा खेळ, बेधुंद रंगला
भांबावली वासरे, आली आडोश्याला
भिजली शेत शिवार, रस्ते वाहती भरून
कागदाच्या होड्या वाही, पावसाच्या नदीतून
झिंम झिम पावसाची, रिप रिप छतावर
सुष्टीच गानं सुरू, पागोळ्यांच्या तालावर
चिंब चिंब चोहीकडे, मन ओलचिंब
तारुण्याची चाहूल, नवचैतन्याची आस
