कुंपण
कुंपण
माझ्या दूरच्या शेताला
आहे एक कुंपण
जसे सोनाराच्या तिजोरीला
असते आवरण
कुंपणाच्या साथीला
वेड्या बाभळीचे काटे
एकटेच नांदते ते
करी रक्षण शेताचे
कुंपणाच्या कामावर
माझ्या बापाचा भरवसा
पिकविल सोन जरी
राखतो रात दिसा
कुंपणच एक ते
होय शेताचा कैवारी
जमिनीशी नाळ त्याची
राहतो मातीचा आभारी
कधी विसरत नाही तो
धन्याचं कर्तव्य
रान प्राणी अडवितो
हित साधतो सदैव
त्याच्या व्यथांचा भार
वाहून नेतो वारा
अडरानी वावरात
त्यास पशुपक्ष्यांचा सहारा
एकटेच जगणे जरी
त्याच्या भाळी लाभलेले
कडाक्याचे उन्हाळे त्याने
अंगावर सोसलेले
शिकावं तरी किती
या कुंपणाकडून
जीवनीच्या व्यथा पाहून
उर येतोया भरून
भरलेल्या उरातही
निष्ठा त्याची ढळत नाही
काळया धन्याचं शेत गिळाया
हात त्याचा वळत नाही
