जीवन - गणित क्षणांचं
जीवन - गणित क्षणांचं
क्षण एक आहे जन्म, क्षण एक आहे मरण
क्षण अर्धा जीवन, क्षण शंभरही जीवन
असतात कुणी अल्पायुषी, कुणी दिर्घायुषी
कुणी जिवंत असुनही संपलेले असतात
तर कुणी संपलेले असुनही जिवंत असतात
जीवन जगण्यासाठी हवं असतं एकच ध्येय
मरणासाठी शंभर कारणही नसतात पूर्ण
चिखलकाट्यांच्या ह्या रस्त्यावर नाही काढता येत माग
जे झालं ते गेलं, म्हणून सोडून द्यायचे असतात काही भाग
आयुष्याच्या शिदोरीत सर्व चवींचे पदार्थ सापडतात
सर्व आपणच बनवले म्हणून खायचे असतात
नेहमी गोड खाऊनही आजार बळावतो
तर नेहमी कडु खाऊनदेखील माणूस गोड असतो
काळ कधी थांबला आहे का कुणासाठी?
परंतु सत्कर्म्यांची दिली त्याने साथ
नाही आज पण उद्या आहे त्याचा हात
हा खेळ त्याचा चाले अगाध
ना कोणी मित्र ह्याचा, ना कोणी शत्रू ह्याचा
सगळ्यांचाच हा स्वामी, स्वसामर्थ्याचा राजा
श्रीमंती आणि गरिबी पलटून देतो कर्मानुसार
आयुष्याची गणिते हा मांडतो दैवानुसार
मातीलाही हा बनवू शकतो सोने
आणि पैशांचीही करु शकतो माती
याच्याच हातात दोर प्रत्येकाच्या आयुष्यरथाचा
जोडा किंवा सोडा हा विचार कर्माचा
म्हणून करावे विधात्याचे क्षणभर नामस्मरण
आणि तिळाएवढे तरी पुण्य रोज
याचाच खरा धाक काळाला
अन् हाच खरा जीवनाचा मेवा
असेल किंवा नसेल जन्म ह्या भूतलावर पुन्हा
किर्ती आपली सदैव अजरामर ठेवा
