जा रे पावसा!
जा रे पावसा!
जारे जारे पावसा
तुला देतो पैसा
पाऊस आला धावून
नोटा गेल्या वाहून
का ग येता सरी
सरीवर सरी
सरीवर सरी
सरीवर सरी.
कोसळती सरी
माझे गाव भरी
घरे गेली वाहून
लोक मेले बुडून
ढग केवढे फुटले
नदीकाठ तुटले
पूर गावी घुसले
वरुण का हो रुसले?
अरे तू अभागा
कधी होशील जागा
जंगले नुरली
सिमेंटने भरली
विकासाच्या नावे
बांधलीस गावे
गावावर गावे
गावावर गावे
तूच सांग आता
माणसा परत्वे
इतर जीवांनी
कुठे बरे जावे?
काय त्यांनी खावे
कसे रे जगावे
तुझ्या सुखासाठी
का त्यांनी मरावे?
सरिता रे साऱ्या
भरून वाहती
किती आवेगाने
सागरात जाती
त्यांना अडवून
तू केला प्रक्षोभ
सागराचा क्रोध
तूच आता भोग
सागरी पोटात
कचरा भरला
तूच मानवा रे
उच्छाद मांडला
तो आहे तापला
उकळे, विस्तारे
तप्त बाष्प सारे
मेघ बनती रे
जलमय मेघ
तुझ्यावर येती
ढगफुटी होता
चिंब भिजविती
तुझ्या कर्मांमुळे
तुझा सरला काळ
तुझ्या लोभामुळे
प्रलय अटळ
माझ्यापाशी येऊन
मागू नको भीक
तुझ्या चुकांपासून
तूच आता शिक
नाहीच तू शिकला
तर गेलास बुडीत
तुझ्या नसण्याने
काही नाही बिघडत
