गुरुजी तुम्हीच तर आहात!
गुरुजी तुम्हीच तर आहात!
गुरुजी तुम्हीच तर आहात...
माझ्या या आयुष्याची जडणघडण करणारे,
त्याला आखीव व रेखीव कोरणारे
तुमचा तो खूप सरा ओलावा नि प्रेमाचा दरवळणारा सुगंध,
आठवत असतो तुम्ही बांधलेला हळूवार नाजूक तो बंध
गुरुजी तुम्हीच तर आहात....
माझ्या बोबड्या बोलण्याला बोल लावणारे,
सावरत पडणाऱ्या पायांना चाल लावणारे
स्वैर मनाला देऊन पंख आकाश उडवणारे,
आणि डोळ्यांनी प्रत्येकाचा चांगुलपणा शोधणारे
गुरुजी तुम्हीच तर आहात.....
या तंत्रज्ञानाच्या जगातसुद्धा
आत्मज्ञानाला जागवणारे
फक्त बुद्धीने मोठा हो न म्हणता,
मनात माणुसकी पेरणारे
गुरुजी तुम्हीच तर आहात......
प्रकाश आणि अंधार समजवणारे,
कधी मुंगी तर कधी हत्ती हो म्हणणारे
कल्पनेला माझ्या जळण देणारे,
कधी दुरून तर कधी जवळून आधार देणारे
गुरुजी तुम्हीच तर आहात....
ज्यांची पाहून एकोप्याची भावना,
एक आपोआप दुसरा होतो
धरत घट्ट हात खूप मोठी साखळी होतो,
मी, तू म्हणणारे पाहा ना कसा आम्ही आणि आपण होतो
गुरुजी तुम्हीच तर आहात.......
माझ्या स्वप्नांना आजही खुणावतात,
त्यांना पुर्ण करण्याची इच्छा दुणावतात
तू फक्त कर्ता हो मी आहेच हा आशीर्वाद तुमचा,
सगळ्या जाणिवांना फुंकर घालतात
गुरुजी तुम्हीच तर आहात.......
नावाला आमच्या अर्थ देणारे,
सुंदर या जगात वाहून नेणारे
आयुष्य माझे फुलवत राहणारे,
नसूनसुद्धा या जगी सतत माझ्या पाठी राहणारे
गुरुजी तुम्हीच तर आहात..........
