चिमण्यांची सभा
चिमण्यांची सभा
1 min
319
चिमण्यांची सभा ही भरली
सगळीकडे हा चिवचिवाट सारा
बैठकीचा मुद्दा होता
आपल्या अस्तित्वाचा
एक ज्येष्ठ चिमणी पुढे आली
अंगावरचे थरथरणारे पंख सावरत
आणि म्हणाली सभेला
आठवतात ते दिवस मजला
जेव्हा थवा आमचा
भिडे गगनाला
पण, या माणसाची नजर लागली
आणि पंखहीन केले आम्हाला
सुरात सूर मिसळून
दुसरी चिमणी पण म्हणाली
विसरलाय हा माणूस भूतदया;
उन्हाळ्याचे चंबुत पाणी ठेवणे
कसला चढला अभिमान याला
कुठे गहाण ठेवली बुद्धी याने
तितक्यात एक तरुण चिमणी
आली भुर्रकन उडून
आणि म्हणाली पूर्ण जोशामध्ये
निसर्ग आमचा मायबाप हा
घडवेल अद्दल या माणसाला
स्वतःच्याच पायावर
धोंडा मारायची सवयच आहे त्याला
अचानक सभेवर दगड पडला
दहशतवादी तर नव्हे?
प्रश्न पडला चिमण्यांना
पण हा तर नेहमीचाच माणूस!
