बुद्धा तुला कुठ शोधायचं?
बुद्धा तुला कुठ शोधायचं?
1 min
208
जमिनीन जपून ठेवलेलं
मातीचं नातं म्हण
तुझ्याच महाकाव्यातील
समतेचं पातं म्हण
पण,आम्ही तुला कुठवर असं खोदायचं?
बुद्धा!आम्ही तुला कुठ कुठ शोधायचं?
तुच आमचा मार्ग
तुच आमचा प्रवास
तुच चैतन्य आमचे
तुच आमचा आभास
मातीच्या कणाकणात असं किती रुजायचं?
बुद्धा!आम्ही तुला कुठ कुठ शोधायचं?
आमची प्रज्ञा धडपडते
तुझा क्रांती सुर्य उगवतो
विषमतेच्या अंध:काराला
दिशा दिशांत उजळतो
विश्वशांतीचे पंख लावूनी असं उंच उडायचं
बुद्धा!आम्ही तुला कुठ कुठ शोधायचं?
तु करूणेचा प्रांत
तु मुक्तीचे आभाळ
समता संगरातील
तु धगधगती मशाल
उजेडाचे यात्री होवून माणुसकीला पुजायचं
बुद्धा!आम्ही तुला कुठ कुठ शोधायचं?
●●●
