"आजी"
"आजी"
देवा, एकवेळ तू माझी सगळी खेळणी घेऊन टाक,
पण माझ्या आजीला म्हातारं करू नकोस,
मऊसूद लोणी मला आणि तुला देणाऱ्या ह्या मऊसूद हातांवर सुरकुत्या पाडू नकोस.
माझी आजी काय आहे तुला काय सांगू!
किती किती गुण तीचे कुठले कुठले दाखवू!
गोड धोड ती खाऊ करते,
माझ्यासाठी लोणी कढवते,
तेल लावून मला मॉलिश करते तर,
चिऊ काऊ च्या गोष्टी सांगत अंगणात बसून मला जेवण भरवते.
करतो खूप दंगा मी,
जेवतच नाही पटकन,
पडवीतून ओसरीत अन ओसरीतून पडवीत जात असता पडतो मी धपकन.
दमत दमत आजी मात्र माझ्या मागे धावते,
आणि
लागलं का रे माझ्या सोन्या अस म्हणतं गोड गोड पापा घेते.
आजीच्या आंबाड्याची पीन काढून मी महादेवाच्या मंदिरात पळत सुटतो,
आजीला मागे येतांना बघून अजुन जोरात धावतो,
आजीला दिसू नये म्हणून मी नंदीआड़ लपतो तर आजी बाकावर बसताच नंदिलाच घोड़ा करुन महादेवाला नमस्कार करतो.
ती जपाला बसायच्या आधीच मी माळ तीची लपवतो,
तर विचारले असता तीने
तो मी नव्हेच असेच तीला सांगतो.
प्रताप पाहून माझे, ती हात माझ्यापुढे टेकते,
पोथी बंद करून मुरलीधराला नमस्कार करते,
मग देऊन टाकतो मी ही तीला तीची माळ परत,
अन मुरलीधराच्या मागून तथास्तु म्हणून धूम ठोकतो परत.
आई वडील भाऊ बहिण अशी सगळीच् नाती एकटी आजीच पार पाडते,
माझ्या दिनक्रमात स्वतःचेच विश्व संपवून टाकते.
अताशा मात्र आजीला ज़रा बरे नसते,
पूर्वी माझ्यामागे धावणारी ती आता मात्र गुडघे धरून बसते,
पूसता तीला ह्याबद्दल ती म्हणते--
मोतिबिंदु आणि मधुमेहाचा दागिना घेऊन मी मिरवते,
श्रीरंगा तुझी आजी आता म्हातारी होते.
नेमकी आताच आणि माझी शाळा सुरु झालेली असते,
शाळा आणि ट्यूशन मधून आजी साठी वेळच मिळत नसते.
आजी म्हातारी होतीये ही कल्पनाच मला करवत नाही,
सतत काम करणारी आजी आज शांत बसलिये हा विचारच करवत नाही.
माझी सगळी काम बाजूला सोडून तिच्या कुशीत पुन्हा जातो मी,
तीला धावायला लावणारा आता तिच्यासाठी धावतो मी,
पण लहान आहेस तू अजुन, असे म्हणून माझे कोणी ऐकत नसतं,
तर
मोठमोठ्या सलाईन च्या सुया आजीला कोणी टोचत असतं,
वेदना त्या बघवत नाही,
अन शांत ही बसवत नाही,
इतक्या गोड माझ्या आजीला सुया टोचतांना देवा तुला काहीच कसे रे वाटतं नाही!
आख्या विश्वाचीच जबाबदारी घेणाऱ्या देवा आता तुझ्यावरच माझ्या आजीची जबाबदारी टाकतो,
माझ्या आजीला कायम तरूण आणि निरोगी ठेव एवढंच मागण तुझ्याकडे मागतो.
