STORYMIRROR

Vinayak Sutar

Others

4  

Vinayak Sutar

Others

आईची छाया

आईची छाया

1 min
364


प्रिय आईस,

पत्ता :- देवाचे घर....


तुझा हात हवा होता सदा माझ्या उश्यावर,

थापटून मला झोपवायला, अचानक जाग आल्यावर.


मी अजून सुद्धा दचकून जागा होतो मधीच,

तुझी काळजी रात्रभर सतावत राहते उगीच.....


..तू का इतक्या लवकर सोडून गेलीस गाव माझं,

'आईविना पोर'असं घेतात लोक नाव माझं.


वरवरच्या पदार्थाची मला चवंच लागत नाही,

काय करू, तुझ्या हातच्या घसाविना माझी भूकच भागत नाही.....


..पोरकेपणाचा माझ्याभोवती का ठेऊन गेलीस जाळ,

का खरंच इतकी कच्ची होती तुझ्या माझ्यातली नाळ.


तिथं कुणी आहे का तुझ्याशी बोलायला भरपूर,

उगाच रडत राहू नकोस दाबून स्वतःचा ऊर.......


..बघं आता आई मी रडत नाही पडलो तरी,

मला ठाऊक आहे तू गेली आहेस देवा घरी.


भूक लागली तरी बिलकुल मी रडत नाही,

कारण मी हसल्याशिवाय तुला चैन पडत नाही....


..पण रोज रात्र झाली की तुझ्या आठवणींचा थवा येतो,

अंथरुणात लपून, पुसून डोळे मी गप्प झोपी जातो,


बघं तुझं बाळ किती समजूतदार झालं आहे,

आणि वय कळण्याआधी वेडं वयात आलं आहे.....


..अजिबात म्हणजे अजिबात त्रास देत नाही पप्पाला,

तुझी काळजी तेवढी मात्र घ्यायला सांग माझ्या देवबाप्पाला.


आणि सांग देवाला की हे शहाणं बाळही आहे जरा हट्टी,

जर का काही झालं तुला तर करीन त्याचाशी कट्टी......


..मी आता थकलोय तुला ढगांमध्ये पाहून,

ये आता भेटायला नजर तिथली चुकवून.


जमलं जर का सुट्टी घ्यायला तर ये निघून अशीच,

पोट भरतं गं रोज पण मायेची भूक अजून तशीच...


..थकलो आहे ग मी खुप रडत रडत खोटे हसुन,

येऊन हासवशील का तू पुन्हा डोळे माझे पुसुन,


येऊन हासवशील का तू पुन्हा डोळे माझे पुसून..


-तुझाच लाडका.


Rate this content
Log in