आदिम जाणीव
आदिम जाणीव
अश्मयुगातील होमोसेपियनपासून
सुरू झालेला प्रवास
येवून ठेपलाय
तुझ्या-माझ्यापर्यंत
शरीर उत्क्रांत होत गेलं
मन मात्र तिथेच,तसंच
जगण्याचे आयामही बदलले
ऋतू बदलले..
पृथ्वीही रचत गेली
रिचवत गेली
कितीतरी थर
एकावर एक
डेटा कार्बनने ओळखू लागलोय आपण
एखाद्या जवसाच्या कणाचं रूपडं..!
विटा,मणी,मुर्त्या,शिंपले..
स्तुपं,लेण्या,मनोरे..
काय नि काय..
त्यातून शोधतोय आपण
गतसंस्कृतीचं अस्तित्व..
बांधू लागलोय आराखडे
तिथल्या समाजरचनेचे..धर्मसत्तेचे ..
सरंजामी की कम्युनिस्ट?
करतोय दररोज चर्चा..महाचर्चा..
कंदमूळं खात जंगलातून फिरणा-या
आदिमानवापेक्षा
आपण किती पुढारलोय
याची शेखी मिरवत
पण खरंच सांग
बदलले आहे का आपले मन..भावना..विचार..
डोक्याच्या आतल्या मेंदूची गुंतागुंत..
तिथून स्त्रवणारे अन् शरीरभर
पाझरणारे रस..
बदलली आहे का तुझी पुरुषीवृत्ती
अन्
माझी स्त्री असण्याची आदिम जाणीव..?
