6 इंच मेंदू हवा
6 इंच मेंदू हवा
गरीबा घरी अपेक्षांची रोज होळी,
श्रीमंताघरी नित्याचीच दिवाळी.
लठ्ठ इथे आणखी गलेलठ्ठ होत आहे,
जगणे आणखी बिकट होत आहे.
जय श्रीराम म्हणून,
गरीबांची भूक कधीच भागत नाही.
अन हे म्हणल्याशिवाय,
काहींचे दुकान चालतच नाही.
...असा अतुल्य 'भारत माझा देश आहे',
हे म्हणण्यास आता मन धजावत नाही !!
आम्ही आवाज उठवला तर देशद्रोही,
अन स्वतः मात्र देशाला विकून खाई.
सत्तेत राहून आतून देश पोखरतात,
अन सीमेवर फक्त गरीबांची पोरे शहीद होतात.
देशाला लाथाडून तुंबडी भरण्यास,
गेलेल्यांना पायघड्या अन विमान.
इथे घाम गाळणाऱ्यांनो पायी चाला गुमान...
अन थकलात तर पटरीवरच सोडा प्राण.
...असा अतुल्य 'भारत माझा देश आहे',
हे म्हणण्यास आता मन धजावत नाही !!
बोलके अंगठे राज्य करतात अन,
शिकलेले भेंडोळ्या घेऊन वणवण फिरतात.
शाहू-फुले-आंबेडकरांचे पाईक इथे कोणी दिसत नाही,
कारण आमच्या कवटीत आता मेंदूला जागा नाही.
अतिथी देवो भव... असे म्हणत करोडोंचा चुराडा..
आणि संकट आले की 'देशवासीयों भीक वाढा...'
कशी ही लबाडांची लोकशाही,
लावतेय देशाच्या भविष्याला घोडा.
...असा अतुल्य 'भारत माझा देश आहे',
हे म्हणण्यास आता मन धजावत नाही !!
धर्माधंता उतली आहे सगळीकडे,
माणुसकी कुठे नजरेस पडत नाही.
पाहावे तिकडे सत्याचे पानिपत होत आहे,
असत्याची घौडदौड मात्र थांबत नाही.
नाव शिवबाचे... नियत अफजलखानाची.
धर्म-जातीचे वारे...माणुसकीला ना कोण विचारे.
तोंडी जप गरीबांचा...हुजरेगिरी श्रीमंतांची.
जुमलेबाजांची चलती... सत्याची बंद बोलती.
...असा अतुल्य 'भारत माझा देश आहे',
हे म्हणण्यास आता मन धजावत नाही !!
तरीही वाटे फिरुनी इथेच जन्म घ्यावा,
वेळ येणारच आहे, एकदाच बदल व्हावा.
नको आता 56 इंचाची माया...
देश चालवयास फक्त 6 इंच मेंदू हवा !!
देश चालवयास फक्त 6 इंच मेंदू हवा !!
