Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here
Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here

माझा छंद

माझा छंद

3 mins 110 3 mins 110

काही ना काही छंद असणे हा मानवी गुणधर्म असतो. कुणाला कशाचा तर कुणाला कशाचा छंद हा असतोच. कोणी पोस्टाची तिकिटे जमवतो, कोणी नाणी, कोणी रंगीत चित्रे तर कोणी भटकंतीचा छंद जपतो. मला जंगलात जाऊन विविध रंगांचे पक्षी कॅमेऱ्यात टिपण्याचा छंद आहे. त्यांचे वेगवेगळ्या आवाजात ओरडणे, चिवचिवणे, त्यांचा गोड किलबिलाट मला मोहित करतो. या छंदापाय मी निरनिराळी जंगले, वने, शेते, राने, बागा पायाखाली घातल्या आहेत. बऱ्याच प्रकारच्या पक्ष्यांच्या सवयी, घरटे बांधण्याच्या पद्धती यांचा अभ्यास केला आहे. त्यांची राहण्याची, उडण्याची तऱ्हाही मला आवडते. काही पक्षी खूप सावधपणे उडतात, तर काही झपकन. काही पक्षी तर कानाजवळून आवाज करत झेपावतात की जणू दचकायला होते. यामुळे त्यांच्या राहण्याचा किंवा जगण्याचा अभ्यास करणे माझा विरंगुळाच होऊन बसला आहे.


देवाने काही पक्षांना तरी खूप सवडीने निर्मिले आहे असे वाटते. त्यांच्या पिसांचे नाना रंग निगुतीने रंगवलेत. त्यांच्या डोक्यावरचा तुरा, त्यांचे आकार, त्यांचा आहारविहार हेही माहित पडते. काही पक्ष्यांची नखे नाजूक असतात. परंतु काही मांसभक्षी पक्ष्यांत त्यांच्या भक्ष्यांना किंवा मोठ्या प्राण्यांना पकडून उडायचीही ताकद असते. त्यांचा झेपावण्याचा अदमासही अचूक असतो. घारीसारखे पक्षी उंच आकाशात उडतात पण त्यांचे सारे लक्ष गवतातील, रानातील छोट्याशा भक्ष्यांकडे असते. ते त्यांच्या दृष्टीस पडले की ते खाली झेपावतात नि भक्ष्याला घेऊन दूर उडून जातात.

    

गरुड पक्षी अतिशय विशालकाय असतात. त्यांच्या अवाढव्य आकारावरुनच त्यांचा झेपावण्याचा प्रकार कळतो. पेंग्विन, मोर, शहामृग हेदेखील बलाढ्य असतात पण ते आकाशात उंच उडू शकत नाहीत त्यामुळे शेतातील धान्य, किडे, अळ्या यावरच ते अवलंबून असतात. काही पक्षी जास्त थंडीच्या परदेशातून भारतात येतात कारण त्यांना तिकडची थंडी सहन होत नाही. त्या गुणामुळे त्यांच्या बुद्धीचे कौतुक करावेसे वाटते. रशिया, सैबेरिया यासारख्या दूरच्या देशातून नेमके उडून कसे येऊ शकतात याचे आश्चर्य वाटते. काही समुद्रपक्षी समुद्रातील माशांवर नजर ठेवून असतात. तो दिसला की बरोबर खाली येतात नि चोचीत मासा पकडून उंच उडतात. जगात पक्षांच्या एकूण ८६०० जाती आहेत. काही उपजातीही आहेत. त्या साऱ्या मिळून ३० हजारच्यावर संख्या जाईल. २६५ जाती नामशेष झालेल्या आहेत. कारण या वातावरणात, तापमानात त्या जाती स्वतःला या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकल्या नाहीत. पक्ष्यांच्या बऱ्याच जाती शेतकऱ्यांच्या मित्रवर्गात मोडतात. पिकांना नष्ट करणाऱ्या कीटक, टोळ्यांना खाऊन टाकतात नि शेतकऱ्याच्या पिकांचे संरक्षण करण्यास मदतच करतात.

   

काही पक्षी अन्नाच्या शोधार्थ हजारो किलोमीटर दूर उडून स्थलांतर करतात. काही ठिकाणी पक्ष्यांची शिकार होते त्यामुळे सुरक्षिततेसाठी हे पक्षी दूर जातात. आपल्या पिलांना प्रशिक्षण देणारे हे पक्षी पिलांना घेऊन दूरवर जातात. त्यामुळे खरे तर पर्यावरणाचा समतोल राखला जातो. निसर्गातील घाण, सजीवांची मृत शरीरे खाऊन काही पक्षी परिसर स्वच्छ, सुंदर राखतात. बीजप्रसार करण्यात तर पक्ष्यांची फार मदत होते. सकाळी झाडावरून ऐकू येणारे पक्ष्यांचे सुरेल स्वर आपणास कर्णमधूर वाटतात आणि मन प्रसन्न होते. रानच्या वस्तीला मोराचा केकारव, चिमण्यांचा चिवचिवाट, कोकिळेचे कूजन म्हणजे निसर्गाकडून मिळालेले वरदानच आहे. ते ऐकून आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लीत होतात.


    अशा हजारो प्रकारच्या पक्ष्यांचा अभ्यास करणे हाच छंद मला जडला आहे. त्या छंदापायी मी रानवाटा, माळरान नि निरनिराळी जंगले पायाखालून घालते त्यामुळे विविध पक्ष्यांच्या जीवनशैलीची ओळख तर होतेच पण परिसराचीही ओळख होते. जुने किल्ले, गडवाटा यांची माहिती मिळते. पर्यावरणाचा अभ्यास होतो. देवाजीने निर्मिलेली ही नयनरम्य निसर्गसृष्टी म्हणजे मनुष्याला मोफत मिळालेले वरदान आहे आणि त्या वरदानाचा लाभ घेण्याचा छंद मी जपत, वाढवत आहे.


Rate this content
Log in

More english story from Bharati Sawant