Untitled
Untitled
ओटी म्हणजे काय? ओटी का भरावी?
ओटी म्हणजे काय? ओटी भरणे याचं महत्व काय आहे? ओटी का भरतात; याची कारणं काय आहेत? या सगळ्य प्रश्नांची उत्तरं देणारा माझा आजचा लेख आहे.
ओटी म्हणजे बेंबीच्या खालचा पोटाचा भाग. जेथे गर्भाशय असते. / गर्भ वाढतो. ओटी देताना सुवासिनी आपल्या पदांमध्ये ओटीचे सामान धरून तेच ती दुसर्या सुवासिनीच्या पदरात / ओच्यात / दुपट्टयामध्ये सोडते आणि वरून 3 किंवा 5 वेळा ओंजळीने तिच्या पदरात तांदूळ घालते. ओटी भरणे ही अत्यंत सुलभ अशी क्रिया आहे. ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील महत्वाचा संस्कार आहे. हा संस्कार प्रत्येक पिढीने जोपासणं फार आवश्यक आहे. कारण आपल्या भारतीय संस्कृतीत पूर्वपरंपरेनुसार जे संस्कार रूजवलेले आहेत ते भारतीय समाजाच्या हिताचेच आहेत असं मला वाटतं. संस्कारांमुळे समाज घडत असतो. संस्कारातून माणसांची जडणघडण होत असते.
ओटी भरण्याची कारणं पुढील प्रमाणे : -
1) ओटी भरणं ही भारतीय लोकसंस्कृतीतील स्त्रीजीवनातील महत्वाची रूढी आहे. ही रूढी प्रतीकात्मकतेने साजरी होते. भारतातील विविध प्रांतात व विविध समाजजीवनात व स्तरात ही पद्धत थोड्याफार फरकाने अस्तित्वात आहे. स्त्रियांची सर्जनशीलता; मातृत्व; तिच्या ठायी असणाऱ्या नवनिर्माणाच्या क्षमतेचा अनुषंग या सर्व बाबी या परंपरेच्या मागे आहेत. परंतु प्रत्येक परंपरेचे काही नियम असतात; निकष असतात. तसेच या परंपरेचे देखील काही नियम आहेत. ओटी फक्त विवाहित सवाष्ण ( म्हणजे जिचा पती हयात आहे अशी स्त्री) जी ला आपण सौभाग्यवती म्हणतो. अशा स्त्रियांचीच भरली जाते. विधवा स्त्रियांची ओटी भरली जात नाही. ओटी भरणं हे सौभाग्याच लक्षण आहे.
2) ओटी भरणे हा स्त्रीत्वाचा एक अनोखा सन्मान आहे.
3) ओटी भरणे हे खरं तर गर्भधारणेचे प्रतीकविधान आहे.
4) ओटी म्हणजे बेंबीखालचे पोट असून या ओटीपोटातच गर्भाशय असते. गर्भाधानालाही ओटीभरण अशीच सज्ञा प्राप्त झालेली आहे. ओटीत घातलेली फळे; पुष्पे ही संततीची सूचक आहेत तर तांदूळ हे विघ्ननिवारक आहेत.
5) तांदूळ हे शुभ मानले जातात. म्हणून तर लग्नात अक्षता म्हणून तांदूळ वापरतात.
6) लग्नसमारंभात अनेक सुवासिनींच्या; सौभाग्यवतींच्या ओटी भरल्या जातात. यामध्ये सुद्धा विवाहित वधूला संतानप्राप्ती व्हावी असाच उद्देश यामागे असतो.
7) विवाहित स्त्रीची कूस उजावी; तिची ओटी भरावी; फुलावी; फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीला मातृत्व लाभण्यासाठी अभीष्टचिंतन केले जाते.
8) सासुरवाशीण माहेरी जाऊ लागली म्हणजे तिला फक्त कुंकू लावतात परंतु तिची ओटी भरत नाहीत मात्र माहेरवाशीण सासरी जाऊ लागली म्हणजे तिची ओटी भरतात.
9) ओटी देणारी आणि ओटी घेणारी स्त्री ह्या विवाहित असाव्या लागतात. शास्त्रात असा उल्लेख आहे की; एक स्त्री आपल्या आईची ओटी फक्त अधिक महिन्यातच भरू शकते. एरवी सासरी निघालेल्या मुलीची ओटी आई भरते पण अधिकमासात आईची ओटी भरून पुन्हा तुझ्याच पोटी जन्म मिळू दे म्हणून आशीर्वाद मागते अशी प्रथा आहे.
गरोदर स्त्रीची चोरओटी का भरली जाते :-
घरात गोड बातमी येणार हे समजल्यानंतर घरात उत्साहाचं वातावरण पसरतं. गरोदर स्त्रीची काळजी घेणं; तिला काय हवं नको ते पाहणं; तिचे सगळे डोहाळे पुरवणं यात कुटुंबातील सदस्य व्यस्त होऊन जातात. बाळाची चाहूल ही साधारण दिड महिना उलटल्यावरच लागते. त्यामुळे यानंतरच्या काळात गरोदर स्त्रीचे सोपस्कार पार पाडले जातात.
तिसरा महिना संपत आला की पोटातील बाळ व्यवस्थित वाढायला लागते. त्यानंतर बाळाच्या आईची चोरओटी भरतात. ही ओटी कोणालाही कळू न देता घरच्या मंडळींच्या उपस्थितीतच केवळ भरली जाते. याचा कोणताही मोठा समारंभ करण्यात येत नाही. या जिव्हाळ्याच्या विधीमध्ये गर्भवती आई आणि तिच्या न जन्मलेल्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी जवळच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश होतो. चोरओटी भरल्यानंतर आपण ही गोड बातमी आपल्या नातेवाईकांना; मित्रमैत्रिणींना; शेजाऱ्यांना; ओळखीच्या लोकांना सांगू शकतो. कारण तीन महिन्यांपर्यंत गरोदर स्त्रियांचा गर्भपात होण्याची शक्यता असते. म्हणून आधी ही बातमी कोणाला बाहेरच्या लोकांना सांगितली जात नाही.
स्त्रीचे गरोदरपण आणि बाळंतपण खूप आनंदाने साजरं केलं जातं. सातव्या महिन्यात गरोदर स्त्रीचं डोहाळजेवण केल जातं. प्राचीन भारतात; आईला फळे आणि इतर खाद्यपदार्थ भेटीच्या स्वरूपात दिले जात होते. त्यामुळे बाळाच्या वाढीसाठी त्याची मदत होत होती. कालांतराने स्वरूप बदलत गेले. आजकाल त्याला इव्हेंटचे स्वरूप आले आहे. महाराष्ट्रात हा समारंभ 'डोहाळजेवण' म्हणून ओळखला जातो. ह्या मराठी शब्दाचा अनुवाद " अन्नाची लालसा पूर्ण करणे" असा होतो. नावावरूनच स्पष्ट होतं की; या समारंभामध्ये खाद्यपदार्थांवर भर दिला जातो. भात आणि पुरणपोळी यांसारखे पदार्थ मेनूमध्ये असतात. या समारंभाचा एक रोमांचक पैलू म्हणजे मुलगा होणार की मुलगी हा खेळ खेळला जातो.
भारतीय डोहाळजेवण एक सांस्कृतिक कल्पना आहे आणि त्याचा ऐतिहासिक संदर्भ पाहणे आवश्यक आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे आणि विशेष काळजीमुळे; गरोदरपण तुलनेने सुरक्षित आहे. एका शतकापूर्वी अशी परिस्थिती नव्हती तेव्हा मृत्यूदर जास्त होता. ओटीभरण; कधीकधी त्या स्त्रीसाठी शेवटचा उत्सव ठरत असे. म्हणूनच प्रार्थना हा समारंभाचा एक महत्वाचा भाग आहे.
भारतीय डोहाळजेवणात गाणं आणि नृत्य असणं अपरिहार्य आहे. तो परंपरांचा एक भाग आहे. ओटीभरण ह्या समारंभाच्या नावाप्रमाणेच असतो. घरातील महिला मिठाई आणि फळांनी होणाऱ्या आईची ओटी भरतील. गर्भवती मातेला आरामदायी ठिकाणी बसवलं जातं. तिथे तिचे मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक येऊन तिला आशीर्वाद देतात.
खण - नारळाने देवीची ओटी भरणे हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे. हा उपचआर शास्त्र समजून अन् भावपूर्ण केला; तर त्याचा अध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकाला होतो.
देवीची ओटी भरण्याचं महत्व:- देवीपूजनाची सांगता देवीची ओटी भरून ( खण आणि साडी अर्पण करून) म्हणजे देवीच्या निर्गुण तत्त्वाला अध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आव्हान करणे होय.
ओटी भरणं ही भारतीय संस्कृतीतील स्त्रीच्या जीवनातील एक महत्त्वाची परंपरा आहे. या परंपरेच्या मागे काही शास्त्र आहे ते समजून घेऊन ही परंपरा भारतीय समाजाने सदैव जोपासावी असं माझं मत आहे.
लेखिका
मिसेस सुरूची शिरीष वीरकर
