Pankaj Kamble

Others

3  

Pankaj Kamble

Others

उजाडल्या नंतरचं सपन

उजाडल्या नंतरचं सपन

17 mins
9.1K


उजाडल्या नंतरचे सपान

(भाग १)

           तसं पाहीलं तर स्वप्नांचं आणि माझं नातं फार जुनं आहे. म्हणजे अगदी कळायला लागलेल्या वयापासूनच मी स्वप्न पाहत आलेलो आहे. फक्त ती स्वप्न वयानुसार बदलत गेलीत. स्वप्नांच स्वरूप माझ्या विचारानुरूप बदलंत गेलं. म्हणजे माझं आणि माझ्या स्वप्नांचं वय सारखंच!

       तसा मी लहान पणापासूनच फार जिद्दी स्वभावाचा आहे असे मला ओळखणारे सर्वजण सांगतात. लहानपणी माझ्या मित्रांसोबत काचाच्या गोळ्या खेळायचो त्यावेळी माझी पहिली अट असायची. "हारी-पुरी", म्हणजे जोपर्यंत मी तुझ्या जवळच्या सर्व गोळ्या जिंकत नाही किंवा माझ्या जवळच्या सर्व गोळ्या हारत नाही तोपर्यंत खेळत राहायचे.

        मग आमचा खेळ सुरू व्हायचा केंव्हा-केंव्हा सकाळपासून दुपारपर्यंत खेळ चालायचा. तहान भुकेचंही भान राहचं नाही. मग माझी आत्या मला शोधत यायची. तिलाही मी विनंती करून थांबवायचो मित्राची आईही आलेली असायची, पण आम्ही खेळ थांबवायचो नाही.

       माझ्या वर्गातील ज्ञानेश्वर नावाचा माझा एक मित्र होता, खूप हूशार! त्याला आम्ही नान्या म्हनायचो. त्याची अन माझी नेहमी वर्गात पहिल्या नंबर साठी चढाओढ असायची. मग माझ्या आत्यांनी एक शक्कल लढविली. मी खेळत असतांना माझी आत्या बोलवायला आली की, हळूच मला सांगायची नान्या अभ्यास करत आहे. तू खेळ म्हणजे यावर्षीही त्याचाच पहीला नंबर येणार. मग मी खेळणे थांबवायचो, अन अभ्यासाला लागायचो.

           दहावीत तर मी अभ्यासाचा एवढा ध्यास घेतला होता की, रात्री स्वप्नातही मला अभ्यास करत असल्याचा भास व्हायचा, मग मी कधी तरी बाजेवून उठून भितीवर काहीतरी लिहायचो. माझ्या घरच्यांच्या मनात तर भिती निर्माण झाली की, पोरगं रात्रीचं उठून कुठंतरी जाणार तर नाही ना! मग माझे काका माझ्या पॅण्टच्या लूप्सला दोरी बांधून स्वताच्या कमरेला बांधून झोपू लागले.

          दहावीची परिक्षा जवळ आली तशी मी अभ्यासाचा सपाटा वाढवला. सराव परिक्षा संपली होती. वर्गात सर्वात चांगले मार्क आले होते. अभ्यासासाठी शाळेला सुट्या लागल्या होत्या. जीव लावून आभ्यास करत होतो. पण मनात धूकधुकी कायम होती.

    दहावीचं परीक्षा सेंटर ईसापूरची शाळा आलं होतं.

          परिक्षेच्या दोन दिवस अगोदर मित्रांसोबत जायला निघालो. ईसापूरला रूम ठरवली होती. घर सोडून जायची पहिलीच वेळ त्यामुळे गहिवरून आलं होतं. घरच्यांच्या व शेजार्यांच्या सर्वांच्या पाया पडलो व आम्ही सर्वजण आयुष्यातील पहिली चढाई सर करण्यासाठी ईसापूरचे दिशेने रवाना झालो.

        परीक्षा सुरू झाली पहीला पेपर मराठीचा. अभ्यास ब-यापैकी झाला होता म्हणून पेपर सोपा वाटला. पण सविस्तर लिहीण्याच्या भानगडीत निबंधाला वेळ कमी उरला. मग काय? कवितेची सवय होतीच; दहाच ओळीचा पण पूर्ण काव्यात्मक निबंध लिहून टाकला.

हळुहळू पेपर सरत होते. गाणिताचा पेपर थोडा अवघड आला. एकही प्रश्न ओळखीचा वाटत नव्हता. का कुणास ठाऊक पण अंग थरथरायला लागलं होतं. हृदयाचे ठोके वाढले होते. काहीच सुचेना. दोन ग्लास पाणी पोटात टाकलं. पाच मिनीट शांत बसलो. राठोड सरांचे शब्द आठवले. पेपर कोरा सोडू नका!

           प्रत्येक प्रश्नाला मिळतीजुळती रीत वापरून सोडवले. एकदोन प्रमेय पाठ केली होती ती लिहून काढली. सर्व प्रश्न सोडवले. इग्लीशचा पेपरही जरा अवघड गेला. अश्या रितीने सगळे पेपर संपले. गाशा गुंडाळून घरी आलो. पण गणिताचा पेपर अवघड गेला होता ते मनातून काही केल्या जात नव्हते. कशातंच मन लागत नव्हतं. गणितात फेल झाल्याचे स्वप्न पडायचे अन झोपेतून घाबरुन उठायचो. मी खूप स्वप्न पाहीलीत त्या दृष्टीने दहावीत चांगल्या मार्कानं पास होणं आवश्यक होतं. मला मोलमजूरी करत आयुष्य काढायचं नव्हतं. दिवस कटत होते रिझल्ट ची वाट पाहत होतो.

           21 जून, रिझल्ट चा दिवस उजाडला. आमच्या शाळेचा रिझल्ट पहिले पूसदला वासंतराव  नाईक शाळेत बोर्डावर लागत होता व संध्याकाळी मस्के सर गॅझेट घेवून येत होते. त्यावेळी गावातल्या विद्यार्थ्यांना पाहायला मिळत होता. संध्याकाळ झाली तशी रिझल्ट ची वाट पाहणे सुरू झाले. मनात वेगवेगळ्या विचारांची कालकालव सुरू झाली.

फेल झाल्यावर नेमकं काय करायचं याचा विचार करत होतो. मस्के सरची चातकासारखी वाट पाहणं सुरू होतं. एक दोन वेळा फाट्यावर जाऊन आलो. पूसदवून येणा-या प्रत्येकाला रिझल्टबाबत विचारत होतो. पण त्यांना त्याच्याशी काही घेणंदेणं नव्हतं. त्यावेळी आजच्यासारखे मुबलक फोन अथवा मोबाईल नव्हते. आता मस्के सरची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.

           संध्याकाळी साडेसहा वाजता मस्के सर रिझल्ट घेवून आल्याचं कळालं. तसा सरांच्या वाड्याकडे धावलो. पण रीझल्ट पाहण्यासाठी भरपूर गर्दी होती. गर्दीत घुसण्याचा प्रयत्न केला पण घुसता आलं नाही. कुणीतरी सांगत होतं, गणितात पंधराजण फेल झालेले आहेत म्हणून. माझ्या पायाखालची जमीन सरकली की काय असं मला वाटत होतं. मी गपकन खालीच बसलो. त्या फेल होणा-यांत आपला नंबर आहे हे गृहीत धरून घरी आलो. घराजवळ वाड्यातील भरपूर गर्दी जमलेली दिसली. आता आपली काही खैर नाही. असा विचार करून खाली मान घालून घरी गेलो. घरी येताच संदीप भाऊनं डायरेक्ट उचलूनच घेतलं, व आत्यांनी तोंडात पेढा टाकला. काय झालं कळत नव्हतं. मग आत्यानं सांगितलं की मी पूर्ण शाळेतून पहिला आलो आहे. फक्त एक टक्क्याने  सेंटर मधून पहीला येण्याचा मान हुकला. संदीप भाऊ पूसदहून अगोदरच माझा रिझल्ट पाहून आला होता. बौध्द वाड्यातील सर्व लोकांच्या चेह-यावर आनंद दिसत होता. घरच्यांच्या आनंदाला पारावार नव्हता तरीही डोळ्यात पाणी आलं होतं. आत्याच्या पायाला हात लावताच. तिने मला कवटाळलं. मला मी घेतलेल्या मेहनतीचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.

        नंतर मला राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती पूरस्कार मिळाला. त्या पाच हजार रूपयाचा चेकची सर आज पाच लाखालाही येत नाही!

         काही झालं तरी माझं स्वप्न मला शांत बसू देणार नव्हतं. आयुष्यातील एक "चढाव" मी पार केला होता. बाकीची लढाई अजून बाकीच आहे!

 

"उजाडल्या नंतरचं स्वप्न"

(भाग ०२)

           दहावीचा रिझल्ट हातात आल्यानंतर मला माझ्या क्षमतांचा नेमका अंदाज आला. गणिताचा पेपर अवघड जाऊनही गणितात चांगले मार्क आले होते. रिझल्ट नंतर थोड्याच दिवसात अकरावीच्या अ‍ॅडमिशन विषयी चर्चा सुरू झाली. पूसद च्या नामांकीत पी.एन.कॉलेजला अ‍ॅडमिशन घ्यावी अशी मनात खुप इच्छा होती. पण पूसदला राहून कॉलेज करणे आर्थिक दृष्ट्या झेपणारं नव्हतं. म्हणून मग वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथे एल.एस.पी.एम. कॉलेजला अ‍ॅडमिशन घ्यायचे ठरले. मी नान्या,धम्मा(धम्मदिप, बब्या (ह्याचंही नाव धम्मदिप पण आम्ही त्याला बब्ब्याच म्हणायचो), अतूल, अनिल चव्हान, अनिल जाधव असा आमचा सातजणांचा कंपू होता. त्यापैकी मी आणि नान्या ने सायन्सला अ‍ॅडमिशन घेतली. बाकीच्यांनी आर्टला ॲडमिशन घेतली. अद्याप कॉलेज सुरू व्हायचे होते म्हणून घरीच होतो. पण मनात कॉलेजविषयी विविध स्वनं रंगवणे चालूच होते. कॉलेजच्या सोनेरी दुनिये विषयी वाचले, ऐकले होते त्याप्रमाणे स्वप्न रंगवत होतो खुलवत होतो. बारावीला चांगले मार्क घेवून डी.एड. करायचं  आणि काका(कांबळे सर) सारखं आदर्श मास्तर व्हायचं हेच उदिष्ट डोळ्यासमोर होतं. एक नवीन जग हात पसरून खुणावत होतं. मी त्यात सामील होण्यासाठी आतूर झालो होतो. हेच जग पुढे माझ्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवणार होतं.

            कॉलेज सुरू झाले तसे आम्ही सर्वजण मानोरा येथे जाण्यासाठी तयारी करू लागलो. स्वयंपाक करण्यासाठी लागणारी भांडी अंथरूण, पांघरूण अन धान्य अजून छोटंमोठं बरंच काही घरच्यांनी बांधून दिलं. बौध्द वाड्यातील तसेच मोहल्यातील सर्वांच्या पाया पडून आलो. सर्वजन जपून राहण्याचा व मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला देत होते. घरच्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. म्हणून मलाही रडू येत होतं पण रडत नव्हतो. मला कमजोर पडायचं नव्हतं. कारण मी रडलो असतो तर घरच्यांनी मला पाठवलंच नसतं हे मला माहीत होतं. माझे बाबा व नान्याचे बाबा आम्हाला सोडण्यासाठी सोबत येत होते. अश्या रीतीने आम्ही सातजण उरात एक नवीन स्वप्न बाळगून

बारावीचं शिखर यशस्वी पणे सर करण्यासाठी निघालो होतो. बापूच्या(सोपान मास्तर माझे दिवंगत आजोबा) समाधी समोर हात जोडतांना मी प्रण केला. काहीही झालं तरी चालेल पण मी माझ्या कुटूंबाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. हळूहळू गाव मागं पडत होतं, तसतशी मनात कालवाकालव सुरू झाली. घरच्या सगळ्यांचे चेहरे नजरे समोर येत होते. रडू येवू नये म्हणून मी उगाच डोळे लावून झोपल्याचं नाटक करत होतो. शेजारी बसलेल्या बाबांचा हात हळूवार डोक्यावरून फिरत होता. गाडी पूढे सरकत होती अन माझं आणि मानो-यातलं अंतर कमी कमी होत होतं.

         

"उजाडल्या नंतरचं स्वप्न"

(भाग ०३)

     संध्याकाळी पाच सहाचे दरम्यान मानोरा येथे पोहचलो. मानोरयाला डॉक्टर राठी यांचे ब्लॉकमध्ये दोन रूम महीनेवारी भाड्यावर बुक केल्या होत्या. एका रूममध्ये मी, नान्या, धम्मा आणि बब्या आणि दुस-या रूममध्ये बाकीचे तिघेजण असे राहायचं ठरलं. बाजारातून स्टोह, रॉकेल, भाजीपाला माझ्या व नान्याच्या बाबांनी घेवून दिला. ते एक दिवस मुक्कामी राहीले व आम्हाला त्यांनी सर्व समजावून सांगितलं. भावासारखे राहा भांडणं करू नका, वाटून काम करा असं बजावून सांगितलं. त्यावेळी त्याचा अर्थ समजला नव्हता पण आज जेव्हा मी त्या प्रसंगाची आठवन करतो त्यावेळी समजते की मायबापाला लेकराची किती काळजी असते. घरून आणलेला डब्बा सर्वजण मिळून जेवलो. झोपण्याचा खूप प्रयत्न केला पण झोप येत नव्हती. का कुणास ठाऊक पण घरच्या सगळ्यांची खूप आठवण येत होती. सारखं कूस बदलत होतो. मध्यरात्री नंतर कधीतरी झोप लागली. तेव्हा एक छानसं स्वप्न पडलं.

          दुस-या दिवशी सकाळीच माझे बाबा व नान्याचे बाबा गावाकडे जायला निघाले. आम्ही सर्वजन त्यांना गाडीत बसवायला चौका पर्यंत गेलो व गाडीत बसवून परत रूमवर आलो. एवढावेळ बाबा सोबत होते तर काही वाटत नव्हतं पण आता खूप भरून आलं होतं. कालपासून साठलेला हूंदका बाहेर पडू पाहात होता. आम्ही सगळेजण शांत होतो. कुणीही बोलत नव्हतं. तितक्यात बाजूच्या रूममधून मोठमोठ्याने रडण्याचा आवाज आला. म्हणून आम्ही चारही जण तिकडे धावलो. अनिल(चव्हान) मोठ मोठ्याने हुंदके देवून रडत होता. अन मला आईची(याडीची) खूप आठवन येत आहे मला घरी जायाचं आहे असं रडता रडताच म्हणत होता. त्याचं रडणं पाहून आम्हालाही रडू आलं. आम्ही सासरी जातांनी पोरी जश्या रडतात तसं एकमेकांच्या गळ्यात गळा टाकून मनसोक्त रडलो.थोडंसं हलकं झाल्यासारखे वाटलं. (अनिल त्याच दिवशी संध्याकाळी घरी गेला. मग एक आठवड्यानंतरच परत आला. तो पर्यंत आम्ही चांगले रूळलो होतो.)

          आमच्या कॉलेजचा टाईम सकाळचा होता. आज कॉलेजचा पहिलाच दिवस. त्यामुळे लवकर उठलो, तयारी केली आणि आम्ही सर्वजण नवीन ड्रेस घालून, सजून धजून नदीकाठचा कॉलेजला जाणारा रस्ता तुडवत कॉलेजच्या दिशेने रवाना झालो. मनात असंख्य भावनांची गर्दी झाली होती. आजपर्यंत खेड्यातल्या पाट्याच्या शाळेत शिकलो होतो. आज शहरातल्या नव्या पक्क्या आणि मोठ्या इमारतीत अनुभवी हुशार प्राद्यापकांच्या सानिध्यात शिकायला मिळणार होतं. त्यामुळे मनात एक ओढ होती.     उत्सुकता होती त्यामुळे मनात असंख्य विचार चालू होते तरीही पावलं झपाझप कॉलेजच्या दिशेने पडत होती.

           एकदाचं कॉलेजच्या समोर पोहचलो. कॉलेजची इमारत, जणू आमचीच वाट पाहत उभी होती!

 

उजाडल्या नंतरचं स्वप्न"

(भाग ०४)

         

          काॕलेजची इमारत मस्त होती.आणि प्रांगणही खूप मोठं.पहीला दिवस एकमेकांचा परीचय करून देण्यात गेला.बर्यापैकी मुलं ही आजूबाजूच्या खेड्यावरचीच होती.त्यामुळे सर्वांची शरीरयस्टी अन चेहरेपट्टी मिळती जूळतीच होती.त्यामूळे जरा बरं वाटलं.निदान यांच्यात रूळायला जास्त वेळ लागणार नाही.याचं समाधान होतं.

            आर्ट आणि सायंन्सचे क्लास वेगवेगळे चालायचे. पण मराठी आणि इंग्लिश चे क्लास एकत्र व्हायचे. तेवढ्या वेळापुरतं आम्ही सात जण एकत्र बसायचो. बाकीच्या क्लासला आमची विभागणी व्हायची. नान्या नी मी एका क्लास मध्ये आणि बाकीचे पाच जन वेगळ्या क्लास मध्ये. हळूहळू नवीन ओळखी झाल्या आणि मित्र जूळत गेले तशी कॉलेज मध्ये मजा यायला लागली. शशिकांत नावाचा जिवलग मित्र मला ह्याच कॉलेजने दिला. आम्ही दोघे एकाच बाकावर बसायचो व ब-यापैकी सोबतच असयचो. त्यामुळे आमच्यात एक भावासारखं नातं तयार झालं होतं. श्रीकांत, भास्कर, दिनेश पूरूषौत्तमशीही चांगली मैञी जुळली. सारख्या विचारांची मनं आपोआप जुळतात तसे आम्ही जुळत गेलो आणि आमचा सहा-सात जणांचा चांगला ग्रूप जमला.

           मराठीचे हांडे सर आणि इग्लिशचे वानखडे सर माझे आवडते प्राद्यापक होते. कारण दोघंही खूप मन लावून शिकवायचे. हांडे सरांची कवीता शिकविण्याची पद्धत खूपच छान होती. त्यांच्या प्रत्येक क्लासची आम्ही आतुरतेने वाट पाहायचो. त्यांच्या क्लासला वर्ग पूर्ण खचाखच भरलेला असायचा. मला वाचनाची व लिखाणाची आवड होती. त्यामुळे शिकवलेले लवकर लक्षात राहायचे. विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे स्वताः हात वर करून स्वताहून देवू लागलो. हळूहळू सर्वजन नावाने ओळखू लागले.बरं वाटायचं.आमच्या गावाचे जावई चव्हाण सर हे एमसीव्हीसी ला होते.त्यामूळे आधार वाटायचा.चव्हाण सरही आम्हाला अडी अडचणीला मदत करायचे.

             काॕलेज सकाळी साडेदहा-अकरा वा संपायचे चालत रूमवर पोहचायला साडेअकरा वाजायचे तोपर्यंत चांगली भुक लागलेली असायची.रूमवर जावून जेवन बनवायला लागायचं.आम्ही सर्वांनी कामं वाटून घेतली होती.माझ्या हिश्याला पोळ्या(चपाती) शेकायचे काम.नान्या पोळ्या लाटायचा व भाजी बनवायचा.धम्मा कनीक भिजवायचा व बब्या भांडी घासायचा.सुरूवातीला खूप अवघड गेलं.चपात्यात अनेक देशाचे नकाशे लाटले जायचे.भाजीत तीखटमिठ कमी जास्त व्हायचं.चपात्या अधरकच्या भाजल्या जायच्या.तरीही भुकेपूढे सर्व पचायचं.आम्ही स्वंयपाक झाल्या झाल्या त्यावर तूटून पडायचो.

कोण किती चपात्या खाते याची जणू शर्यतच लागायची.पाच दहा मिनीटात सर्व चपात्याचा फडशा पडायचा.उरलेली भाजीही पिवून टाकायचो.तरी पोट भरल्यासारखं वाटायचं नाही.घरच्या जेवनासारखं समाधान कधिच व्हायचं नाही.!

             नंतर नंतर तर चपात्या मोजून केल्या जावू लागल्या व सगळ्यांना सारख्या वाटल्या जावू लागल्या. चांगली भाजी झाली तर तीचीही वाटणी व्हायची. आता बरयापैकी स्वंयपाकात तरबेज झालो होतो. हळूहळू पोळ्यांना गोल आकार येवू लागला होता, व भाजीलाही चव येवू लागली होती. कॉलेजमधे ही हळूहळू रूळू लागलो होतो. सायंन्सचे सब्जेक्ट डोक्यात शिरत नव्हते तरी मन लावून अभ्यास करत होतो. सायंन्स डिक्शनीतील मराठी अर्थ पुस्तकावर लिहून रंगवून टाकले होते. हळूहळू अर्थ समजू लागला तसं कॉलेज मध्ये मन लागू लागलं. मनाला उभारी येवू लागली होती. कॉलेजमधलं "कूणीतरी" मनापासून आवडू लागलं होतं.

            "बरयाचदा आता तिचंच गोड स्वप्न पडू लागलं होतं.!"

 

"उजाडल्या नंतरचं स्वप्न"

(भाग ०५)

         

           दोन तिन महीन्यात एकदा बाबाची (मी त्यांना पप्पा म्हनतो) मनी आर्डर यायची व मनी आर्डर सोबत एक पत्रही यायचं पञात बरंच काही लिहीलेलं असायचं. तूच आमचा आधार आहेस. त्यामूळे जपून राहा चांगला अभ्यास कर. स्वताची काळजी घे असं बरंच काही असायचं. पत्र वाचून मग पून्हा नव्या जिद्दीने अभ्यासाला लागायचो. आपल्या घरच्यांचा ञास, मेहनत वाया गेला नाही पाहीजे आसं मनात ठान बांधायचो. त्यामूळे मी स्वताला कधी भरकटू दिलं नाही. कधीच कूठलंही व्यसन लागू दिलं नाही.

           दिवस जात होते. कॉलेजमध्ये चांगला रूळलो होतो. प्राद्यापक लोकही आता नावाने ओळखू लागले होते. मला मित्र खूप छान मिळाले होते. त्यामूळे घरची आठवन येणं हळूहळू कमी होत गेलं. कधीतरी टाकीजला मी आणि शशिकांत, नान्या, धम्मा असे चित्रपट पाहायला जायचो. तेवढंच बरं वाटायचं. प्रत्येक चित्रपटातून काहीतरी प्रेरणा घ्यायचो. कधीतरी स्वप्नातही एखाद्या चित्रपटाची स्टोरी दिसायची. त्यात हीरो मात्र मी असायचो.

            कधीकधी स्वंयपाकाच्या कामाचा खूप कंटाळा यायचा.काम करणे नको वाटायचं.हळूहळू कामावरून आमच्यात भांडणं होवू लागली.हेवेदावे वाढू लागले.मग काॕलेजवरून येता येता.कूणीतरी रस्त्यातच नास्ता करून येवू लागलं.जेवन बनविण्याची टाळाटाळ होवू लागली.कधी कधी मी आणि धम्मा फक्त पारलेजी बिस्कीटावर पूर्ण दिवस काढायचो.भुक लागली की पारलेजी बिस्कीट पाण्यात बूडवून खायचो.अन अभ्यास  करायचो.हळूहळू छोटेमोठे वाद वाढू लागले.अभ्यासावर परिणाम होत होता.मग मी एकट्यानेच वेगळा स्वंयपाक करण्याचा निर्णय घेतला.सर्वांना प्रेमाणे समजून सांगितलं व सर्व संमतीने एकटाच वेगळा झालो.आता एकाच रूममध्ये आमचे दोन बिर्हाड झाले होते.

          आता एकटाच असल्याने कूणाची वाट पाहावी लागत नव्हती.त्यामूळे झटक्यात जेवन बनवत होतो.दोन्ही टाईमचा स्वंयपाक एकाच वेळी बनवत होतो.त्यामूळे वेळ वाचायचा.कधी चव्हाण सरच्या तर कधी वलींदा आत्याच्या राशन कार्डवर राॕकेल घ्यायचो.त्यामूळे कधीकधी जर राॕकेल भेटलं नाही तर अडचण जायची दोनतीन दिवस फक्त नास्त्यावर भागवायला लागायचे.मी आणि धम्मा चौकातल्या हाॕटेलवरून रस्याचा आलूगोंडा खावून यायचो.बाकीचे कुठून तरी जुगाड जमवून जेवून यायचे.त्यासाठी वेगवेगळ्या यूक्त्या फंडे वापरायचे.

              निवडणूकांचे वारे वाहू लागले तसे अनेक प्रचार कार्यालयं ओपन झाली.त्यात कार्यकर्त्यांसाठी जेवन बनवलं जायचं. एक कार्यालय आमच्या रूमशेजारीच होतं त्याच्यामध्ये आमच्यापैकी चारपाच जन जेवून यायचे जेवन चांगलं मिळते याबद्दल रंगवून सांगायचे. एक दिवस मीही सोबत गेलो. जेवनाला पंक्ती बसल्या त्यात आम्हीही बसलो. पण वयामूळे आम्ही वेगळेच दिसत होतो. जेवनावर तुटून पडलो. जेवन चांगलं होतं. पोटभर जेवलो. जेवन झाल्यावर हात धूवत असतांना एक माणूस आला व त्याने अनिलचा हातच धरला व म्हणाला, तुम्हाला मी चारपाच दिवसापासून बघत आहे. तुम्ही शाळेचे विद्यार्थी आहे हेही मला माहीत आहे, पण असे दररोज येवू नका. उद्या आलात तर लक्षात ठेवा!

मला खूप लाज वाटली. उगाच गेलो असं वाटलं. नंतर मी कुठल्याच कार्यक्रमाला जेवनासाठी गेलो नाही. हे महाभाग मात्र लग्न, महाप्रसाद व बरंच काही जेवून यायंचे. मी आणि धम्मा मात्र स्टोह आणि रॉकेलशी झगडत राहयचो!

 

"उजाडल्या नंतरचं स्वप्न"

(भाग ०६)

           

              "वातावरण ढगाळलेलं

              तश्यात तुझं आगमन झालं

              तुझ्या रूपसौंदर्यानं

              मन माझं मोहून गेलं."

       

         ह्या ओळी मी तिच्यावर लिहीलेल्या. असंच अचानक पणे आभाळ भरून आलं होतं अन जिकडे तिकडे अंधार पसरलेला होता. वळीव आवकाळी पावसाची ती चाहूल होती. मी आणि शशिकांत असंच काही बाही लिहीत बसलो होतो. ती अजून वर्गात आलेली नव्हती. म्हणून माझं सर्व लक्ष ती कधी येते ह्या कडेच लागलेलं होतं.

          अचानक माझं दाराकडे लक्ष गेलं.तर ती वर्गात प्रवेश करत होती. तिची माझी नजर एक झाली. मी तिच्याकडेच पाहत राहिलो. ती खूप सुंदर दिसत होती. ती खूपच सुसंस्कृत आणि सोज्वळ होती. तिला कधीच मी जास्त मेकअप केल्याचं पाहीलं नाही. तरीही ती वर्गात सर्वात सुंदर दिसायची. तिचं सौंदर्य हे निसर्गदत्त होतं. म्हणूनच ती मला जास्त आवडायची. ती ही मला प्रतिसाद द्यायची पण. माझी तिला बोलण्याची कधीच हिम्मत व्हायची नाही. झाली नाही.! (मी फक्त तिला कॉलेजच्या शेवटच्या दिवशी बोललो).

            अकराविचं वर्ष सरत आलं होतं.मध्येच एकदा गावाकडे जावून आलो. घरी जावून आलो, की पाय आपोआपच जमिनीवर स्थिर व्हायचे नी पुन्हा अधिक जीव लावून अभ्यास करायचो. मी आणि घरच्यांनी पाहीलेली स्वप्न आठवायचो. मग आपोआपच बाकीचे विचार गळून पडायचे. स्वताला कधीच बहकू देत नव्हतो. अवांतर वाचन चालूच होतं. त्यातून प्रेरणा घ्यायचो व आपणही एक दिवस यांच्या सारखंच मोठा लेखक व्हायचंच असं मनोमन ठरवायचो. मी कवीता लिहीतो हे आतापर्यंत  ब-याच जणांना माहीत झालं होतं.

           अकरावीचे पेपर सुरू झाले. मराठी इग्लीशचा चांगला अभ्यास झाला होता. ते पेपर चांगले गेले, पण सायंन्स पीसीबीएम पैकी बायालॉजी सोडलं तर काहीच डोक्यात शिरत नव्हतं. त्यामुळे काहीच समजायचे नाही. सुचतील तसे व आठवतील तसे उत्तर लिहीत होतो. पण पेपर कोरा सोडत नव्हतो. गणिताच्या बाईंनी आएमपी क्वेश्चन्स दिले होते. तेव्हढे रटून पाठ केले, पण परीक्षेला पेपर मध्ये वेगळेच प्रश्न विचारले गेले. काहीच सुचत नव्हतं .मग मी शक्कल लढविली. जे प्रश्न पाठ करून आलो होतो, ते प्रश्न क्रमांक तेच पाच प्रश्न लिहीले व पाठ केलेलं उत्तर लिहून टाकले.

सर्व पेपर संपून उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या. सुट्यात घरी आलो. एखादा आठवडा घरी राहीलो. त्यानंतर आईबाबाकडे पुण्याला गेलो.

         आई बाबा (पप्पा) पुण्याला राहायचे व सीडब्लूपीआरएस या सरकारी कंपनी मध्ये काँन्ट्राक्टर कडे काम करायचे. त्यांनी आमच्यासाठी खूप मेहनत घेतली. खडकवासला येथे सुद्धा माझे चांगले मित्र झाले होते. तिथे आम्ही प्लस्टीक बालने क्रिकेट खेळायचो. मज्जा यायची. आमच्या रूमच्या शेजारी भंगार व रद्दी वाल्याचे दुकाण होते. रद्दी वाल्याला मी घरचे पेपर नेऊन दयायचो व त्याबदल्यात रद्दीतले जुने पुस्तकं हूडकून काढायचो, व वाचायचो. खूप चांगली चांगली पुस्तकं मला याच रद्दीच्या दुकानात मिळाली.

           आई बाबा रोज कामावर जायचे. फक्त आठवड्याला रविवारी सुट्टी असायची. रविवारी आई आठवडा भराचे राशन निलेशच्या दुकाणावरून आणायची. कधीकधी मीही कामावर आईसोबत जावू लागलो. मला सिमेंट क्राँक्रीटच्या नवीन कामावर पाणी मारून भिजवीण्याचे काम मिळाले होते. मी कॅनालमधून प्लॅस्टिकच्या बादलीने पाणी काढून आणायचो व बांधकामावर मारायचो त्याची मला शंभर रुपये मजूरी मिळायची. आठवड्याला रविवारी पगार मिळाला की बरं वाटायचं. आपणही आपल्या कुटूबांला काहितरी हातभार लावतोय याचं समाधान असायचं. पण माझा मार्ग वेगळा आहे हे मला माहीत होतं. म्हणूनच हे काम करत असतांनाही मनात मात्र विचार खूप मोठे असायचे!

           माझे विचार आणि माझे "स्वप्न" माझ्यासोबत होते म्हणूनच मी इथपर्यंत आलोय. नाहीतर कुठंतरी हरवलो असतो. कुठल्यातरी गवंड्याच्या हाताखाली बिगारी काम करत बसलो असतो! 

   

 

"उजाडल्या नंतरचं स्वप्न"

 (भाग ०७)

 

           पुण्याला असतांनाचे दिवस मजेत जायचे. कारण आई बाबा फक्त तेवढे एकदोन महीनेच सोबत असायचे. बरं वाटायचं. बाबांना पूर्वी दारूचं खूप जास्त व्यसन होतं. पण मी जसा जसा मोठा होत गेलो तसतसं व्यसनही सुटत गेलं.(मी पीएसआय झाल्यावर बाबांनी दारू सोडली ती कायमचीच). कधी दारू पिऊन आले की बांबाना सहन व्हायचं नाही. मग विनाकारण आईशी भांडण करायचे व कधीकधी मारायचेही. खूप वाईट वाटायचं. नकोसं व्हायचं. दारूमुळेच आमच्या घराचं खूप नूकसान झालं होतं. मग मनाशी ठरवून टाकलं आयूष्यात कधीच दारूला स्पर्ष करायचा नाही.("सूरा मेरय्य मज्ज पमादठाणा वेरमणी,सिख्खा पदंम समादियामी" ह्या शीलाचं पालन मी मनापासून करत आलो आहे.).

            दररोज कामावर जाणं चालू होतं. बारावीच्या पुस्तकांसाठी पैसे जमवत होतो. प्लास्टीकच्या बकेटने कॅनाल मधून पाणी काढायचो व बांधकामावर मारायचो. कामावर बहुदा मी एकटाच असायचो. आईबाबा दुस-या साईटवर असायचे. एक दिवस पाणी काढत असतांना शेवाळा वरून पाय घसरला व सरळ कॅनालमध्ये पडलो. हातातली बकेट वाहात दूर निघून गेली. अचानक पाण्यात पडल्याने नाकातोडांत पाणी गेलं. थोडं पोहनं  येत होतं पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने माझं काही चालत नव्हतं. वाहत चाललो होतो. कॅनालच्या बाजूंना पकडायला कुठेच जागा, कपारी नव्हती. सर्व गुळगुळीत होतं. भीती वाटायला लागली. सर्व जीव एकवटून हात पाय मारत होतो. पण फायदा होत नव्हता. पाण्याचा प्रवाह मागे खेचत नेत होता. जोरजोराने ओरडत होतो. तितक्यात एक 25-30 वर्षाची स्ञी धावत आली. ती बाजूच्या कामावर काम करत असावी, किवां काय माहीत नाही. ती वाकून मला हात देण्याचा प्रयत्न करत होती पण पात्र रूंद असल्याने हात पोहचत नव्हता. मग अचानक तिला काय सुचले माहीत नाही. पण तीनं तिच्या कमरेला खोचलेला साडीचा पदर सोडला, व एक घेरा सोडून एका कोपरयाला धरून माझ्या दिशेला फेकला .मी तो दोन्ही हातात धरला. साडीच्या दूसरया कोपरयाला धरून तीने मला कॅनालच्या बाहेर निघायला मदत केली. तिचे कसे धन्यवाद मानावे कळत नव्हते.  काय बोलावे तेही कळत नव्हते थोड्या वेळाने बाकीच्या बाया व ईतर मानसंही आली. बरंच झालं आई बाबा दूरच्या साईटवर होते ते नाहीतर घाबरले असते. अंगातले सर्व कपडे भिजले होते .बकेट वाहून गेली होती. थोडावेळ एकाच जागी बसलो. सर्वजन निघून गेले. ती आनोळखी स्ञिही निघून गेली. तिचं नाव गाव, काहीच माहीत नाही. तो प्रंसंग आठवला की मी आजही त्या अनामिक स्ञिला मनापासून धन्यवाद देतो.

             सुट्या संपत आल्या होत्या.बाराविचं वर्ष सुरू होणार होतं. मनात विविध स्वप्नं रंगवनं चालू होतं. आई बाबा व मी आम्ही घरी गावाकडे आलो. त्यांनी मला पूसद वरून चांगले कपडे व बूट घेवून दिला. यावर्षी  बारावीचं वर्ष असल्याने सर्व समजावून सांगत होते. पूसदला मास्तर बाबा(कांबळे सर-माझ्या वडीलांचे काका) व आजीला भेटून आलो.मास्तर बाबांनी यंदा महत्वाचं वर्ष आहे. चांगला अभ्यास कर. लिहीण्याचा सराव कर असं सांगितलं!              

              घरच्यांच्या माझ्याकडून भरपूर अपेक्षा होत्या आणि मला त्या   ख-या करून दाखवायच्या होत्या. दहावी सारखंच बारावीचा गडही यशस्वीपणे पार करायचा होता..!

 

 

"उजाडल्या नंतरचं स्वप्न"

(भाग ०८)

         

          बारावीचं वर्ष सुरू झालं.आम्ही सर्वजन मानोरयाला गेलो.आता आमच्या सात जनांचे बरेच गट पडले होते.सर्वांनी सोबत राहणं अवघड वाटू लागलं.मी एकट्याने रूम करण्याचा निर्णय घेतला.एकट्याला रूमचे भाडे परवडण्यासारखे नव्हते.पण अभ्यास करण्यासाठी मला वेगळे राहणे आवश्यक होते.

          मी नवीन रूमची शोधाशोध सुरू केली. पण पाहीजे तशी रूम मिळत नव्हती. भाडे खूप जास्त सांगायचे, त्यामुळे काय करावे कळत नव्हते. चारशे पाचशे रूपये रूमभाडे एकट्याने कुठून दयावे ह्याचाच विचार करायचो. घरच्यांना जास्त काही सांगायचो नाही. पुरूषौत्तम मला त्याच्यासोबत त्याच्या घरी "तळप" येथे राहायला विनंती करायचा पण माझ्या स्वाभिमानी स्वभावाला ते पटायचं नाही. एकदा तो हट्टाने मला त्याच्या घरी तळपला घेवून गेला. पुरूषौत्तम चे आई वडील पण खूप छान आहेत. त्यांनी पण मला तळप येथे घरी राहण्याचा आग्रह केला. पण मी तो नम्रपणे नाकारला. पूरूष्षोत्तम माझा खूप चांगला मित्र आहे. पण माझी जबाबदारी दुसरया कुणावरतरी पडावी हे मला रूचलं नाही.

          काही दिवसानंतर मी आणि पुरूषौत्तमनी रूम शोधली. शिवाजीनगर मध्ये प्रधान काकू यांच्या घरी दोन रूमचा ब्लॉक होता. साडेतीनशे रूपये भाडे द्यायचे ठरले. रूम चांगली होती पण एकटा राहायचो त्यानं करमायचं नाही. त्या सहा जनांसोबत आतापर्यंत राहीलो होतो. त्यामूळे एकप्रकारची सवय झाली होती. मग मी अभ्यासात जास्त लक्ष घालू लागलो. जवळच एक सार्वजनिक वाचनालय होते. त्याचा सभासद झालो व पुस्तकं वाचायचा सपाटा लावला, हळूहळू रूळू लागलो.

          कॉलेज सुरू झालं होतं. आता थोडं थोडं डोक्यात शिरू लागलं होतं. त्यामूळे कॉलेजमध्ये जास्त मजा येवू लागली होती. एकही दिवस कॉलेज  बुडवायचो नाही. ती ही कॉलेजला रोज यायची. अशीच कधीमधी आमच्या नजरेची जुगलबंदी व्हायची. तिच्याकडे बघीतलं की बघतच राहावसं वाटायचं. पण त्याच्यापुढे कधीच गेलो नाही.

            शशिकांत व धम्मदिप कधीकधी रूमवर यायचे. मग आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचो. कधीतरी पीठी भाजून खायचो. गव्हाचं पीठ तेलात भाजून त्यात साखर मिसळून खायला छान लागते. त्याला आमच्या गावठी भाषेत पिठी म्हणतात. कधी कधी स्वंयपाकाचा कंटाळा आला की फक्त पीठीच भाजून खायचो. पोट भरण्याशी मतलब. आवडी निवडी जोपायची परिस्थिती नव्हती. कधी कधी नानव्हेज खायची खूप इच्छा व्हायची. पण चिकन मटन परवडायचं नाही. एकदा आलेल्या पैशात महीना भागवायला लागायचा. मग दूकानातून दोन अंडी घेऊन यायचो व छान अंडाकरी बनवून भरपेट खायचो. या सगळ्या खटाटोपीत एक गोष्ट मात्र चांगली शिकलो होतो. पैशाचं आणि वेळेचं नियोजन, जे मला नंतर खूप उपयोगी पडलं.

           एकदोन महीना रूमवर एकटाच राहीलो .नंतर कळलं की बाकीच्या मुलांचेही आपसात वाद झाले होते. त्यानींही रूम सोडली होती. धम्मा, बब्या, अनिल जाधव व अनिल चव्हान यांनी चौकातल्या लॉजवर रूम केली होती. पण नान्याला आणि अतूलला रूम भेटत नव्हते. नान्याच्या स्वभावामुळे बाकीचेही त्याला सोबत घेत नव्हते. त्यानंतर नान्याने व अतूलने मला विनंती केली मलाच त्यांची दया आली. मी त्यांना हो म्हटलं पण वाद करायचे नाही ही अट घातली. परत आता आम्ही तिघेजण एका रूम मध्ये राहू लागलो.

        बारावीचं वर्ष असल्याने सगळे अभ्यासात व्यस्त होत गेले. हळूहळू वाद मागे पडत गेले. परत आम्ही सातही मित्र एकमेकांसोबत जुळत गेलो.


Rate this content
Log in