"ती सध्या कशी दिसते"
"ती सध्या कशी दिसते"
ती सध्या काय करते चित्रपटाने आधीच डोक्यात काहूर माजवून ठेवले होते. ती योगा करते माहिती होते पण ती सध्या अजून काय करत आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच होती आणि आहे. पण ती एक दिवस अशी अचानक समोर येईल असे वाटलं होतं का...तर हो... असं बऱ्याचदा वाटलं होतं... की कोणत्यातरी सिग्नलवर, रोड क्रॉस करतांना ती समोर दिसेल, कोणत्यातरी मॉलमधे अचानक समोर येईल आणि ती समोर आली तर मी कसा वागेल त्याची मी बऱ्याचदा रंगीत तालीम पण केली होती.
पण तो दिवस कधीच आला नव्हता मागच्या १४ वर्षात. पण ती आज अचानक समोर आली... ध्यानीमनी काही नसतांना... ते पण जिल्हा परिषद शाळेत... आपली जुनी मैत्रीण अजून जिल्हा परिषद शाळेत भेटेल असे कुणालाही स्वप्नात पण वाटणार नाही,,, पण आज तेच घडलं... निमित्त होतं मुलांची स्कॉलरशिप परीक्षा. माझी मोठी मुलगी तिला सोडायला म्हणून शाळेमधे गेलो... सोडून पायऱ्या उतरून खाली येत होतो तोच खालून कुणीतरी वाकून बघितल्याचं जाणवलं... एक सेकंद नजरानजर झाली पण... तिने पण ओळख नाही दाखवली आणि मी पण नाही... 'ए जिंदगी गले लगा ले' म्हणत अक्टीव्हा स्टार्ट केली आणि निघालो... पुढे प्रत्येक क्षण विचार करीत राहिलो... हीच होती का ती रंगीत तालीम... हे असचं वागणार होतो का मी तिच्याशी...
१४ वर्षापूर्वी होणाऱ्या बायकोसोबत प्रतारणा नव्हती करायची म्हणून मी हिला सांगितलं होतं... आता आपण नाही भेटणार... कधीच नाही... आणि त्या दिवसानंतर ते आजपर्यंत साधं एकमेकांसमोर पण नव्हतो आलो... पण तो दिवस आलाच... ५ किमी गाडी घेऊन मे पुढे आलो... विचार केला... काय करत असेल सध्या... मधे एक तास ब्रेक आहे... कॉफीसाठी विचारू शकतो का तिला... तेव्हड्या गप्पा होतील आणि ती सध्या काय काय करत आहे हे पण कळेल... आपल्या आयुष्यात काय चालू आहे हे पण सांगता येईल... बायकोसोबत प्रतारणा होणार... वाटलं कदाचित नाही... साधं कॉफीसाठी तर भेटणार होतो त्यात काय झालं... गाडी वळवली... परत शाळेत पोहोचलो... काही घडलं नाही असा अविर्भाव ठेवायचा हे ठरवलं... आणि आपण तिला जस्ट आत्ताच पाहिलं... पाच किमी पुढे जाऊन परत आलो वगैरे वगैरे असलं काही बोलायचं नाही... शाळेत पोहोचलो तर ती दोन माणसांसोबत बोलत होती... तिला न बघताच अक्टीव्हा गेटच्या आत घातली... तो कदाचित तिचा नवरा असावा असं वाटलं... कॉफीचा बेत पार फसला होता... रणरणत ऊन पडलं होतं; तशीच गाडी लावून थोड्यावेळ घुटमळलो, ती निघून गेली होती... कशी माहिती नाही... कुठे माहिती नाही... पण आज ती दिसली होती... १४ वर्षानंतर .. बोलता नाही आलं याच दु:खं तर आहेच...
ती सध्या काय करते हे समजलं नाही याचं वाईट वाटत आहे... पण एक मात्र आहे... ती सध्या कशी दिसते हे कळालं... आज १४ वर्षानंतर पण मला पाच किमी वरून परत बोलावून घेण्याची तिच्यात आजही ताकद आहे... ती परत अशीच कुठेतरी एक दिवस नक्की समोर येईल... त्या दिवशी मी कसा वागेल हा तो दिवसच सांगेल... पण तोपर्यंत आजच्या दिवशी दिसलेला चेहेरा आठवणीत राहणार... हा गडी खुश आहे आज!