Sneha Kolge

Others

3  

Sneha Kolge

Others

ती आणि नियती.

ती आणि नियती.

7 mins
9.1K


   मोबाईलवर गाणी ऐकत निद्रादेवीच्या अधीन होणे हाच होता रोजचा शिररस्ता, यात व्हायचा कधी कधी बदल, मोबाईलच्या जागी पुस्तकही सोबत करायची. पुस्तकही सगळी मनाला सकरात्मकतेचे संस्कार करणारी. कुठलीही नकरात्मकता मनाला स्पर्शही करणार नाही, याची खूप काळजी घ्यायची ती दिवसभर. ती आणि तिचा अभ्यास हाच तिचा दिनक्रम. घरचे वातावरणही तिला मदत करणारे असायचे.

   त्या रात्रीही ती पुस्तक वाचत होती, खूप प्रयत्न करूनही तिला झोप येत नव्हती. तिचं तिलाच कळत नव्हते, झोप न येण्याचे कारण. ती डोळे मिटून शांत पडून राहिली, मनातल्या मनात एक ते दहा अंक मोजत. सरतेशेवटी झोप लागली तिला.

   अचानक पहाटे जाग आली तिला, हवेत बराच गारवा होता, पंखाही आपल्या वेगाने रोजच्या सारखा चालू होता. तिला अचानक जाणवले की, काहीतरी लागलं होतं तिच्या हाताला. तिने लाईट चालू केली, प्रकाशात तिला दिसून आले की, उजव्या हाताच्या मनगट नी ढोपराच्या मध्यभागी 'एक लांब ओरखडा दिसला. त्यातून रक्त येत होते. कापसाने ते रक्त तिने पुसून काढले. तिच तिलाच हसू आलं, मग स्वतःशी म्हणाली, 'नखं फार वाढलीत' कापायला हवीत. नंतर तिच्या लक्षात आले, की...

'कालच तर तिने दोन्ही हात आणि पायांची नखे कापली होती.   

   तिने उठून तोंडावर पाणी मारले, पण चेहरा मात्र वेदनेने चरचरू लागला. बाथरूम मधल्या आरशात तिने स्वतःचा चेहरा निरखायला सुरवात केली, तिला आता चेहऱ्यावरचा प्रत्येक ओरखडा दिसू लागला होता. बारीक बारीक ओरखडे अस्तित्वाची ग्वाही देत होते. तिचं तिलाच कळत नव्हतं काय घडलं होतं?  ती विचारात पडली, एवढे ओरखडे कसे, कुठून आले चेहऱ्यावर, ती वारंवार स्वतःचा चेहरा निरखू लागली. बोटाने चेहरा चाचपू लागली. अस्वस्थ झाली होती ती. काय सांगणार होती ती कोणाला? तिचं तिलाही माहीत नव्हतं.

    सगळे विचार बाजूला सारून तिने चहाचे आधण गॅसवर ठेवले. पण तिचे विचार तिला स्वस्थ बसू देईनात. तिला 'ओरखडे' खटकत होते. आता डाव्या गुडघ्याला मार लागल्यासारखा अनुभव येत होता. पण ती कुठेच पडली नव्हती. तिने गुडघा निरखून पाहिला, साधं खरचटलं देखील नव्हतं, पण कुणीतरी हातोडी मारल्यावर जसे दुखते तसे दुखत होते. कंबर फार दुखत होती, अंगात बारीक ताप होता, अचानक सर्दी झाली होती.. खूप दिवसाची आजारी असल्यासारखे तिचं तिलाच जाणवायला लागलं होतं. काल रात्रीपर्यंत अगदी धडधाकट असलेली ती, सकाळी अचानक 'आजारी' पडली होती.

    तिला तिचे प्रश्न स्वस्थ बसू देत नव्हते, ती सतत काहीतरी आठवायचा प्रयत्न करत होती. जे तिचे तिला ठाऊक होते, पण उमगत नव्हते. बुद्धीला ताण देऊन देऊन ती थकून गेली होती. आता तर पूर्ण शरीर दुखत होते. कणकणी आली होती तिला. बाहेर दुपारचे ऊन पडले होते, हिला आत थंडी वाजत होती.

   घरचे सगळे गावी गेले होते, ती मात्र परीक्षा असल्यामुळे जाऊ शकली नव्हती घरच्यांसोबत, पण परीक्षा संपल्यावर तीही जाणार होती गावी.. ती शांत पडून राहिली बेडवर. डोळे मिटून.

    तिला आवाज ऐकू येत होता, 'मी एकटाच आहे इथे, तू येशील माझ्यासोबत?'

 'नाही, कधीच नाही' ती जोरात किंचाळली. ती उठून बसली, घामाघूम झाली होती ती, घड्याळात दुपारचे चार वाजले होते.

  तिला हल्ली असेच स्वप्न पडत होते, दिवस असो की रात्र.. त्यात तिला असेच शब्द ऐकू येत होते. ती नेहमी दुर्लक्ष करत होती. कारण 'असं काही असतं'. या विचारानेच ती हसायची.

   कधी कधी मात्र तिला अचानक मागून कोणीतरी 'बूट' वाजवत चालल्याचा आवाज यायचा, पण  'त्या आवाजाचा' शोध मात्र तिला लागत नसे.

    तिला खूप वाटायचे की, तिला जे भास होत आहेत, जे स्वप्न पडत आहे, ते कोणाला तरी सांगावे, पण 'आपल्याला वेड्यात काढतील'. असे तिला वाटायचे आणि सगळे मनातच राहायचे. पण काल रात्री जे घडले, ते मात्र विचित्र आणि अनाकलनीय होते.   

   दिवसभर काहीच अभ्यास झाला नव्हता, तेव्हा रात्रभर अभ्यास करावा असा विचार करून ती अभ्यासाला बसली, पण पुस्तक वाचता वाचता ती केव्हा झोपी गेली तिचे तिलाही कळालेच नाही. ती तशी झोपेत होती, पण गाढ झोपेत नक्कीच नव्हती. तिला जाणवत होते, तिच्या दोन्ही हात 'कोणीतरी' एकावर एक ठेवले होते. तिला  काही लोक दिसत होते, एक ५५ वर्षांची म्हातारी व्यक्ती 'तिला नमस्कार करून उंबरयाच्या बाहेर जाताना दिसला. ती थोडी पुढे गेली, तिथे तिला एक दुःखी जोडपे दिसले, ती तिथे थांबली, ते जोडपे तिला स्वतःच्या मरणाची कथा सांगत होते, त्यांनी तिच्याकडून वचन घेतले की, ती त्यांच्या मुक्ती साठी प्रार्थना करेल' ती पुढे पुढे जात राहिली, तिला शेवटी दिसला तो, तो तिच्याकडे पाहत होता, त्याने तिला विचारलं, 'राहशील तू माझ्यासोबत इथे?'  तिला आवाज ओळखीचा वाटला, 'तो आवाज तोच होता, जो ती स्वप्नात ऐकत होती.

   'नाही.' ती तिच्या तोंडून किंकाळी निघाली.

  ती झोपेतून उठली. सावरली ती थोडी. ठरवले होते तिने की आज काय तो सोक्षमोक्ष लावायचाच.

  ती परत तशीच हातावर हात ठेवून झोपी गेली. आता तिला फक्त तो दिसत होता, ती बघत होती त्याला, एखाद्या सैनिकासारखा तो. त्याचे बूट मात्र तिने ओळखले.

    "कोण आहेस तू, का त्रास देतोस मला?"

"तू, तुझं शरीर, सर्वकाही तुझे जे जे आहे ते आवडते मला, मी माझी सर्व शक्ती पणाला लावीन पण तुला कुठेही जाऊ देणार नाही."

   ती झोपेतून उठली. आता तिचं तिलाच कळत नव्हते, 'ती कोण होती? कोण होती? ती माणसं, जी तिला सांगत होती, की आमच्या मुक्तीसाठी प्रार्थना कर, काय साध्य होणार होत तिच्या प्राथनेतून, त्यांची मुक्ती, खरंच कोण होती ती. तिला नमस्कार करून जाणारा तो 55 वर्षांचा म्हातारा, काय जाणत होता तो तिच्या बद्दल, जो तिला नमस्कार करत होता. आणि तो सैनिक, तो का म्हणत होता तिला, 'तुला कुठेही जाऊ देणार नाही मी?'

      एव्हाना सकाळ झाली होती, तिचे विचारचक्र चालूच होते. आज तिचा शेवटचा पेपर होता. तिने परीक्षेला जायची तयारी केली.

   पेपर तसा छान गेला, केलेला अभ्यास कामी आला होता. पण अजूनही तिचा स्वतःचा शोध 'बाकी' होता. ती चालत चालत समुद्र किनारी येऊन बसली होती. स्वतःच्याच विचारात. एकच प्रश्न सतत विचारत होती स्वतःला, 'कोण आहे मी?' 'काय आहे असं माझ्यात जे माझं मला ठाऊक नाही?'

     गावी येऊन तिला चार-पाच दिवस झाले होते, वातावरण बदलले, ती आपल्या माणसांत आली होती. एकांतात मात्र तिला, पुन्हा प्रश्न सतावायचा, 'कोण होती ती?  स्वतःच नाव, गाव, जन्म, आई-वडील सगळे तर ठाऊक होते तिला. पण तरीही शोधत होती ती स्वतःला.

   गावात पारावर गर्दी जमली होती, कोणी 'अध्यात्म' या विषयावर प्रवचन देणार होते. ती तशी 'अध्यात्म', उपास, पूजा यापासून दूर राहणारी होती. तरीही तिची पाऊले पाराकडे चालू लागली.

   पाराजवळच्या मैदानात खुर्च्या, टेबल लावले होते, आणि स्टेजवर एक बोर्ड लावला होता, त्यावर व्याख्यात्याचे नाव लिहिले होते, डॉ. महादेव कालचक्रे. ती मन लावून व्याख्यान ऐकत होती. हळूहळू तिचा कर्मकांड आणि अध्यात्म यातील जो गैरसमज होता तो दूर होऊ लागला. व्याख्यान संपले होते, तिला मनापासून वाटले की, सरांना आपले प्रश्न विचारावे.

   "सर, मला तुम्हाला काही विचारायचे आहे."

  "शेवटी, घ्यायला लागलीस स्वतःचा शोध, वाह, हेच हवं होतं नियतीला तुझ्याकडून, छान! मी तुझ्याच प्रश्नांची उत्तरं द्यायला आलो आहे, विचार तू प्रश्न."

   तिने सगळ्या घटना सविस्तर सांगितल्या डॉ. महादेव कालचक्रे यांना..  

  'अस नेहमी होत का?'

"हो, घटना घडायच्या अगोदर समजते मला, की काय घडणार आहे, पण मला वेळ सांगता येत नाही, खूप स्वप्न पडतात ज्याचा माझ्या विचार सरणीशी काही संबंध नसतो, काही लोक मला येऊन त्यांची व्यथा सांगतात. मुक्तीची याचना करतात. "

  डॉ. हसले. आणि म्हणाले, "गोंधळून जाऊ नकोस मुली, तू त्या व्यक्तींपैकी आहेस, ज्यांना soul to soul connect  होता येते, तुझ्याशी मृत व्यक्ती जे अद्याप मुक्त झाले नाहीत ते मुक्तीची याचना करतात, कारण तुझ्या प्रार्थनेत 'कालचक्र' बदलण्याची ताकद आहे. म्हणून त्या मृत व्यक्ती तुझ्याकडे 'त्यांच्या मुक्तीची मागणी करतात.' जो सैनिक तुला सारखे सारखे 'सोबत चल' असे म्हणतो, तो देखील मृत आहे, पण त्याचा आत्मा आजही खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे, त्याला तू खूप आवडतेस, पण दूर रहा त्या सैनिकापासून कारण तू 'मनुष्ययोनीत' आहेस आणि तो फक्त एक आत्मा."

   "तुझ्या दैवी शक्ती तुझ्यासाठी वरदान तर आहेच कारण, यामुळे तू प्रत्येक व्यक्तीचे विचार, 'ज्या व्यक्ती तुझ्याशी जोडलेल्या आहेत त्यांचे तुझ्याबद्दलचे विचार जाणून घेऊ शकतेस.' तुझा sixth sense  तुला नेहमी जाणीव करून देईल पुढे काय घडणार. तुझ्या प्रार्थनेमुळे मृतव्यक्तींना (जे अकाली मृत्यू पावले आहेत, आणि जे तुला स्वप्नात येऊन त्यांचे दुःख सांगतील आणि मुक्तीची इच्छा व्यक्त करतील फक्त त्यांनाच) मुक्ती मिळेल, तसेच तू सजीव व्यक्तींसाठी कधी प्रार्थना केलीस तर त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. तुझ्या शक्तींचा वापर तू 'लोकहितासाठीच' कर. हेच तुझे 'कर्म' आहे, पण कधीही 'नियती' बदलू नकोस. कोणाचीही. वेळोवेळी तुला तुझ्यातल्या शक्तींची जाणीव होईल. गोंधळून जाऊ नकोस.

   एक महत्वाचे, 'त्या सैनिकापासून मात्र दूर रहा, त्याच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर होकारात देऊ नको. तू त्याला जेवढा नकार देशील तो तितका दूर जाईल, पण तो तुला त्रास देईल, तुझ्या 'चेहऱ्यावरचे ओरखडे' आठवतात ना! त्याच्यापासून तुला स्वतःची सुटका करून घ्यावी लागेल."

 'पण मी हे कसे करू?'

"तू काहीच करू नकोस, तू एका अशा व्यक्तीच्या प्रेमात पडशील, ज्याच्या प्रेमात इतकी ताकद असेल की त्या सैनिकाला तुझ्यापासून दूर जावेच लागेल. फक्त त्या व्यक्तीच्या प्रेमाला ओळख. कारण हे ओळखणं सहज सोपे नक्कीच नाही.. कारण 'तो सैनिक' तुला तुझे प्रेम मिळू नये यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील. त्याची सगळी शक्ती पणाला लावेन. तुला लढावं लागेल स्वतःच्याच प्रेमासाठी.

  "तू जिथे जाशील तिथे समृद्धी, संपत्ती घेऊन जाशील, पण कोण आपले , कोण परके याची शहानिशा करत जा. कारण 'तुझ्या नशिबाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करणारे खूप असतील. तेव्हा नेहमी सावधान रहा."   

 "ताई, ए ताई, चल ना घरी, सगळे वाट बघत आहेत तुझी."

छोटा भाऊ तिला हाक मारत होता.

  "अरे, मी इथे व्याख्यान ऐक...."

 तिने अवतीभोवती पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते, दुपारच्या उन्हात पारावर ती एकटीच होती.

ते, व्याख्यान, तो स्टेज, खुर्च्या आणि, आणि ते डॉ. महादेव.. कोणीही, काहीही नव्हते तिथे...

तिच्या लक्षात आले होते, ती थोडी वेगळी होती ना.. सर्वांपेक्षा.. तेव्हा तिला पडणारे प्रश्न , त्या प्रश्नांची उत्तरं.. सगळे वेगळेच होते.  ती तिच्या प्रश्नांची उत्तरं शोधत होती तिच्या पद्धतीने. तिला उत्तरे मिळाली होती आणि मिळणार होती नियतीच्या वेळेप्रमाणे.

 

     

 

   

 

 

   

   

 

 


Rate this content
Log in