ते दोघे बोलत होते
ते दोघे बोलत होते
पावसाने नेहमीसारखेच योग्य वेळ पाहून त्याची हजेरी लावली. म्हणजेच कॉलेज, ऑफिस सुटण्याची. मी पण कॉलेज संपवून मित्रा सोबत रूम वर येतच होतो पण पावसामुळे एका मंदिरात थांबलो. ज्या देवाने आसरा दिला त्याचे दर्शन घेऊन मंदिर बाहेर असलेल्या एका शेड खाली आम्ही दोघे मित्र उभे राहिलो. वेळ संध्याकाळची होती म्हणून आमच्या सारखे अनेक लोक पावसापासून वाचावे म्हणून तिथे उभे होते, काही शेड खाली, काही मंदिराच्या आडोश्याला तर काही तिथे असलेल्या एका झाडाखाली उभे होते.
तितक्यातच मी पहिले कि एका झाडाखाली…
“ते दोघे बोलत होते...
कधी हसत होते…
कधी रुसत होते…
आपलं मन मोकळं करत होते…
पण ते दोघे बोलत होते...”
पण या वेळेत आमच्यासारखेच इतरांचे मन आणि बोटे मोबाईल मध्ये गुंतले
होते. तर काहींचे मोबाईल कानाला लागले होते. पावसामुळे लाईट पण आता गेली होती.
“आमचे चेहरे मोबाईल च्या उजेडाने चमकत होते आणि त्या दोघांचे रस्त्यावरून जाणाऱ्या
गाड्यांमुळे जसा पावसाचा जोर चालू होता तसेच त्यांच्या भांडणाचा जोर चालू होता कधी
तो तर कधी ती… एकमेकांवर बरसत होते...
पण ते दोघे बोलत होते ”
आता पाऊस पण मनसोक्त बरसला होता… आणि तो पण हळू हळू काढता पाय घेत
होता. आम्ही पण आपले चाटींग आणि कॉल्स संपवून निघण्याच्या तयारीत होतो. पण
झाडाखालचे ते दोघे अजूनही तिथेच होते. पावसामुळे आणि गेलेल्या लाईट मुळे जे स्पष्ट दिसत नव्हते ते
दोघे आता स्पष्ट दिसत होते.
“शब्द नव्हते.. आवाज नव्हता
तरीही ते बोलत होते..
हातवाऱ्याने ते एक मेकांना समजत होते.. समजावत होते..
बोलता येत नसून ते दोघे बोलत होते…
आणि तिथे असलेले बाकी सगळे बोलता येत असून मोबाईल मुळे मुके
होते...”