स्वतंत्र
स्वतंत्र
"ऐ राधा थांब, अगं थांब ना" राघव म्हणाला.
"जा राघव मला नाही बोलायचं तुझ्याशी, मला तुझ्याशी आता बोलणंच थांबवायचंय" राधा रागात म्हणाली
"अरे पण का?"राघव म्हणाला
"तुला अजूनही कळत नाहीये मला काय बोलायचंय ते, अरे... लोकं नाव ठेवत आहेत आपल्या नात्याला, त्या सुधा काकू तर काल आत्याला सांगत होत्या की तुमच्या राधेचं राघवसोबत लफडं आहे, त्यावरून काल मामांनी मला खूप मारलं, हातावर आणि पाठीवर अजून वळ आहेत..."
"हे बघ राघव लोकांच्या नजरा खूप वाईट आहेत, आपल्या दोघांनाही माहीत आहे की आपल्यात प्रेमाचं नातं नाही पण आपल्यामध्ये मैत्रीच्याही पलीकडचं आणि प्रेमाच्या अलीकडचं असं एक निरागस नातं आहे, ज्यात विश्वास, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी सख्ख्या नात्यापेक्षाही जास्त आहे, आपल्यातलं प्रेम शरीर, वासनेच्या ही पलीकडचं आहे, जिथे प्रेम शरीरावर नाही तर मनावर केलं जातंय.", राधा म्हणाली
हे बघ राधा हे जग ना हसायला येत पोसायला नाही, आपल्याला माहीत आहे ना आपल्यात तसं काही नाही मग का घाबरतेस?" राघवने विचारलं
राघव लोकांच्या बोलण्याचा तुला काही फरक पडत नसला तरी मला खूप फरक पडतो, माझे आईवडील... त्यांना तर माझी काळजीच नाहीये, ते नवरा-बायको एकमेकांसोबत राहू शकत नाही फक्त एवढंच त्यांना कळत होतं, पण त्यांनी माझा अजिबात विचार केला नाही, आज त्यांच्यामुळे मला या पारतंत्र्यात आत्याकडे झुरत झुरत जगावं लागतंय, त्यात मला हा बदनामीचा शिक्का नकोय, आईबाप जिवंत असून पण अनाथ असल्यासारखं वाटतंय, राघव मला ना खूप मोठं व्हायचंय रे, मला खूप शिकायचंय, मला माझ्या कवितांचं पुस्तकदेखील प्रकाशित करायचंय..." राघवला सांगत असताना राधाचे डोळे अचानक पाणावले.
"अरे मग करू ना, मी आहे ना सोबत" राघव लगेच म्हणाला.
"नको, राघव तुझी सोबत खूप झाली, आधीच तू मला अनेक संकटातून वाचवलं आहेस, आता बास, आजपासून तुझ्यातलं आणि माझ्यातलं नातं कायमचं संपलं असं समज," असं बोलून राधा रडत रडत आपल्या घरी निघून गेली.
"ऐ कारटे आगं कधीपासनं वाट बगतीया तुझी, कामं पडलीयत घरात चल कामाला लाग.." राधाची खडूस आत्या राधाला म्हणाली.
आत्या मला अभ्यास करायचांय गं, उद्या माझी परीक्षा आहे." राधा केविलवाण्या आवाजात म्हणाली.
"काय? जास्त तोंड चालवू नगं गप्प सगली कामं आटप, मग काय तो अभ्यास कर, आधीच तुझं आयबाप तुला आमच्याकडं सोडून तिकडं मजा मारत्यात, उगं आमच्या डोक्यावर वजं आणि हो तुझी परीक्षा आटपली की तुझ्या लग्नाचं काय ते बगायचं हाय." आत्या तावातावाने म्हणाली.
"ऐ शांते लगीनबिगीन काय नाय करायचं हिला मुंबईला नेणार हाय म्या," मामा म्हणाले. हे ऐकून राधा खूप खूश झाली
"म्हणजे आता मला नवं आयुष्य जगायला मिळणार, आपल्या मनासारखे कपडे, जेवण, शिक्षण.. मला बाकीच्या मुलींसारखं सजायला मिळणार.." राधा मनातल्या मनात मुंबईला जाण्याची स्वप्न रंगवत होती.
इकडे राघवही अभ्यासाला लागला होता. तसं दोघेही एकाच वयाचे होते म्हणून त्यांना एकमेकांचा लळा लागला होता. बारावीची परीक्षा संपली आणि राधा मामासोबत जायला निघाली, मनात अनेक स्वप्नं, आशा घेऊन... तिला माहीत नव्हतं आपण मुंबईला कोणाकडे राहणार, कुठे राहणार, फक्त मला मुंबईला जायचंय आणि भरपूर शिकायचंय एवढंच तिला माहीत होतं. राधा आणि तिचा मामा पोहचला, सगळेजण राधाकडे एकटक डोळे लावून आणि तोंड वासून पाहात होते.
"आंटी ओ आंटी, ये देखो अपुन छोकरी लाया है अभी सौदे का बोलो" राधाचा मामा म्हणाला
"अरे वा वा, क्या माल लाया रे तू! इसके वजह से तो मेरा धंदा अच्छा चलेगा रे, क्या खूबसुरत लडकी लाया रे तू" ती आंटी तोंडात पान टाकत म्हणाली.
"हा तो अब तुझे मूँह मांगी रकम देनी पडेगी" राधाचा मामा हात खाजवत म्हणाला.
"बोल कितना लेंगा रे तू "आंटी म्हणाली .
"दस लाख चाहिये रे बाबा" मामा म्हणाला
"ये ले और इसे छोडके जा ईधर से, जलदी रे पुलीस आयेगा तो वाट लगेगी" आंटी मामाच्या तोंडावर पैसे फेकत म्हणाली.
आपल्यासोबत नक्की काय होतंय, राधाला काहीच कळत नव्हतं. "मामा ओ मामा अहो तुम्ही तर मला इथं शिकवायला आणलं होतं ना, मग ही कोण लोक आहेत, आणि तुम्ही मला इथं का आणलंय?"राधाने मामाला विचारलं.
"व्हय तर तुझ्या बापसानी पैसं देऊन ठेवलत ना तुला शिकवायला? आता ऱ्हाय इथंच आनं आंटी बोललं तसं वाग,चांगलं पैसं कमावशील.."असं बोलत मामा पैशाचं बंडल घेऊन निघून जातो.
"ऐ सुषमा, रविना इसे अंदर लेके जाओ और इसको अच्छे से तैयार करके रखो, गिऱ्हाईक आने का टाईम हो गया है. आंटी राधाचं सौंदर्य न्याहाळत बोलते.
राधाची सगळी स्वप्नं काही क्षणातच चूर चूर होऊन जातात..
"देवा हे काय होतंय रे माझ्यासोबत? शिक्षणाच्या नावाखाली मामांनी मला वेश्यांच्या धंद्यात आणून सोडलंय, मला कुठे कामाला लावलं असतं तरी चाललं असतं, मी आवडीने केलं असतं, आता माझी अब्रू तूच वाचव रे, ह्या सुंदर देहाचा असा घाणेरडा वापर होऊन देऊ नकोस ती कान्होपात्रा कशी आपलं चारित्र्य शुद्ध ठेवण्यासाठी स्वतःला विठ्ठलाच्या रुपात विलीन करून घेते, तसं मला तुझ्यात विलीन करून घे ना रे.." राधा मनातल्या मनात देवाशी संवाद साधत रडत होती.
इकडे राघवला राधा मुंबईला गेल्याचं समजतं. राधाच्या आत्याची मुलगी त्याला घडलेला सर्व प्रकार सांगते. राघव कसलाच विचार न करता मुंबईला यायला निघतो, त्याच्या राधाला वाचवायला. दुसरीकडे राधा साठी एक कस्टमरपण येतो पण राधाचं सुदैव, दुसरी बाई त्याला घेऊन जाते.
"राघव तुझी खूप आठवण येतेय रे, माझ्या आयुष्यात तूच एक जवळचा आहेस, हे देवा राघवच्या रुपात तू ये ना रे मला वाचवायला.." राघवच्या आठवणीत राधा कशीबशी रात्र काढते. राघव दुसऱ्या दिवशी मुंबईला पोहचतो खूप शोधल्यानंतर शेवटी त्याला पत्ता सापडतो, तो त्या रेड लाईट एरियामध्ये पोहचतो.
"आंटी इधर राधा नाम की कोई लडकी है क्या?" राघव आंटीला विचरतो.
" क्या रे तुझे क्या करना है, तुझे नाम से क्या मतलब?"आंटी म्हणाली.
" नही, मैने सुना है कल ही इधर आयी है"राघव म्हणाला.
"पहले पैसा दे फिर अंदर जाने दुंगी", राघव... त्याच्याकडे होते नव्हते तेवढे सगळे पैसे देतो आणि आत जातो. राघवला पाहताच क्षणी राधा धावत येऊन राघवला घट्ट मिठी मारते आणि रडू लागते. राघवला वेगळं काही सांगायची गरज लागली नाही, राधाची मिठी, राधाचं रडणं राघवला सगळं काही सांगून जातं.
"मला माहित होतं तू येशील मला न्यायला, माझा देव येईल मला वाचवायला.." राधा रडत रडत म्हणते. तेवढ्यात धंद्यावर पोलिसांची धाड पडते आणि हीच संधी पाहून राधा आणि राघव पाठच्या दरवाजाने पळून जातात...
ती त्याच्या हातात
हात घालून अगदी
बिनधास्तपणे चालत होती
जणू काही तिला आजच
स्वतंत्र मिळालं होतं
तोही खूप आनंदी होता
कारण त्याने तिला एका
भयाण परिस्थितीतून
सोडवून आणलं होतं
एका अशा परिस्थितीतुन
जिथे माणसंच राक्षस होती
आणि त्या राक्षसांमध्ये
तिला हा माणूस भेटला
तिला समजून घेणारा
तिला स्वतःपेक्षा जास्त जपणारा
आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा.♥️
मित्रांनो राघवने राधाला स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर त्यांच्या अनामिक नात्याचं रूपांतर प्रेमामध्ये झालं...
