प्रतिक्षा कदम

Others

4.7  

प्रतिक्षा कदम

Others

सुमन

सुमन

2 mins
561


आमची वसुधा! सुसंस्कृत, मनमिळाऊ, लोभस पोर... १५ वर्षं झाली लग्नाला तरी लेकीची कूस उजळेना. दवा - दुवा सारं सारं झालं पण काही होईना. मी बापडीन तर आशाच सोडली होती. अन अचानक देवाजीच्या मनी यावं न त्यानं वरदान द्यावं असंच काही घडलं. वसुधा गर्भार राहिली न बाळंतपणासाठी आली. सारं सुखासुखी पार पडावं म्हणून मी तर देव पाण्यात ठेवले.


त्या दिवशी सकाळपासूनच लगबग चालू होती. वसुधेला कळा जाणवत होत्या. इतक्या वर्षांनी आपल्या घरी पाळणा हलणार म्हणून आमच्या विहीणबाई न जावईबापू इथेच येऊन राहिलेले २ दिवसांपासुन. साऱ्यांच्या मनी एकच इच्छा- सारं सुरळीत व्हावं!


वसुधेला कळा असह्य होऊ लागल्या! इतक्यात सुईण ताई आल्या. आमच्या गावातली त्या कालची जवळ जवळ सारीच बाळंतपणं त्यांच्याच हातची. अगदी तरबेज बाई. एक गुंतागुंतीची प्रक्रियाच कि बाळंतपण म्हणजे! काही वेळातच सुईणताईनी यशस्वीपणे पार पाडली न तार स्वरातील कणखर आवाजानं साऱ्यांनाच आनंदाश्रूंच्या डोहात फेकलं. विहीणबाई म्हणाल्या, "जग्या मुलगी झाली रे..." सूर तसा नाराजीचा होता पण त्यात सामाधानही होतं. वसुधेला अश्रू अनावर झाले. खरंच देव आहे याचाच प्रत्यय तिला आला होता जणू. जावईबापू खोलीबाहेर येरझारा घालत होते. लेकीचं सुमुख पाहण्यास आतुर बापच तो! तितक्यात सुईणताईनी ते नाजूक फूल त्यांच्या हाती ठेवलं.. तो स्पर्शच इतका प्रेमळ नि लोभस होता कि जावईबापूंना अश्रू अनावर झाले. ह्या जन्माचं सार्थक झाल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता! मला झालेल्या आनंदाला शब्दांत मांडणंही मला जमणार नाही. आमच्या ह्यांनी लगबगीनं पेढे.. हो हो पेढेच आणून साऱ्या गावाचं तोंड गोड़ केलं की! आणि लगेचच तात्यासाहेबांना तयार धाडली. तात्यासाहेब म्हणजे वसुधेचे सासरे. गावचे सरपंच. अतिशय शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व!


तार पोचताच तात्यासाहेब आमचे घोड्यावर स्वार होऊन आमच्या नगरीत दाखल झाले. लेकरू इतकं कसं गोड़ की आमच्या विहीणबाईंनी जाहीर करून टाकलं, "पाचवीला पुराणपोळीचं गावजेवण द्यायचं बरं का!" साऱ्यांच्याच आनंदाला पारावार उरला नाही...


बारशाचा दिवस उद्यावर आला. बाळाच्या आत्याबाई दाखल झाल्या. नाव काय ठेवावं यावर चर्चा सुरु झाली. आमच्या सासूबाई, वय वर्ष ९४ तरी तल्लख बुद्धी न साऱ्या कार्यांत सहभागी असलेल्या! त्या लगेचच बोलल्या, "दुर्गे, अगं फुलासारखी गोड़ आहे गं पोर. पुष्पा नाव ठेवा तिचं!" तात्यासाहेबानाही कल्पना आवडल्याचं चेहऱ्यावर दिसत होतं. विहीणबाई म्हणे,"अहो, पौर्णिमेचा जन्म तिचा. पौर्णिमा नाहीतर पूनम कसं वाटतं?"


लेकीची आत्या म्हणाली,"आई, अगं आपल्या साऱ्यांची अपेक्षा पूर्ण केली तिनं. अपेक्षा ठेवूयात?" तितक्यात कुणीतरी... नाही नाही... कुणीतरी कुठे.. आमचा पिंट्या,"ताई नि भावोजींची इतक्या वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाली. प्रतीक्षा चालेल?" तात्यासाहेब म्हणाले, "साऱ्यांचीच नाव समर्पक आहेत हो! पण आईसाहेब (अर्थात आमच्या सासूबाई) म्हणतात ते खरं. पोर फुलासारखी प्रसन्न आहे!" ते वाक्य पूर्ण करतात तोच मी धाडस करून बोलले,"कुसुम???" तेवढ्यात आमचे हे... माझ्यापेक्षा हुशारच आहेत म्हणा... म्हणाले,"सुमन कसं वाटतं? फुलासारखी कोमल, नाजूक, गोंडस माझी नात सु-मनाची नक्कीच असणार.. म्हणून सुमन!" तात्यासाहेबांसह साऱ्यांनीच ह्या नावाला टाळ्यांच्या गजरात समर्थन दर्शवलं!

अन् शेवटी त्या फुलानं आनंदात म्हटलं,"माझं नाव सुमन!!!"


Rate this content
Log in

More marathi story from प्रतिक्षा कदम