गीता केदारे

Others

4.9  

गीता केदारे

Others

....सुखात रहा बाळा....

....सुखात रहा बाळा....

6 mins
1.6K


विद्यालय हे ज्ञानाचे मंदिर... या ज्ञानमंदिरात दरवर्षी अनेक मुलेमुली आपल्या मार्गदर्शनाखाली, आपल्याकडून ज्ञान घेऊन उच्च शिक्षणासाठी जात असतात. मी माझ्या लहानपणीच ठरवले होते की मला सौ. सुभद्रा नारखेडे बाईंसारखं शिक्षिका व्हायचं ... स्वभावाने अतिशय शांत व प्रेमळ, दिसायला खूपच सुंदर अशा माझ्या नारखेडे बाईंचा माझ्या मनावर खूपच पगडा निर्माण झाला होता. इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत नारखेडे बाईंनी मला शिकवलं... मला त्यांची शिकवण्याची पद्धत फारच आवडायची.. एखादा कठीण विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगायच्या.. लहानपणापासूनच वळणदार व सुबक अक्षर कसे काढायचे याचे मार्गदर्शन बाईंनी दिले होते.. नारखेडे बाईंच्या मार्गदर्शनामुळेच माझे अक्षर आजही सुंदर आहे.. मी बहुधा दुसरीला असतानाच ठरवून टाकले होते की नारखेडे बाईंचा वसा आपण पुढे चालवायचा.. ज्यावेळी मुलंमुली भातुकलीचा खेळ खेळायचे तेव्हा मी "शाळा शाळा" खेळ खेळत असे. मी आमच्या बिल्डिंगमधील माझ्यापेक्षा लहान मोठ्या मुलांना नारखेडे बाई जशा आम्हाला शिकवायच्या त्याप्रमाणे शिकवायचे... सर्वांना मी शिकवलेलं खूपच आवडायचं व समजायचं ही...

बघता बघता.. पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले.. दहावी फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाले व गेले तडक डी. एड्. ला प्रवेश घेण्यासाठी.. पण डी. एड्. करण्यासाठी सोळा वर्षे पूर्ण झाली नव्हती म्हणून मला पुढे अकरावीला प्रवेश घ्यावा लागला... बारावी झाले पण डोक्यातील शिक्षिका होण्याचे खूळ काही कमी झाले नव्हते... पून्हा विद्याविहार येथील के. जे. सोमैया काॅलेज मध्ये जाऊन डी. एड्. चा फाॅर्म भरला..

काही दिवसांतच मला डी. एड्ला अॅडमिशन मिळाले.. दोन वर्षात कोर्स पूर्ण करून मी रीतसर शिक्षिका झाले... कै. सुमनताई चव्हाण हिंदी प्राथमिक विद्यालयात मी सहायक शिक्षिका या पदावर नियुक्त झाले... सुरुवातीलाच मला इयत्ता पहिलीचा वर्ग मिळाला... विद्यार्थ्यांना तन्मयतेने शिकवणे... त्यांना योग्य मार्गदर्शन देणे... सुजाण व आदर्श नागरिक घडवणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय झाले... विद्यार्थ्यांनाही माझा लळा लागला होता...नंतर दुसर्‍या वर्षी इयत्ता तिसरीचा वर्ग मला देण्यात आला... या वर्गात ही सर्व मुलं माझी प्रिय झाली...

विनीता... ही माझ्या वर्गातील विद्यार्थिनी... खूपच गोड, नाजूकशी.. बोलायला चुणचुणीत.... एकदा मला तिच्या हातावर कुणीतरी मारल्याचे काळेकुट्ट वण दिसले... मी विनीताला त्याबाबत चौकशी केली तर विनीताचे डोळे अश्रूंनी भरून वाहू लागले.. मी विनीताला जवळ घेतले.. तिचे डोळे पुसले व तिला मनमोकळेपणाने झालेला प्रकार सांगण्यास प्रवृत्त केले.. विनीताने सांगितले की तिने भांडी न घासल्यामुळे तिच्या आईने तिला वेताच्या छडीने मारले... मी विचार करीत राहिले की तिसरीची मुलगी.. जेमतेम आठ वर्षे वय... तिच्या नाजूक हातांकडून भांडी घासून घेते तिची आई? मला तिच्या आईची खूपच चीड आली.. तेवढ्यात विनीताच्या आजूबाजूला राहणारी माझ्याच वर्गातील मुले विनीताच्या आईबद्दल मला सांगायला लागली.. मुले म्हणाली की विनीताची आई तिला खेळायला पाठवत नाही... तिच्याकडून घरातील सर्व कामे करून घेते... हे ऐकून तर माझा राग खूपच अनावर झाला... मी विनीताला सांगितले की उद्याच तुझ्या आईला मी भेटायला बोलावले आहे म्हणून सांग... तर विनीता अजूनच रडायला लागली व मला विनंती करु लागली की "बाई, नका ना माझ्या आईला बोलावू... ती मग मला उद्या अजून जास्त मारेल".. हे ऐकून मी खूपच अस्वस्थ झाले व मनात विचार करू लागले की एखादं आईचं काळीज अशाप्रकारे आपल्या लेकाबरोबर व्यवहार करू शकतं का?

इतक्यात वर्गातील संगीता नावाची विद्यार्थीनी बोलली की," बाई, ती विनीताची खरी आई नाही.. ती विनीताची मावशी आहे... मला क्षणभर वाटले की विनीताची आई वारली असावी व तिची मावशी तिचा सांभाळ करीत असावी... मावशी असली म्हणून काय झालं.. असं वागावं का लहान लेकाबरोबर ? ... आपल्या मराठीत तर म्हण आहे की " माय मरो, मावशी जगो "... या मावशीने या आई नसलेल्या लेकराला किती जीव लावला पाहिजे.. तिला आईचे प्रेम द्यायला पाहिजे होते मावशीने... माझ्या मनात अनेक विचारांनी घोळ घातला होता.. मी विनीताला विचारले की तुझ्या आईला काय झाले होते?

तर विनीताच्या अगोदर संगीतानेच उत्तर दिले की, "बाई, विनीताच्या आईला काही झाले नाही. तिची आई गावी आहे. विनीताच्या मावशीने तिला दत्तक घेतलंय...! मी विनीताला एका बाजूला घेतले.. मला विनीताकडूनच सारे जाणून घ्यायचे होते... आणि विनीताने सर्व सांगायला सुरुवात केली...

" बाई, माझ्या मावशीला लग्नानंतर बरेच वर्ष मुलबाळ झालं नाही म्हणून ती खूपच उदास राहायची.. मावशीच्या घरातील लोकं तिला खूपच टोचून बोलायचे.. म्हणून माझ्या आईने माझा जन्म झाल्यावर मला मावशीला देऊन टाकले... मावशी काका माझा खूपच लाड करायचे.. मला हवं नको ते सारं आणून द्यायचे... मला कसलीच कमतरता पडू द्यायचे नाही... पण गेल्या वर्षी माझ्या मावशीला मुलगा झाला व ती माझ्याकडे दुर्लक्ष करू लागली .. ती माझ्याकडून घरातील सर्व कामे करून घेते... मला मारहाण करते.. मला खेळायला पाठवत नाही... अभ्यास करू देत नाही... "

विनीताची ही कहाणी ऐकून मी अवाक झाले... काय बोलायचं या मनुष्य वृत्तीला... आज या मुलीच्या घरातील आगमनाने हिच्या मावशीला मुलगा झाला हे का विसरते विनीताची मावशी? आज आपल्याला मुलबाळ होत नसताना आपल्या बहिणीने आपल्या खुशीसाठी तिच्या पोटचा गोळा आपल्याला दिला व आपण त्याचे असे हाल करावेत हे योग्य आहे का हे का कळत नाही विनीताच्या मावशीला?

मला तर विनीताच्या मावशीला बोलावून फाडफाड बोलावं व तिच्या डोळ्यात अंजन घालावं असं वाटत होतं पण विनीतामुळे मी तिच्या मावशीला बोलावू शकले नाही... विनीताबद्दल माझ्या मनात खूपच माया प्रेम दाटून आले.. विनीताचे सांत्वन कसे करू हेच मला समजेना.. मी विनीताला सांगितले की तूला कसलीही अडचण आली तर मला सांग...

मी विनीताची तिची पालक म्हणूनच पूर्णपणे जबाबदारी स्वीकारली... तिला वह्या पुस्तके घेऊन देणे, तिची वार्षिक फी भरणे, तिला शाळेचा गणवेश घेऊन देणे, तिच्यासाठी भाजीपोळीचा डब्बा आणणे, तिला खाऊ आणून देणे.. तिला अभ्यासात मार्गदर्शन करणे.. तिची काळजी घेणे.. अशाप्रकारे मी विनीतासाठी जे जे शक्य होते ते करू लागले.. विनीता आता आनंदी दिसू लागली होती... तिच्या आनंदी चेहऱ्याकडे बघून मला एक मानसिक समाधान मिळायचं...

विनीता आता सहावीत गेली होती... मी तिला जी मदत लागायची ती सर्वतोपरी करायचे.. विनीताचे पालक म्हणजे तिचे मावशी काका इतक्या वर्षांच्या कालावधीत एकदाही शाळेत पालकसभेला किंवा तिच्याबद्दल चौकशी करण्यासाठी आले नव्हते... पण एकदा विनीता सहावीत असताना सहामाही परीक्षा चालू असताना तिची मावशी तिचे शाळेतून नाव काढण्यासाठी आली... सहावीच्या वर्गशिक्षकांकडे दाखला मिळण्यासाठी अर्ज देऊन तिची मावशी निघून गेली.. परीक्षा सुटल्यावर विनीता धावतच माझ्याकडे आली व म्हणाली, "बाई, मी आता शाळा सोडून जाणार आहे माझ्या गावी... पून्हा तुमची व माझी भेट होणार नाही आता..." असे बोलून विनीता रडू लागली.. विनीताच्या या बोलण्याने माझ्या डोळ्यात अचानक अश्रूंनी गर्दी केली होती व विनीता माझ्यासमोर रडत उभी होती... एव्हाना आमच्या दोघींत एक मायलेकीचं नातं निर्माण झालं होतं... विनीता अशी अचानक शाळा सोडून जाईल असे मला वाटले नव्हते... मी विनीताला समजावले व तिच्या मावशीला मला भेटायला सांगितले...

दुसर्‍या दिवशी विनीताची मावशी मला भेटायला आली. मी तिला विनीताला शाळेतून काढण्याचे कारण विचारले... तिची मावशी म्हणाली की, "विनीता माझी मुलगी नाही. मी तिला माझ्याकडे सांभाळण्यासाठी आणले होते. आता आमचाच खर्च आम्हाला झेपत नाही. म्हणून तिला गावी तिच्या आईकडे पाठवत आहे.

मी विनीताच्या मावशीला बोलले," विनीताची सर्व जबाबदारी मी घेते. पण तिला गावी पाठवू नका.. " तिची मावशी मला म्हणाली, "तुमच्यापासूनच तिला दूर पाठवायचे आहे. तुम्हीच आहात ना तिच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणाऱ्या... तिला सर्व वस्तू घेऊन देणाऱ्या.. मला हेच नको आहे.. म्हणूनच मी तिला गावी पाठवत आहे.. हा आमचा शेवटचा निर्णय आहे व आमच्या या निर्णयात तुम्ही ढवळाढवळ करू नका.."

मी विनीताच्या मावशीला बोलले," या नंतर मी विनीताला मदत करणार नाही.. तिला राहू द्या शाळेत...

विनीताची मावशी म्हणाली, "नाही, तिला गावी पाठवणं हा आमचा ठाम निर्णय आहे. तिच्या तोंडी सारखं तुमचंच नाव असतं... मला ते ऐकवत नाही म्हणून तिला तिच्या आईकडे गावी पाठवत आहे...

मला विनीताच्या मावशीला काय बोलावं हेच कळेना... आपल्यापेक्षा जास्त अधिकार विनीतावर तिच्या मावशीचा आहे... पालक म्हणून विनीताबरोबर योग्य अयोग्य काय करायचे ते ठरवण्याचा अधिकार विनीताच्या मावशीचा होता... मी काहीच बोलू शकले नाही फक्त विनीताला एक घट्ट मिठी मारली व डोळ्यातील पाणी तर थांबायचे नावच घेईना आणि विनीताचे बोल फक्त कानावर जणू आघात करत होते, "बाई, उद्यापासून मी तुम्हाला दिसणार नाही.. बाई, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत... बाई, मी उद्यापासून शाळेत नाही येणार..." मी फक्त ऐकत होते पण काहीही करू शकत नव्हते...

आजही हे शब्द आठवले तर डोळ्यात आपसूकच पाणी येतं व विनीताच्या आठवणींना पाझर फुटतो... कशी असेल माझी विनीता... या विचारांनी मन सुन्न होतं...

विनीता... आता खूपच मोठी झाली असेल... तिला माझी आठवण येत असेल की नाही माहित नाही पण मी विनीताला कधीच विसरू शकत नाही...शाळेत शिकवत असताना बरेच अनुभव येतात पण काही अनुभव हे अविस्मरणीय असतात हेच खरं...

विनीता.. जिथे कुठे असशील तिथे सुखात रहा बाळा.... माझे आशीर्वाद सदैव तुझ्याबरोबरच आहेत...


Rate this content
Log in