स्पर्श

स्पर्श

4 mins
1.8K


आज मी खूप आनंदित होते .आज चांगली बातमी मला समजली होती . मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. कधी एकदा मी संजयला सांगते असे मला झाले होते .खूप वर्षांनी तपश्चर्या करून माझ्या जीवनात हा क्षण आला होता. घर आनंदाने भरून टाकण्यासाठी माझे मन आतुर झाले होते . किती जप ,तप, किती ते नवस , सायास , गंडेदोरे ,यात्रा केल्या होत्या कुणास ठाऊक .

या विचारात असताना दारावरची बेल वाजली .दार उघडले संजय समोर उभा होता .कसे सांगावे ,काय करावे ? नेहमीप्रमाणे पाणी दिले . संजय आता फ्रेश झाला होता . त्याला मी हळूच कानी सांगितले . त्याचा आनंदही गगनात मावेनासा झाला . तो इतका खुश झाला की त्याने मला उचलूनच घेतले . ही बातमी त्याने ताबडतोब सर्व प्रियजनांना सांगितली .हे दिवस आनंदात कसे गेले काही समजले नाही. मला काय हवे , नको ते संजय पाहत होता . वेळात वेळ काढून माझ्या साऱ्या इच्छा तो पूर्ण करत होता .फुलासारखा तो मला जपत होता. माझ्या उदरात वाढणाऱ्या त्या कळी सोबत संवाद साधत होता . दिवस कसे पटापट जात होते . काळजी घेण्यासाठी गावाकडून सासुबाई पण आल्या होत्या . त्याही फुलासारखे मला ठेवत होत्या .जपत होत्या . वीस वर्ष होऊन गेली तरी माझी कुस उजवत नव्हती . पण आमच्या सासूबाईनी कधी धीर सोडला नाही ,कधी टाकून बोलल्या नाही. कधी माझी अवहेलना केली नाही . आणि आज तो आनंदाचा क्षण आला होता की त्यांना मी आत्ता नातवंडांचे सुख देऊ शकत होते . सर्व कसे मजेत , स्वप्नवत चालू होते .सगळे कुटुंब खूप आनंदी ,प्रसन्न होते.

आणि तो क्षण जवळ आला अचानक माझ्या पोटात दुखू लागले .संजय तर घरी नव्हता सासूबाईंनी मला दवाखान्यात नेले. लागणारे सामान व्यवस्थित बरोबर घेतले .आणि संध्याकाळी पाच वाजता आम्ही दवाखान्यात पोहचलो. डॉक्टरांनी एका तासाचा अवधी दिला होता .आता ही गोड बातमी एका तासातच आम्हाला मिळणार होती .सर्व जणांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता काहीतरी अनामिक भीतीही त्यांच्या चेहऱ्यावर होती पण ती या आनंदाच्या पडदया आड दडली होती .

बराच वेळाच्या प्रतिक्षेनंतर बाळाच्या रडण्याचा आवाज सर्वांनी ऐकला . जो , तो त्याला बघण्यासाठी प्राण कंठाशी आणून उभे होते . पण हा आनंद नियतीने जास्त काळ उपभोगू दिला नाही . थोड्याच कालावधीत रडणाऱ्या बाळाचा आवाज अचानक थांबला . त्याचे शरीर थंड झालं होतं . त्याच्या हदयाचे ठोके कमी होत होते . ते निपचित झाले होते . डॉक्टरांची एकच धावपळ सुरू झाली .बाळाची हालचाल थांबली होती . कोणालाही कळत नव्हते काय झाले ते ! प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करु लागले . वीस वर्षानंतर मिळणारा आनंद काळाने असा हिरावून घेतला होता. काय करावे कोणालाही समजत नव्हते .मी मात्र या साऱ्या गोष्टीपासून अनभिज्ञ होते. मला काहीही कोणीच कळू दिले नाही .

दोन - तीन तासानंतर जेव्हा मला शुद्ध आली ,मी चौकशी केली , सर्वांची धावपळ माझ्या लक्षात आली ,काय झाले असेल ?या काळजीने माझी छाती धडधडू लागली .डोके सुन्न झाले , विचारांचे काहूर माजले . प्रयत्न केला पण कोणीच काही सांगेना आता मला भीती वाटू लागली .मी बाळाला पाहण्याची इच्छा व्यक्त केली .सलायन काढून माझे शरीर बाळाकडे धावू लागले होते . माझी ती अवस्था पाहून मग डॉक्टरांनी बाळ माझ्या हाती देण्यास सांगितले .एवढ्या वर्षांनी देवाने दिलेला कौल कसा मोडून पडेल ?असा कसा काळ इतका दृष्ट होऊ शकतो ? काळाचे चक्र एवढी भयानक? मला राहवेना माझ्या आग्रहास्तव डॉक्टरांनी बाळाला माझ्या हातात दिले. सुंदर ,कोमल ,फुल ते ,नाजूक बोटे, निरागस चेहरा ! काय चुकी होती त्या बाळाची ? तेवढेच आयुष्य घेऊन तो माझ्या हाती आला होता. माझं प्रेम ओसंडून वाहत होतं . पटापट मी त्याला हृदयाशी कवटाळले , मुके घेतले , पापे घेतले देवाचा धावा करू लागले . नियतीला दोष देऊ लागले. देवाला नाव ठेवू लागले .शेवटच्या क्षणाची अनामिक भीती, हाती आलेले फळ काळ जणू झाडावरून कुस्करीत होते . सारी फुले आज कोमेजणार होती .मी बाळाला घट्ट छातीशी धरले . वाटत होते ही वेळ इथेच थांबावी. पण नाईलाज ,डॉक्टरांनी संजयला खूण करून बाळाला घेण्यास सांगितले .संजयने माझ्यातून त्याला घेतले. कशी सोडू मी त्याला, मन मानत नव्हते .

संजयने बाळाला डॉक्टरांकडे दिले. आणि काय चमत्कार झाला , त्याच्या पायाची बोटे हलू लागली .बाळाच्या कुडीत जिवात्म्याने प्रवेश केला होता .माझे बाळ परत रडू लागले. सर्वांना आश्चर्य वाटले. कोणाचाही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता .डोळ्यांनी पाहून सुद्धा खरे वाटत नव्हते .देवाने माझे गा-हाणे ऐकले होते .माझा नवस पूर्ण केला होता .माझ्या आयुष्याच्या वेलीवरची कळी कोमेजता, कोमेजता फुलवली होती .त्याच्या स्पर्शाने मला मातृत्व लाभले होते .नवीन नाती फुतणार होती . त्या एका स्पर्शाने मला मातृत्वाचे सूख मिळाले होते. आपसातील प्रेम वाढणार होते . तो कोमल स्पर्श मला समाजात ताठ मानेने जगण्याचे बळ देणार होता .त्या एका स्पर्शाने मला कितीतरी मोलाचे आयुष्य दिले होते .आज माझे जीवन धन्य झाले होते केवळ त्या एका स्पर्शाने .


Rate this content
Log in

More marathi story from Kothekar yogita Sanjay Kothekar