संक्रांत
संक्रांत


"संज्या, चल लवकर, किती उशीर केलास? एवढ्या पतंगांना ज्योत्रंग बांधायच्या आहेत अजून. दहा पंजे आणून ठेवलेत पन्नास पतंगी, उद्यासाठी." सुरेश जिना चढून येणाऱ्या संजयला म्हणाला.
दुसर्या दिवशी संक्रांत होती, अनायसे रविवार पण होता, त्यामुळे सुरेश आणि संजय ने उद्याचा पूर्ण दिवस गच्चीवरच राहून पतंग उडवायचं ठरवल होत.
नंदुरबार तसं गुजरात च्या सीमेवर असल्यामुळे इकडेही पूर्ण नंदुरबार शहराला संक्रांतीच्या महिनाभर आधीपासूनच पतंग उडवायचे वेध लागायचे. लहान मुल, कॉलेज तरुण, व्यायसाइक सगळे संध्याकाळी पतंग उडवायला घराच्या गच्चीवर, छतावर नाहीतर एखाद्या मैदानात जाऊन मनसोक्त पतंग उडवायचे. संक्रांति च्या दिवशी तर सगळे कामधंदे बाजूला ठेऊन पहाटे पाच पासून गच्चीवर चढून डोळ्यावर उन्हाचा गोगल चढवून पतंग उडवायला सुरुवात व्हायची.
एकदा छतावर चढलं कि मग सकाळचा चहा, नाश्ता इतकच काय दुपारच जेवणही वर छतावरच व्हायचं. सगळी मित्र मंडळी जमवून सोबतीला लावलेल्या मोठ्या स्पीकर्स वर सिनेमाच्या गाण्यांच्या तालावर आणि माईक वरच्या रनिंग कॉमेंट्री च्या जोशात सगळ्यांना पतंगबाझी ची झिंग चढायची. घरातली काही जेष्ठ मंडळी सोडली तर आख्ख कुटुंबच वर छतावरच असायचं. सगळ आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरलेल असायचं. समोरच्याची एखादी पतंग अटीतटीच्या लढाईत काटली कि ...."काSSSट है..." च्या सामुहिक घोषांनी आसपासचा परिसर दुमदुमून जायचा. पहाटे सुरु झालेली हि धुमश्चक्री चालायची ते थेट रात्री अंधार पडेपर्यंत. रात्री अंधार पडल्यावर काही हौशी पतंगबाज वर उंच आभाळात गेलेल्या पतंगाच्या मांजाला छोटासा आकाशकंदील बांधून उडवायचे. सार आकाश मग या लामणदिव्यांनी झगमगत राहायचं.
"कोणाकडून घेतलेस रे पतंग?" पाच पतंगांचा एक गठ्ठा उचलून बघत संजय ने विचारल.
"बडा आदमी कडून." सुरेश हातातल्या गोन्डेवाल्या चांदणी पतंगाला जोत्रंग बांधत म्हणाला.
"आणि मांजा? कोणता घेतलास, सक्कलाट का कोंबडा?"
" अरे सांगू नको कोणाला, नायलॉन मांजा आणलाय दोन चक्र्या भरून. तो बघ तिकडे ठेवलाय." सुरेश कुजबुजत्या स्वरात म्हणाला.
"नायलॉन? अरे पण त्याच्यावर तर कलेक्टर ने बंदी आणलीये न?" संजय ने घाबरून विचारल.
"हो, पण कसला कापतो हा मांजा, म्हणून तर खास सुरत हुन गुपचूप आणलाय, जास्त पैसे देऊन, इथे गच्चीवर कोण चेक करायला येणार आहे, कोणता मांजा आहेत ते..चल ज्योत्रंग बांध पटापट." सुरेश म्हणाला.
ते दोघेही उद्याच्या तयारीत गर्क होऊन गेले.
तिकडे माळीवाड्याच्या शेजारच्या भिलाटीमध्ये नारू कुठूनतरी शोधून आणलेल्या एका उंच बांबूला छोटी काट्याची फांदी बांधत बसला होता. त्याचा लहान भाऊ पिऱ्या सारखा त्याच्या मागे भुणभुण करत होता,
"ए, नार्या...मला बी पतंग पाहिजेल उद्या उडवायला...तू कायबी कर पण मला पाच पतंग आणून दे...आन मांजा बी पाहिजे, हि चकरी भरून." त्याने हातातली एक जुनी मोडकी चकरी दाखवत नारू ला म्हंटल.
"हा रे बाबा, त्यानीच तर तयारी करी र्ह्यानू ना." नारू ने बांबू दाखवत त्याला सांगितल, “काल दिन सक्काळलेच जासू गावमा, आनि लुटी येसुत पतंगा, मंग उडव तू मन भरीसन.”
“हाव” पिऱ्या उद्याची स्वप्न बघत त्याच्या शेजारी आडवा झाला.
सकाळी उजाडल्या उजाडल्या नारू हातात तयार केलेला बांबू घेऊन गल्ली बोळामध्ये पतंगी मागे धाऊ लागला. एक डोळा समोरच्या रस्त्यावर, दुसरा डोळा वर आकाशात उडणार्या पतंगांकडे आणि कानात प्राण आणून “काSSSट है..” च्या आवाजाकडे लक्ष देत वेड लागल्यागत ते दोघे धावत होते. एखादी काट झालेली पतंग गोता खाऊन खाली आली कि शिताफीने हातातल्या बांबूच्या टोकावर लावलेल्या काट्याच्या फांदीत तिचा दोरा गुंढाळायचा आणि सोबत धावणार्या अन्य प्रतिस्पर्धीनां हुलकावणी देत फांदीत अडकलेला पतंग काळजीपूर्वक काढून घ्यायचा आणि पिर्याच्या हाती सुपूर्द करायचा, अशी त्याची एकच धावपळ चालली होती.
सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही कि चहाचा घोट नव्हता, दोघेही पतंगीच्या मागे वेड्या सारखे धावत सुटले होते. मधेच बाकीच्या मुलांसोबत भांडणे होत होती, मधेच हमरीतुमरी व्हायची. भांडणात मग एखादी धरलेली पतंग फाटत हि होती. पण सगळ्याचं भान विसरून सगळे त्या पतंगी च्या मागे उर फाटेस्तोवर धावत होते. आतापर्यंत ३-४ पतंगी पिर्याच्या हातात आल्या होत्या, त्या तो पळतांना प्राणपणाने सांभाळत होता.
“नार्या...मांजा बघ आते, माले मांजा पाहिजे...” पिर्याने नारू ला दुसर्या हातातली रिकामी चक्री दाखवत आठवण करून दिली.
“व्हय रे...थांब जरा..” म्हणत नारू ची शोधक नजर एखाद्या झाडत अडकलेल्या पतंगी ला शोधू लागली. हातातला बांबू पिर्याच्या हातात देऊन त्याने खिशातला मांजा काढला आणि रस्त्यावरच्या एका चपट्या छोट्या दगडाला बांधून त्याची लगोरची बनवली.
पुढच्या गल्लीतच सुरेश आणि संजू बोटांना जाड नायलॉन मांजाने बोट कापू नये म्हणून बोटांवर जाड चिकटपट्या बांधून पतंग उडवत होते. आज वारा नेमका उलट्या दिशेला होता, आणि सारखा पडत होता. तरी चिकाटीने दोघे पतंग उडवत होते. पण थोड्या वेळाने मस्त जोरदार वारा सुटला आणि सगळ्या पतंगबाझां मध्ये चैतन्य आलं. थोड्याच वेळात त्याच्या लाल गोन्ड्याने तीन पतंगी सहजा सहजी कापल्या.
तेवढ्यात शेजारी टक्कर देणारा पांढर्या चांदतार्याच टोक एकदम वेगाने लाल गोंड्याच्या कमानी च्या बाजूला लागलं आणि सुरेश च्या लाल गोंड्याला एक छोट भोक पडल. वरच्या वार्याने ते भोक अजूनच मोठ झाल आणि सुरेश चा लाल गोंडा वर आकाशात गिरक्या खाऊ लागला. सुरेश वेगाने मांजा खेचायला लागला पण तेवढ्यात गोंडा सर्रकन गोता खाऊन खालच्या एका लिंबाच्या झाडाच्या फांदीत अडकला.
सुरेश हाताने टिचक्या देत आता अडकलेला पतंग काढायचा प्रत्यन करू लागला, पण तो अजून जास्तच अडकत होता. पतंग अडकलेला बघितल्या बरोबर खाली त्याच्यावर नजर ठेऊन असलेल्या नारू ने हातातली लिन्गोरची गरागरा फिरवत त्याच्या मांजवर टाकली आणि बेसावध पणे टिचकी देणाऱ्या सुरेश च्या हातातून पकड सटकून मांजा खाली आला. खाली आलेला मांजा पटकन हाताशी आल्यावर नारुने हातात गच्च धरला. खाली कुणीतरी आपला मांजा पकडलाय हे सुरेश ला हिसका बसल्या बरोबर कळल, पण कुणी धरलाय ते त्याला मध्ये येणाऱ्या एका घरामुळे दिसत नव्हत.
खालून नारू आणि वरून सुरेश जोरात मांजा खेचू लागले, थोडा जोर बसल्यावर नारूच्या हाताला तो नायलॉन मांजा खूपच काचायला लागला आणि त्याने पिर्याला पण मांजा खेचायला सांगितला, खिशातून फडक काढून हाताशी बांधे पर्यंत पिर्याने पतंगीचा मांजा तोडून आपल्या चक्री ला बांधला.
वरून सुरेश ने ,"ए, कोण धरलाय रे....सोड.माXXX" म्हणत शिव्या देत एकदम हातातल्या मांजाला जोरात हिसका दिला. खाली त्या हिसक्याने चक्री ला मांजा गुंडाळण्यात मग्न असलेल्या बेसावध पिऱ्या च्या गळ्याभोवती सर्र्र्कन मांजा फिरला..त्या नायलॉन मांजा च्या जोराच्या हिसक्याने पिर्याच्या नाजूक गळ्यावर थेट आतपर्यंत काचत रक्ताची एक धार उगवली. काय होतंय हे कळायच्या आत पिऱ्या आपला गळा हाताने गच्च दाबून धरत खाली कोसळला.
हाताला फडक बांधणाऱ्या नारूच तिकडे लक्षच नव्हत. त्याला एकदम कोसळणारा पिऱ्या दिसला. आणि सगळ सोडून तो त्याच्या कडे धावला. रस्त्यावरच्या दोन चार जणांच्या लक्षात एकदम काहीतरी विचित्र घडतंय हे लक्षात आलं आणि ते त्यांच्याकडे धावले.
रिक्षात घालून सिविल हॉस्पिटल कडे वेगात धावणाऱ्या पिर्याने एकदा डोळे उघडून आपल डोकं मांडीवर घेतलेल्या भेदरलेल्या नारू कडे बघितल आणि त्याच्या डोळ्यापुढे पुन्हा अंधारी आली. त्याच्या गळ्यावर बांधलेलं फडकं आता रक्ताने पूर्ण भिजलं होत.
......आणि आपल्या नायलॉन मंजाच्या वेडापायी एका चिमुकल्या जीवावर आजची संक्रांत आली होती याची सुरेश ला खबर देखील नव्हती....