संघर्ष तिचा जगण्याचा
संघर्ष तिचा जगण्याचा
हॉस्पिटलमध्ये कोरोना क्वारंटाईन विभागात एक संध्याकाळ...
लॉक डाऊन चा २३ वा दिवस...
खिडकीतून स्तब्ध झालेला परिसर एकसारखा डोळ्यात सामावुन घेत राधा उभी होती....
आयुष्य आज तिला या जागी घेऊन आले होते,तिचा स्टाफ तिचे कुटुंब आणि सर्वात महत्वाचे तिचे चार वर्षाचे लेकरू....
सगळे अवती भोवती पण तीन फूट अंतरावरून सारखे सारखे पाहत होते असे तिला भासले.....राधा चां धीर खचू नये याची खबरदारी घेत होते... असं तिला वाटलं.नात्यांची ताकद तिने या आधी ही अनुभवली होती पण या वेळी विलक्षण सामर्थ्य तिला येत होते या विलगिकरणाला सामोरे जाण्यासाठी....
वेळ साधारण संध्याकाळी ६.३०ची,राधा नेहमी प्रमाणे ओपीडी काढत होती.तीन चार पेशंट झाले आणि तहान लागली म्हणून सिस्टर ना पाणी मागून घेतले.राधा घटाघट अर्धी बाटली पाणी पिली अन् जणू शांत झाली..तोच सी. सी. टी व्ही.ने एक खळबळ दाखवली.एक ३५ वर्षाची स्त्री तिच्या साधारण १३ वर्षांच्या मुलीला घेऊन हॉस्पिटल मधे आली.मुलगी चालू च शकत नव्हती.आई ने कसे बसे तिला हॉस्पिटल पर्यंत आणले होते.ती मुलगी आली न वेटींग रुममध्ये आडवी झाली.. सर्व राधा केबिन मध्ये बसून कॅमेरात पाहत होती.राधा ने पाणी पिण्या साठी काढलेले मास्क न ग्लोव्हज पुन्हा घातले आणि बेल वाजवली.तशा सिस्टर आत येऊन सांगू लागल्या की मुलगी सीरियस आहे.मावशी ना सांगून राधा ने मुलीला चेक करायच्या टेबल वर झोपवलं.राधा ने मुलीला तपासणे सुरू केले.तिला प्रचंड ताप भरला होता...पायाला कसल्या तरी जखमा होत्या.तिचा घासा लांबून च तपासला..जबरदस्त इन्फेक्शन होते...नंतर बीपी चेक केला.तिचा बीपी केवळ८०/३०असा लागत होता...साहजिक च इतक्या हैपोटेन्शन चे पेशंट स्वतः उभे राहू शकणार नाही हे जाणून राधा ने पुढील ऑर्डर दिल्या.बेल वाजताच सिस्टर आत आल्या.दोन गोळ्या लिहून दिल्या आणि त्या तिला देण्यास सिस्टर ना सांगितले. फेव्हर वर लक्ष ठेवण्यास सांगितले.राधा पुन्हा ओपीडी पाहू लागली.दोन चार पेशंट झाले,की सिस्टर सांगत आल्या मॅम तिचा ताप जास्त वाढत आहे...तिला श्वास घ्यायला त्रास होतोय..तसा राधाच्या काळजाचा ठोका चुकला.त्या क्षणाला जणू सगळा दुनिया भर चां मीडिया डॉ रधाच्या केबिन समोर येऊन गोळा झाला असावा असा भास तिला झाला.तिने एक खोल श्वास घेतला.सर्व स्टाफ आणि हॉस्पिटल सदस्यांना विश्वासात घेऊन केबिन मधे बोलावले.या पेशंट पासून दूर राहण्याचे काळजी घेण्याचे सांगून राधा स्वतः आयपीडी ला गेली आणि पेशंट चे आई ला सर्व गोष्ट समजावून सांगितली.तशी ती भीती ने कापू लागली.तिला ब्रह्मांड दिसले असावे.अन् तिच्या सोबत च राधा ने ते पहीले असावे.गावातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संपर्क करून तिकडे नेण्यास राधा ने सांगितले.परंतु त्यांनी स्पष्ट सिटी सिव्हिल ला पाठवावी लागेल असे सांगितले. राधाची चक्रे वेगाने फिरू लागली. *सलमा शेख* या मुस्लिम मुलीला कोरोन सदृश सर्व लक्षणे दिसत असून ती अत्यवस्थ असल्याचे कळवले. राधाचं गावातील सर्व लोकांशी सलोखा असल्याने अनेक फोन फिरवून तिने या मुलीची कुंडली अवघा काही मिनटात काढली.तोवर सिव्हिल हॉस्पिटल ची अंबुलान्स हॉस्पिटल ला रवाना झाली.. सलमा आता स्टेबल होती .पण श्वास घ्यायला त्रास होत च होता. सलमा आणि तिची आई सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले....नंतर तिच्या घरुन सर्व चौकशी झाली.या सर्व प्रकारात वाजले होते रात्री चे ९.३०.राधा च चार वर्षाचं लेकरू डोळ्यात तेल घालून वाट पाहत होत..पण आता ...
आता घरी कसे जायचे...
जोवर या मुलीचा कोरोना रिपोर्ट negative येत नाही तोवर स्वतः क्वारांटेन राहणे तिने निवडले होते..
दुसऱ्याच दिवशी सकाळी आठच्या सुमारास टी वि चा सर्व न्यूज चॅनलची ब्रेकिंग न्यूज येऊन धडकली...नाशिक मध्ये गंगापूर गावात कोरोना चां नवीन रुग्ण.... सलमा शेख या १३ वर्षाच्या मुलीला कोरोना ची लागण....
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल....प्रकृती गंभीर...
या बातमी ने पुढील १४दिवसा चा एकांतवास राधा ला दिसू लागला.मात्र भीती चा लवलेश ही तिच्या जवळ फिरकला नाही..
हा एकांतवास तिने स्वीकारला..तिला क्षण क्षण ओवी डोळ्या समोर दिसत होती...तीच ४ वर्षांचं लेकरू एक रात्र देखील तिच्या कुशी शिवाय झोपत नाही त्याचं पुढच्या काही दिवसाचं काय?या विचाराने राधा रडवली झाली...तिला तिच्या कर्तव्याचा राग न नशिबाची कीव येऊ लागली...राधा निःशब्द आसू गाळू लागली....
त्याच दिवशी राधा चा घशातील नमुना तपासणी साठी दिला..हॉस्पिटल सिल करण्यात आलं,आणि सर्व स्टाफ चे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले....
राधा asymptomatic carrier म्हणून corona positive आली होती....स्टाफ मधील कोणाला ही सुदैवाने लागण झालेली नव्हती परंतु सर्वांना विलिगिकरण केले होते.परंतु राधा positive होती.हॉस्पिटल ची डायरेक्टर आणि सर्वेसर्वा डॉक्टरच कोरोना बाधित निघाल्याने सर्वच गाव हादरून गेले होते...राधा ला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये विलिगी करण कक्षात ठेवले गेले......
कधी ही न अनुभवलेला एकांत राधा आज अनुभवत होती ....तिच्या धावपळी जगण्याला जणू पूर्ण विराम मिळाला होता.निसर्गाची हीच इच्छा होती...असे तिला वाटले नाहीतर कुठला इतका सलग आराम राधा करते? सकाळी ९ ते रात्री ९ राधा हॉस्पिटल मध्ये असते..मधला मोजून दोन तासाचा वेळ ती घरी जाऊन पिलू ला देते... कुठं हरवलं होत तिचं आयुष्य हे शोधण्यासाठी निसर्गाने केलेली ही तजवीज असेल...
आता राधा एकटी असायची तिला एकांतात बसुन विचार करायला अन् लिखाण करायला आवडे....पण ही जागा म्हणजे ना विचार डोक्यात येतील ना काही सुचेल अशी होती....ना ना प्रकारच्या आजाराने ग्रस्त अत्यवस्थ रुग्णांची धावपळ हे सगळ चित्र तिला सिव्हिल हॉस्पितलच्या खिडकीतून दिसत असे ....
संध्याकाळी आठ वाजता राधा विचार करू लागली,
"कैदेत कोण आहे ?
तो आहे की मी????
लोखंडी गजा पलिकडे त्याला मी दिसते न मला तो...
शांत हसतो न मला पुसतो,आहेस कुठे?
बंदीवान हो...
पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी गजा आड हो..
पुष्कळदा सांगितले त्याने...पण ऐकेल तो माणूस कसला?
आज एक छोटासा जीव पुरेसा झाला मला कैद करायला.....!!!!
राधा ओवीच्या आठवणीने व्याकुळ झाली....लेकरू इतकं दूर कधीच राहिलं नव्हतं.तिला ४ तासा पेक्षा जास्त वेळ मम्मी दिसली नाही तर सैरभैर व्हायचं...आता राधा चा हा तिसरा दिवस...असे आणखी ११ दिवस काढायचे...ओवी ला पाहायला पण नाही मिळणार!!!!
एक वेळ जेवण मिळालं नाही तरी चालेल पण मला माझी मुलगी पाहायची अशी इच्छा तिची झाली...पण सर्वच हतबल होते...न ते अशक्य होते....
राधा येता जाता पेशंटचे सगळे आक्रोश ऐके..तिला धावत जावे न मदत करावे उपचार करावे असे वाटे...पण आता ते ही शक्य नव्हते...इतकेच काय....ती आजारी आहे म्हणून तिला तपासायला सुद्धा कोणी येत नव्हते....या एकाकीचे उरलेले दिवस राधा ने फार कठीण काढले....जेवण जेवण नव्हते तर पोटात उकळणाऱ्या ज्वाला रसाला शांत करणारे दोन चार तुकडे होते...एक घास ही घशा खाली जात नसे....फोन नाही की कसली करमणूक नाही...फक्त न फक्त एकाकी...आणि उद्विग्न झालेलं मन....त्यात चांगले विचार आले तर ठीक.....चुकीच्या विचारांचं थैमान सुरू झाले तर या मनाला आवर घालणं केवळ अशक्य......
असे दिवस राधा ने अगदी क्षण क्षण मोजत काढले ...आणि शेवटच्या दिवशी रधाची पुन्हा तपासणी साठी नमूना घ्यायला बोलावले...राधा ला खात्री होती की यावेळी रिपोर्ट निगेटिव्ह येणार अन् आपण घरी जाणार...
या विचारातच राधा ने नमुना दिला न त्याचा रिपोर्ट मनासारखं आला...राधा ने कोरोना नावाचा घाव पचवला होता....उद्या सकाळी राधा कोरोना मुक्त म्हणून पुन्हा घरी जाणार होती...
सर्वांनी राधा चे स्वागत केले...कोणी तुकडा उतरवून टाकला तर कोणी आरती ओवाळून पिडा टळली म्हणून आभार मानले....राधा च आभाळ जणू भरून आलं, ईश्वराच्या लाख कृपेने ती पुन्हा सुखरूप तिच्या जिवलगा जवळ परत आली....
ही स्त्री कित्येक यातना सोसून मुलांना वाढवते.संकट काळात पर्वतासारखी पाठीशी उभी राहते.मैत्रीण, आई ,बहीण अशी नाते स्वीकारते.ही घटना माझ्या ओ पी डी तील मी अनुभवलेली आहे.
आभाळ घेऊन पंखांवरती कल्पना
कर्तृत्वाची शिखरे उंच
ध्येयावरती तुझी नजर
तव्यावरच्या भाकरीचा घास
राबताना संसाराचा श्वास
श्वास एकच दुसऱ्यासाठी जगणं
