स्मृती गंधाळलेल्या
स्मृती गंधाळलेल्या
"अधीर स्मृतींचे दाणे टिपण्या
गर्द मनीचे वृक्षी
मधुर साथ ही घेऊन आले....
आठवणींचे पक्षी"
काहीवेळा निवांत वेळ मिळाला की अशी अवस्था होते खरी. मन रिकाम असलं की कितीतरी गतकाळातील विविध रंगी फुलपाखराचे पंख लावलेल्या आठवणी ,ते क्षण पिंगा घालू लागतात . नजरे समोरून जीवन पट उलगडू लागतो. .. .
आठवतो माझा शाळेचा पहिला दिवस.. . .. इयत्ता पहिली व दुसरी अशी दोन वर्ष एकदम करून मी इयत्ता तिसरीत एकदम प्रवेश घेतला होता. इयत्ता पहिली दुसरीचा अभ्यास घरीच केला होता. त्यामुळे इयत्ता तिसरीत इतर मुलांच्या मानाने वयाने मी लहान होते .आणि बाकीची मुल दोन वर्ष शाळेत येत होती. त्यामुळे ती घाबरत नव्हती. पण मी त्याच वेळी पहिल्यांदा शाळेत पाय टाकला होता .त्यामुळे मला सगळं नव नव ,वेगळं वाटत होतं. भीती वाटत होती .आणि इतर विद्यार्थी माझ्याकडे पाहून हसत होते. त्यामुळे मला इथे थांबायलाच नको असं वाटायला लागलं.आई वर्गाबाहेर उभी होती .ती टाटा करत होती. पळत सुटावं आणि तिच्याकडे जावं असं वाटत होतं .पण इतक्यात आमच्या बाई जवळ आल्या आणि माझ्या हाताला धरून पाठीवरून हात फिरवत मला वर्गात घेऊन गेल्या .मी रडत रडत त्यांच्याबरोबर आत गेले .मी हळूच आईकडे बघत होते .ती जाण्याच्या तयारीत दिसली. मग मात्र माझा धीर सुटला .आणि दप्तर तिथेच टाकून मी आईच्या मागे धूम पळत सुटले. बाई हाक मारत होत्या पण मी मागे वळुनही पाहिलं नाही .नंतर आई दप्तर घेऊन आली पण मी शाळेपासून लांबच थांबले .नंतर आई बाबा दोघांनी खूप समजावून सांगितलं. डब्यातला खाऊ आणि इतर गोष्टींची लालूच दाखवली. मग हळूहळू मी शाळेला जाऊ लागले ..आणि मला शाळेची इतकी गोडी लागली की मी शाळा कधीच बुडवली नाही.
इयत्ता नववीत असताना मी जिल्हास्तरीय गायन स्पर्धेत भाग घेतला होता. मला गाण्याची खूप आवड होती. मी नेहमी गाणी गुणगुणत असे. माझ्या गाण्याच्या दोन परीक्षा ही झाल्या होत्या पण मला लोकांच्या समोर गाणं म्हणायची खूप भीती वाटायची. समोर माणसं बघितली की शब्दच फुटायचा नाही. जे यायचं तेही सगळं विसरून जायचं. पण आईने या स्पर्धेत मला न सांगताच नाव नोंदवलं होतं .आणि घरी येऊन मग मला सांगितलं. मी म्हणणार नाही म्हणून खूप दंगा केला ,रडले .एकदा तर मला स्वप्न पडलं की मी स्टेजवर गेले आहे पण मला गाण्यातील एकही शब्द आठवला नाही. आणि मी रडत रडत स्टेजवरून खाली आले .हे ही आईला सांगितले .पण ती ऐकायलाच तयार नव्हती .तिने मला खूप समजावले. शेवटी कशी तरी मी तयार झाले.
आई माझ्याकडून रोज गाणं म्हणून घ्यायची .सराव व्हावा म्हणून घरी कोणी आलं की त्यांच्यासमोर गाणं म्हणायला लावायची.शेवटी एकदा स्पर्धेचा दिवस उजाडला. सकाळपासून छातीत भीतीन धडधडत होतं .आईला म्हटलं ,तू समोर बस तरच मी गाणं म्हणेन .स्पर्धा संध्याकाळी पाच वाजता होती .चार वाजल्यापासून आई मला तिथे घेऊन गेली. हळूहळू लोक जमू लागले .स्पीकर लावला .तयारी झाली .स्पर्धकांना पुढे बोलावले .आईला सोडून जाताना मला धरणी पोटात घेईल तर बरं असे वाटले .मी कसेतरी पुढे स्पर्धकांच्यात जाऊन बसले .आता काही इलाज नाही हे मी ओळखले .आणि अचानक माझे विचार बदलले. मी ठरवले की, आता गाणं म्हणायचं आहे तर छानच म्हणायचं .अजिबात घाबरायचं नाही .लोकांच्याकडे बघायचंच नाही .आपलं आपण बिनधास्त गाणं म्हणायचं ."केल्याने होत आहे रे ,आधी केलेची पाहिजे "ही उक्ती मनाशी पक्की केली .थोड्याच वेळात माझं नाव अनाउन्स केलं आणि ापायर्या चढून मी स्टेजवर गेले .माइक समोर बसले .आणि लोकांकडे बघून बिनधास्तपणे "भूलोकीच्या गंधर्वा तू अमृत संगीत गा "हे गीत मी म्हंटल .गाणं संपलं .लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला .आईच्या चेहऱ्यावरचा आनंद मला सारं काही सांगून गेला. सगळ्या लोकांनी माझं खूप कौतुक केलं .मलाही आपण गाणं म्हणू शकतो हा आत्मविश्वास त्या क्षणांनी दिला .स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. माझा प्रथम क्रमांक आला .तिथपासून मला गाण्याची खूप गोडी लागली .या गाण्याच्या आवडीनच मला आयुष्याचा जोडीदारही मिळवून दिला .
शाळेत नोकरी करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे आनंद देणारे क्षण अनुभवता आले. एकदा आमच्या शाळेला कविवर्य नारायण सुर्वे यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांना त्यांच्या कविता अभ्यासक्रमात असल्यामुळे त्या कवितांची पार्श्वभूमी आणि काव्यगायन असा कार्यक्रम झाला .सुर्वे जी हेअत्यंत 'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी 'असं व्यक्तिमत्व .ते येताना टु व्हिलर वरून आले .मानधन किती द्यायचे ?असा आम्हाला प्रश्न पडला .आम्ही एकमेकात चर्चा करत होतो .पण त्यांनी सांगून टाकले, "मला फक्त श्रीफळ द्या "आणि तो दिलेला नारळही तेथेच आमच्या शाळेतील सरांना देऊन गेले .तर या कवीवर्यांचे आभार मानण्याचे काम माझ्याकडे होते .मी आभार मानले .आणि आभारा बद्दल केलेलं छोटसं काव्यही वाचलं .ते ऐकून त्यांनी माझं खूप कौतुक केलं .आणि मी त्यांची सही मागितली ,तेव्हा स्वतः चा अक्षरात कविता लिहिलेला कागद त्यावर सही करून मला दिला .आणि 'लिहिते रहा 'असे सांगितले. त्या क्षणी खरोखर मी अत्यंत भारावून गेले .आणि मी त्यांना वाकून नमस्कार केला .हा क्षण आणि त्यांनी दिलेला तो कागद माझ्या जीवनातील अमूल्य ठेवा आहे .
आयुष्
य म्हणजे सुख दुःखाचे झोके.त्यावर आपण झुलत असतो ,'तो 'वरचा झुलवेल तसे .माझ्या तेवीस वर्षाच्या मुलाला कॅन्सर झाल्याचं निदान झालं .खूप औषधोपचार केले .दर आठवड्याला आम्ही मुंबईला टाटा हॉस्पिटल ला त्याला नेऊन उपचार करून येत होतो .शेवटी त्याच्या कॅन्सरचा प्रकारही अगदी दुर्मिळ असा म्हणजे 'न्यूरो इंडो क्राइम कार्सिनोमा ऑफ द नोज 'हा निघाला .हा अगदी दुर्मिळ आणि त्यामुळे त्याच्या केसेसही खूप कमी .डॉक्टरनी सांगितल्यावरून त्याचं ऑपरेशन केलं .काही दिवस बरे गेले .परत रेडिएशन झालं .पण आजार कमी होण्याचं चिन्ह नव्हतं .तो वाढतच चालला होता .देव, नवस ,भविष्य ,डॉक्टरी उपाय सगळं चालू होतं पण उतार काही पडत नव्हता .अशातच मिरजेला कॅन्सर हॉस्पिटल सुरू झालं .तिथेही उपचार सुरु केले .पण उपयोग होत नव्हता .एक दिवस डॉक्टर विनय कुमार यांनी आईला बोलवा असे सांगितले. म्हणून मी माझ्या वडिलांना घेऊन डॉक्टरांकडे गेले .तेव्हा त्यांनी जगातल्या या प्रकारच्या केसेस , काही स्लाईड्स दाखवून माहिती दिली .आणि अचानक प्रश्न विचारला ,"तुम्हाला दुसरा मुलगा आहे का ?आता तुम्हाला या मुलाला हळूहळू विसरावे लागेल तो आता कधीही कोमात जाईल आणि सहा महिने ,एक वर्ष कितीही दिवस कोमात राहू शकेल ."त्या क्षणी अंगावर वीज कोसळावी तसं मला झालं. त्यांचे पुढचे शब्द मला ऐकूच येत नव्हते .मला डोळ्यापुढं फक्त अमित ---माझा मुलगा --दिसत होता. माझं मन आक्रोश करत होतं .मी हतबल झाले होते .मी नि:शब्द झाले आणि तिथून निघून रिक्षात बसून घरी आले .मी हरले होते ....पूर्णपणे .त्या क्षणानी मला पूर्णपणे बदलवून टाकलं. पुढे दोन महिन्यातच तो गेला .आम्हाला सगळ्यांना सोडून.... . .
पण याच काळात एक एक सुखद घटनाही घडली. त्यामुळे मुलगा गेल्याच दुःख थोड सुसह्य झालं. मला दोन्ही मुलच. पण मुलगी असावी असं मला खूप वाटायचं .मुली असल्या की घरातलं वातावरण बदलून जातं .मुलींना माया ,प्रेम ,जिव्हाळा जास्त असतं. त्या घराला बांधून ठेवतात .मुलींची हौसही खूप करता येते . माझी ही इच्छा पूर्ण झाली नाही .पण माझ्या मुलाला सप्टेंबर 1999 मध्ये मुलगी झाली .आम्हाला सुनेच्या वडिलांचा फोन आला. मुलगी झाल्याचे त्यांनी सांगितले .आम्हाला खूप आनंद झाला कारण आमच्या घरात आम्हाला हवी असलेली मुलगी आली होती. तिच्या रूपानं आमचं स्वप्न पूर्ण होणार होतं. घरात मुलगा आजारी असताना तिचा जन्म झाल्यामुळे घरचं वातावरण थोडं बदललं होतं .आम्ही तिला बघायला गेलो आणि गोरी गोरी ,गोंडस ,गोबऱ्या गालाची नात पाहून मी तर हरखूनच गेले .तिची उंची छान होती .बोलके डोळे जणू आम्हाला आश्वस्त करत होते .तिन बाळ मुठीत माझं बोट पकडलं आणि वाटलं जणू ती सांगते आहे ,"मी हे बोट कधी सोडणार नाही काळजी करू नका "तो इवलासा चिमणा जीव त्या क्षणी उचलून मांडीवर घेतल्यावर आजी होण्याचं जे समाधान मिळालं ते केवळ अवर्णनीय !म्हणून ही आर्या आमच्यासाठी जीव की प्राण आहे.
माझे पती डी एड कॉलेजवर प्राचार्य होते .सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना पार्किन्सन्स हा आजार झाला .आम्हाला तोही मोठा धक्का होता .ते लहानपणापासून गाणं म्हणायचे .नंतर त्यांनी अनेक भावगीते ,सिने गीते यांचे कार्यक्रम केले .सेवानिवृत्त झाल्यावर गीतरामायणाचे अनेक कार्यक्रम केले .आणि जवळजवळ दोनशे लोकांना गीत रामायण शिकविले, पण ते नि:शुल्क.गेल्यावर्षी त्यांना चिकनगुनिया झाला .पार्किन्सन्स वाढू लागला होताच ,त्यात ही भर पडली .अचानक खूप ताप येऊ लागला .तीन आठवडे अतिदक्षता विभागात ठेवावे लागले. कॉंम्प्लीकेशन्स वाढत गेल्यामुळे पुण्याला दीनानाथ हॉस्पिटल येथे ऍडमिट केले .पण या काळात बेड रिडन झाल्याने त्यांना बेडसोर झाले .त्यामुळे ती जखम भरून यायला आठ नऊ महिने लागले .हळूहळू ते उठून बसू लागले .काही काळाने वॉकर च्या सहाय्याने घरातल्या घरात चालू लागले .आता ते ठिक आहेत .आता जेवण ही व्यवस्थित सुरू झाले .पण या काळात पार्किन्सन्स मुळे त्यांचा आवाज क्षीण होत गेला. गाण्याचा आवाज राहिला नाही .ही गोष्ट त्यांच्या मनाला खूप लागायची .गाणं म्हणताच यायचं नाही .आणि गाणं हे तर त्यांचं टॉनिक होतं .पण आमची देवावर पूर्ण श्रद्धा होती .काही दिवसांनी श्रद्धेमुळे म्हणा किंवा उपचारांनी असेल त्यांचा आवाज परत येऊ लागला .थोडं थोडं गाणं म्हणता येऊ लागलं .ज्या दिवशी पहिल्यांदा त्यांनी पेटी वाजवून गाणं म्हटलं त्यादिवशी मला अक्षरश:आनंदाने नाचावच वाटत होतं .त्या क्षणाला मला एक कविता सुचली .आणि मी देवाला कृतज्ञतेने आणि श्रद्धेने जोडले.
प्रत्येकाच्या आयुष्यात अशा कडू-गोड आठवणी असतातच .कधी हसवणाऱ्या ,कधी रडवणाऱ्या आणि कायम स्मरणात राहणार्या .काहींना हळवेपणाची किनार असते. त्या आठवणी म्हणजे एक खजिना असतो .जेव्हा मन उदास होतं ,एकटेपणा जाणवतो ,तेव्हा हा बंद करून ठेवलेला हृदयाचा कप्पा हळूच उघडला आणि त्यात डोकावलं ,की मन प्रफुल्लित होतं .आयुष्यात गेलेला प्रत्येक क्षण म्हणजे आठवणच बनत असतो .तो आपल्याला काहीना काही शिकवत असतो .म्हणून म्हटले आहे ,"प्रत्येक पाऊल वाटेवर रेंगाळतो तो ,.तो क्षण.. . . "
"हृदय कुपीतील क्षण सोबती
कधी हसवती कधी रडवती
कधी असे त्या किनार हळवी
. कधी स्पर्श हळुवार फुलवी
कधी कसे पावसाळती डोळे
असा स्मृतींचा गंध दरवळे.. .. "