शंभू
शंभू
अर्धवट आभाळलेलं आकाश.
एखाद दुसऱ्या चांदणीची ढगांच्या शालीमागून होणारी चमचम.
संध्याकाळच्या पावसाने अंमळ भिजलेली माती. तरी तिचा सुवास बंद दारांतूनही घरात शिरला होता.
आज छोट्या शंभूच्या घरी गणपतीच्या आरतीला जरा उशीरच झालेला. शंभूच्या बाबांना ऑफिसमधून यायला उशीर झाल्याने आरती खोळंबून राहिली होती. त्यामुळे आल्या आल़्याच त्यांची लगबग सुरू झालेली.
"अगं, दूर्वांची जुडी नाही दिसते, आणते़स का? मला उशीर झाला तर तयारी नाही का करून ठेवायची!"
"येणाऱ्या जाणाऱ्यांकडे तुम्ही होता का पहायला? घ्या!" म्हणत शंभूच्या आईने टेबलावर दूर्वांची जुडी पटकली.
शंभूला गंमत वाटली. आई सहसा रागावत नसे. त्यामुळे कधी आई चढ्या आवाजात बोलली की त्याला भीती नाही वाटायची , उलट गंमत वाटायची. बाबांची मात्र जरा भीती वाटायची.
" आता काय वाईट बोललो मी यात?" बाबांनी कपाळाला आठ्या आणून विचारले व आरतीची तयारी सुरू केली.
"येवढीशी आरती करायला क्येवढा तो गोंधळ!" शंभू मनातल़्या मनातच खुदकन हसला.
"जा रे शेजाऱ्यांना बोलवून आण"
बाबांचा आदेश पाळत शंभूने शेजाऱ्यांना आमंत्रण दिले.
आरती सुरू झाली तशी माझेच उच्चार अधिक स्पष्ट, माझ़्याच आरतीचे "व्हर्जन" कसे बरोबर, माझा आवाज बाई किती सुरेल, मीच किती निःस्सीम भक्तीने गातो वगैरे गोष्टींचे नकळत प्रदर्शन करत मध्येच भसाड्या आवाजात, मध्येच हळू मध्येच एखादे कडवे गाळत लोक गाऊ लागले. आधी गणपतीच्या दोन तीन आरत्या, मग शंकर ( शंकराची आरती करताना का कोण जाणे शंभूला आपलीच आरती होतेय असं वाटायचं आईने कधीतरी सांगितलेलं शंभू म्हणजे शंकर बाप्पा) , देवीची. मग विठोबा, दत्त, हनुमान सगऴ्यांनी नंबर लावले.
शंभू मधेच आईला म्हणाला, "पण विठोबाचे आईबाबा तर वेगळे ना? गणपतीच्या आईबाबांची आरती ठीक आहे, एकाच फॅमिलीतले. पण हे बाकीचे पाहुणे कशाला?"
"शूss,! असं नाही बोलायचं. बाप्पा आहे, आरती म्हण!"
आईनं बजावलं.
म्हणता म्हणता ज्ञानेश्वर माऊली अवतरल्या. "आता हे कुठून आले " असं मनात म्हणत शंभूनं जांभई दिली. बाबांना ते दिसलं तसं त्यांनी डोळे मोठे केले. आईनं चटकन हात ठेवला शंभूच्या तोंडावर.
घालीन लोटांगण सुरू झालं.
आणि अचानक वीज गेली. काही करता येईना अजून मंत्रपुष्पांजली व्हायची होती.
आईनं एक मेणबत्ती आणून ठेवली.
इतक्यात खिडकीतनं एक काजवा आला चमचम करत. शंभूने पटकन आरती घेऊन खिडकीकडे उडी मारली आणि काजव्याला आपल्या चिमुकल्या हातांत धरले व बोटांतल़्या फटीतून हिरव्या प्रकाशाकडे पहात राहिला.
"आई! हे बघ काये हे!"
असं म्हणून तो फिरतच होता इतक्यात बाबांनी हातावर फटका मारून म्हटलं " अरे सगळ्यांना अक्षता फुलं देण्याऐवजी हे काय किडे गोळा करत बसलायस!"
शंभू बघतच राहिला , मनातल़्या मनात रागावला पण खिडकीकडे पाहात आरती साठी जमलेल्यांना अक्षता फुलं देऊ लागला.