Varsha Bapat

Others

4.4  

Varsha Bapat

Others

शलाका

शलाका

2 mins
355


          रोजच्यासारखीच एक सकाळ. सवयीने तिला जाग आली. सहज तिची खिडकीबाहेर नजर गेली. बाहेर अंधारून आलं होतं. रवी महाराजांनी जणू दडी मारली होती. पहिला पाऊस येणार वाटतं...तिच्या मनात आलं. गेले काही महिने प्रचंड उकाड्याने हैराण केलं होतं. दुपारी तर बाहेर पडण्याची सोयच नव्हती. अवघी सृष्टी तापून निघाली होती. 


          तशी ती एकटीच घरी होती आज. तो ऑफिसच्या कामासाठी दौर्‍यावर आणि लेक ६ महिन्यांपूर्वीच लग्न होऊन सासरी गेली होती. डिसेंबरमध्ये शलाकाचा लग्नसमारंभ नेटकेपणाने पार पडला होता. तसा तिला लग्नात भपका, दिखाऊपणा नकोच होता. शलाकाचंही तेच मत. सगळं कसं छान जुळून आलं. त्यानंतर अधूनमधून अशा एकटेपणाची तिच्यावर वेळ येत होती. महिन्या दीड महिन्यातून एकदा त्याला ऑफिसच्या दौर्‍यावर जावं लागायचं. सुरूवातीला तिला या एकटेपणाचीही नवलाई वाटली. सगळा वेळ आपल्या स्वतःसाठी. ही पण चैनच की... पण आजची सकाळ काही वेगळीच होती. बाहेरच्या ढगाळ वातावरणाने असेल कदाचित, पण तिच्या मनातही मळभ दाटून आलं. नकळत तिचं मन भूतकाळात शिरलं...


          काॅलेजचे ते रम्य दिवस. लेखिका व्हायचं होतं आणि आर्टस घेतलं होतं तिने. भरपूर वाचन करायची. मानवी मन, भावभावना यांची जाण, नातेसंबंधांचं कुतूहल, सभोवतालच्या घटनांचं निरीक्षण आणि जमेल तितकं फिरणं यांची शिदोरी घेऊन जीवनप्रवास चालू होता. आणि एक दिवस अचानक त्याचं स्थळ आलं सांगून. आई म्हणाली, "इतका चांगला योग आला आहे. आयुष्यात सगळं कसं वेळच्या वेळी झालेलं बरं असतं." तिलाही आवडला तो. त्यामुळे विशेष आढेवेढे न घेता तीही तयार झाली लग्नाला. सगळं कसं झटपट घडून आलं. मग यथावकाश शलाकाचा जन्म...ती गुंतत गेली संसारात. तिच्यातली लेखिका केव्हाच मागे पडली. तसे तिच्या आयुष्यात चढउतार नव्हतेच. मग आताच ही उदासी का ? ती आपल्याच विचारात गुंग.


          अचानक फोनच्या आवाजाने तिची तंद्री भंग पावली. कोण असेल बरं ? तिने फोन उचलला. "आई, कशी आहेस?" पलिकडून आवाज आला. ओहो ! शलाकाला आज सकाळीच कशी आठवण झाली? "अगं आई, बघ ना कशी मस्त पावसाळी हवा झाली आहे. तुझ्या हातच्या भज्यांची आठवण आली म्हणून फोन लावला लगेच. तिची उत्साही चिवचिव चालू होती...पण मिळालेल्या थंड प्रतिसादाने काहीतरी बिनसलंय याची कल्पना आली तिला. लगेच म्हणाली, "बरं नाही का तुला? अशी उदास का तू? एकटी आहेस घरी म्हणून? ऐक ना, wonderful idea, काहीतरी लिहित का नाहीस तू? मागे एकदा म्हणाली होतीस ना की तुला लेखिका व्हायचं होतं म्हणून. मग आता सुरूवात कर लिहायला. हीच वेळ आहे...


          अचानक कुठेतरी लखकन वीज चमकली. ढगाळ वातावरणात क्षणभर प्रकाश लकाकला. अरे हीच तर शलाका. झाकोळलेल्या मनाला उजळून टाकणारी. पहिल्या पावसाला सुरूवात झाली होती. त्याच उजळलेल्या मनःस्थितीत ती झटकन उठली आणि आलं घातलेल्या गरमागरम चहाचा कप घेऊन खिडकीत तिच्या आवडत्या जागी येऊन बसली; बाहेरील दृश्य नजरेत साठवत. पहिल्या पावसात भिजून हिरवीगार झाडं मोहरली होती. तापलेली धरती शांत झाली होती.       


Rate this content
Log in

More marathi story from Varsha Bapat