सदू
सदू


फेसबुकचे आभार मानावे तेवढे थोडेच.या फेसबुकने मला माझ्या अनेक विद्यार्थ्यांच्या संपर्कात आणले. 2004 सालची माझ्या आयुष्यातील पहिली ब्याच..
पहिले प्रेम... पहिली ब्याच...सारं पहिलं विसरणं तसं अशक्यच!
वर्गातील सर्वच मुले स्मरणात राहतील असेही नाही.काहींचे विस्मरण होते तर काही त्यांच्या सद्गुणामुळे,हुशारीमुळे चिरकाल स्मरणात राहतात.अगदी 'तो' ही तसाच होता.ज्या दिवशी आम्ही दोघे फेसबुक फ्रेंड बनलो, त्याच दिवशी मेसेंजर वर त्याने 2004 ते 2007 या तीन वर्षाच्या काळातील त्याचे प्रगतीपञक शेअर केले.तब्बल एका तपापेक्षाही जास्त काळ लोटला होता तरी त्याने ते कार्डस् जपून ठेवले होते.. त्याच दिवशी मेसेंजर वर त्याने 2004 ते 2007 या तीन वर्षाच्या काळातील त्याचे प्रगतीपञक शेअर केले.तब्बल एका तपापेक्षाही जास्त काळ लोटला होता तरी त्याने ते कार्डस् जपून ठेवले होते...माझा आनंद गगनात मावत नव्हता.इतक्या दिवसाने का होइना तो संपर्कात आला होता..मन नकळत भूतकाळात शिरले. तो लहानपणी खूप चंचल आणि खोडकर होता.म्हणून मी त्याला रागावून सद्या म्हणायचे.कितीही रागावले ,ओरडले तरी नुसते दात काढणारा सदू म्हणजेच सद्दाम चाँदसाब मंदिवाले..उर्फ "सदू"..
मु.पो.हसूर दुमाला..ता.जि.कोल्हापूर ..
सरळ नाक ,पाणीदार डोळे,
मोत्यासारखे शुभ्र दात..अन् मोत्यासारखेच स्वच्छ अक्षर ..एरव्ही वर्गात सदूची हुशारी दिसायची नाही,पण परीक्षेत पेपर इतका स्वच्छ आणि सुंदर लिहायचा की, हमखास पहिला- दुसरा नंबर यायचाच.सदू आणि त्या वर्गातील मुलांचा सहवास तीन वर्षेच होता..त्या नंतर तीनेक वर्षाने मी बदलून औरंगाबादला आले..गेली सात/आठ वर्ष जणू तिकडचा सगळा संपर्क तुटला होता..पण आठवणी
पुसल्या गेल्या नव्हत्या..म्हणूनच का काय 2018 ने मला हसूरमधील अनेक विद्यार्थ्यांच्या संपर्कात आणले..सदू मला कोल्हापूरला या म्हणून फोनवरून,मेसेज करून आग्रह करत होता.आमच्या दोघांच्याही पती- पत्नीच्या व्यवसायिक कारकीर्दीला त्याच गावातून सुरूवात झाली होती.दर एक /दोन वर्षांनी कोल्हापूरला जावून आल्याशिवाय आम्हालाही राहवत नसे. 2018च्या दिवाळीच्या सुट्टीत तिकडे जायचा योग आला..
कोल्हापूरला एक दिवस थांबून आम्ही दुसऱ्या दिवशी हसूरला निघालो.सदूने विवेक,ऋषिकेश,विशाल,अर्चना फडतारे..जेवढे गावात उपलब्ध होते,त्या सर्व चमेटला खबर देवून ठेवली होती.गावच्या माजी सरपंच आमच्या स्नेही होत्या.त्यांच्या घरी जेवणाचे आमंत्रण होते.गाडी गावात शिरली ..पहिल्याच चौकात सदू विवेक,ऋषी,विशालसह उभा होता.वयाच्या दहाव्या वर्षी पाहिलेली मुले ...आणि आज इतक्या वर्षांनी तरुणाईत प्रवेश केलेली ती मुले... किती फरक झाला होता सगळ्यांच्यात..लहानपणीचा चंचल सद्दाम..आता शांत,समजदार भासत होता.त्याच्या निर्मळ कांतीवर स्मित हास्य खुलून दिसत होते. त्याला मला पहिल्यांदा त्याच्या घरी न्यायचे होते.त्याच्या म्हणण्यानुसार त्याची अम्मी माझी वाट पाहत होती.सदू आणि इतर मुलांसह मी माझ्या मुलांना घेवून एक /दोन गल्ल्या ओलांडून सदूच्या घरी गेले.मला लवकर ये असं सांगून यजमान सरपंच वहिनींच्या घरी गेले.
शेणा-मातीने सारवलेले सदूचे घर होते ..मात्र स्वच्छता ,टापटीप, नीटनेटकेपणा कमालीचा होता.सदूच्या अम्मीने सुहास्य वदनाने माझे स्वागत केले.मी त्यांच्या घरी गेल्याने त्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता.मला कुठे ठेवू नि कुठे नको असं त्या माऊलीला झालं होते.माझी विचारपूस करून जणू त्या मला आशीर्वादच देत होत्या.. सदू तुमची नेहमी आठवण काढतो.त्यामुळं बरं झालं बघा तुम्ही आमच्या घरी आलासा..ही 'आलासा...गेलासा' ची भाषा ऐकून जुने शालेय दिवस आठवू लागत..भाषेमुळे सुरूवातीच्या काळात खूप गमतीदार किस्से घडले होते.एखाद्या व्यक्ती /स्थळाविषयी ओढ निर्माण होते तेव्हा भाषा तितकी महत्त्वाची ठरत नाहीच...
सदूच्या अम्मीला आपल्या दोन्ही मुलांविषयी खूप अभिमान होता.मोठा मुलगा मुंबईला शिकत होता.तर सदू बी.एसस्सी. करत होता.सदूविषयी सांगताना त्या म्हणाल्या, गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना तो हवाहवासा वाटतो.लहान मूल असो वा म्हातारं माणूस तो कुणालाही उलटून बोलणार नाही..त्यामुळे लेकरं ,म्हातारी माणसे त्याला बोलल्याशिवाय ,भेटल्याशिवाय दारावरून पुढे जातच नाहीत..
आपल्या मुलांनी खूप शिकावं ,मोठं व्हावं असं त्या माऊलीला वाटत होतं...आपल्या वाट्याला जे कष्ट आलं ते आपल्या मुलांच्या वाट्याला येवू नये म्हणून सदूचे अम्मी अब्बू मोलमजूरी करत होते.आपल्या मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करू पाहत होते.सदूची अम्मी सदूविषयी भरभरून सांगत होती..सदू जवळच उभा राहून नुसता गालातल्या गालात हसत होता..लाजत होता..तो बी.एसस्सी करतोय ..पण तो पुढे काय करणार आहे, हे काही मी त्याला विचारले नाही..ते एवढयाच साठी की, तो भविष्यात जो होईल तो... पण आज तो एक चांगला विद्यार्थी , चांगला मुलगा ..चांगला मित्र सिद्ध झालाच होता.आता भविष्यात जो कोणी होईल तो निश्चित आदर्श च होणार यात मला शंका नव्हती. त्याच्या सारख्या हुशार मुलानं आपल्या गरीब आई-वडीलांचे स्वप्न पूर्ण करावेत एवढीच अपेक्षा.
सदूच्या अम्मीने माझ्या साठी पोहे बनवले.सुदामाच्या पोह्या इतकेच ते ही मला रुचकर लागले होते.ज्यावेळी सदू माझ्या हाताखाली शिकला तो काळ माझ्या नोकरीची सुरुवात होती.त्यावेळी माझ्याकडेही फक्त
ज्ञान नावाचा तिसरा डोळा होता,अनुभव नावाचा गुरू नव्हता.नाही तर सदू आणखी समृद्ध बनला असता..
निघते वेळी सदूच्या अम्मीने माझी खणा-नारळाने ओटी भरली. शेजारणीकरवी हळदी-कुंकू ,नारळ,ब्लाऊज पीस देवून हिंदू धर्म परंपरेनुसार ओटीभरण केले.एका मुस्लीम स्त्री ने तिच्या मुलाच्या भूतकाळातील हिंदू शिक्षिकेप्रती दाखवलेले प्रेम ,आदरभाव..तिला दिलेला सन्मान पाहून मी भारावून गेले होते.इतक्या श्रीमंत मनाच्या व्यक्तीपुढे आपल्या गाड्या,बंगलेही नगण्य ठरतात.आजपर्यंत खूप ठिकाणी खणा-नारळानं ओटी मिळाली होती, पण सदूच्या अम्मीनं त्या दिवशी भरलेली ओटी माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरली होती.तिथे मिळालेला आदर,सन्मान कोणत्याही पुरस्कारापेक्षा कैक पटीने मोठा होता.शेवटी निघताना जवळच्या मंदिरात त्या मुलांनी काही फोटो घेतले. सदूने एक छोटासा बुके मला दिला.ती मुले,सदू,त्याची अम्मी अर्ध्या रस्त्यापर्यंत मला सोडवायला आली होती.मी पुढच्या सुट्टीत परत यावं अशी सर्वजण विनंती करत होते...
आतापर्यंत खूप वेळा मी कोल्हापूरला गेले होते..पण यावेळची सफर सदू आणि त्याच्या आईमुळे अविस्मरणीय ठरली.सदू नि त्याच्या आईने मला तेव्हा जगातील सर्वात किंमती भेट दिली होती, आणि ती म्हणजे ..." *आनंद* "....जो कितीही पैसा ओतून मिळवता येत नाही.त्याच्या तुलनेत मी त्याला काहीच देवू शकले नाही..पण माझ्या कथेत...हृदयात त्याला नित्य स्थान असेल....