रोजनिशी
रोजनिशी
सध्या 'भेटी टाळणं आणि घरी रहाणं' हिच म्हण सगळीकडे रुजते आहे.त्यामुळेच मुलं घरी.. अस्मादिक घरी... !!
आज एक मस्त मजेशीर घडलं... दुपारची वामकुक्षी चालू होती.चलचित्र खिडकी समोर पोरगं आरामखुर्चीत टाकून,पाय पसरून बसलं होतं.अचानक खटखट...ऽऽऽखटऽऽखट असा आवाज आला.... मंडळीची नॅप जरा जास्तच सजग होती,तेवढ्यात आम्हांस बोलल्या.."... "अहो, जरा बघा बरं... स्वयंपाक घरात मांजर आली की काय..??"
घरीच राहायचं म्हणल्यावर..डोळे थोडे किलकिले करीत शुक ...शुक ऽऽऽशुकककक म्हणत आम्ही किचन गाठलं अन् पाहतो तर काय....आमचं लाडकं,....एक छोटी डिशेस त्यात मस्त एक पोळी...पातीचा कांदा तेल मीठ घेतलेलं आणि पठ्ठ्या मेतकूट शोधायला लागला होता...त्यामुळेच जवळपास पंधरा एक डब्यांची झाकणं इतस्ततः पडलेली...!!
आम्ही त्यावर म्हणालो, " अरे....ऐ.... बाबा काय शोधतोस रे...??"
पोरगं बोललं.."ओ जरा तुम्ही थांबा ते मेतकूट शोधतोय...?? बघा ना डिश मधे मीठ व तेल आधीच घेऊन ठेवलंय..!!"
या शोध मोहिमेत मग आम्ही सुद्धा त्याचे पार्टनर झालो. मग काय एक नवीन संगीतकारच झाले तयार.... बाप्पो (बाप पोरगं=बाप्पो) नावाचे आता तर टन ...ऽऽऽटनाटन....ऽऽऽ खटखट ऽऽ... खळ्ळ ऽऽ खळ्ळकन .... ऽऽ पुनः टनटण आणि या मेतकूट शोध मोहिमेत एक दिमाखदार संगीतच तयार झालं आपोआप.. याचे शिल्पकार आम्ही बाप्पो .... !!!
आता दुपार पार भरात होती. बाहेर ऊन... तो विषाणू... जिकडे तिकडे तो एंबुलेन्स/ पोलीस वाहनाचा आवाज व आमचं स्वयंपाक घर डबा संगीत...मज्जाच मजा..!!
तेवढ्यात आमचे गृहमंत्री नयनभाई डोक्यावर हात ठेऊन आमचेसमोर हजर..... पोरगं हातात डिश व न लागलेला शोधावर उपाय म्हणून लोणचं आंब्याचं..ऽऽ लोणचं आंब्याचं पुटपूटत पसार.... आता आरोपी एकटाच पिंजऱ्यात अडकलेला.....😘😘 मग काय चांगली अर्धातास इन कॅमेरा झाडाझडती... संपुर्ण चालता बोलता पुरावाच त्यांचे हाती... पुनः सक्त कानउघडणी...आणि शोध काय घेतला म्हणून उलट तपासणी.... आंम्ही घामाघूम... निमुटपणे सगळा वृत्तांत दिला...आणि गॅसवर चहा ठेवते जाहलो.
जसा जसा चहा भाईच्या गळ्यातून उतरला तसं मग सुरू झालं.....हं..ऽऽ आता ऐका नीट...., मी सांगते तेवढं आता करा... नाहीतरी तुम्ही दोघांनी माझी झोप मोड केलीच आहे. लागा कामाला....
आधी एक किलो हरभरा डाळ डब्यातून बाहेर काढा...आता एक काम करा मोठी वाटी आणि एक तुपाची वाटी घ्या... ती माळ्यावर ठेेेेेेवलेली आपल्या शेतातील उडदाची डाळ एक मोठी वाटी काढुन घ्या, हं झालं का..? आता एक-एक मोठी वाटी भरून गहू,तांदूळ,मुग बाजुला काढुन घ्या... आता सौंनी घेतलेला चहा चांगलाच रंग आणू लागला.... तुपाची वाटी घेतली ना...हां मग धणे काढुन ठेवा त्या वाटीने... त्याच अर्ध वाटीभर जिरे घ्या. त्या डब्यातल्या एक चमचा मेथ्या घ्या.... हो बरं अर्धा चमचा तो परवा आणलेला एलजी हिंग बाजुला ठेवा.एक हळकुंड मिक्सर मधे बारीक करा,आणि अर्ध कुंड साईजची सुंठ सुध्दा बारीक करा.लगेचच मोहरी एक चमचा खलबत्त्यात वाटुन ठेवा...त्याचीच चव चांगली येते मिक्सर मधे नाही येत चव...! हे न विचारताच बहुमोल मार्गदर्शन मिळाले.
हं... सगळं व्यवस्थित घेतलं का..? हे नीट पुनः बघा, आता पाचऐक मोजुन मिरे घ्या.
आता मी सगळं पंधरा वीस मिनिटात जे भाजुन घ्यायचं ते देते....आमचे प्रश्नार्थक मुख पाहून.. गॅसवर टोपले ठेवत कशी जिरली...(आवाज करता का माणूस झोपल्यावर...??) या अर्विभावात डाळी भाजत्या झाल्या. एक एक सगळं भाजण,बारीक केलेल्या पुड, एका गोलाकार ताटात टाकुन एकत्रित करायचा आदेश प्राप्त झाला...
सगळंच निमूटपणे करताना....पोरगं मात्र दीड पोळीचा ढेकर देत पाणी प्यायला आलं... ते हसत हसतच...आता आमचं व पोराचं मेतकूट (खायचं) दोन्हीचा कच्चा माल तयार होता, फक्त चवीसाठी लागणाऱ्या सुक्या दोन लाल मिरच्या तेवढ्या टाकायच्या बाकी होत्या. पुन्हा लाॅकडाऊन म्हणून थोडं सगळं थंड झालं की आम्हीच आणलं दळून हे दुपारचं संगीतमय "मेतकूट"..!
खरं म्हणजे या अशा वातावरणात...या छोट्याछोट्या गोष्टीत आनंद शोधला की आपसुक आयुष्यातलं खमंग समाधान मिळतं..हेच खरं..!
©️®️दीपा..!!
