Omkar Bapat

Others

4  

Omkar Bapat

Others

रम्य ते बालपण- आंब्याचा सिझन

रम्य ते बालपण- आंब्याचा सिझन

4 mins
173


आंबा या शब्दांतच मला फार रस आहे. सर्व फळांचा हा राजा. त्यात देवगडचा/रत्नागिरी हापूस म्हणजे जणू चक्रवर्ती सम्राटच. केसरी, तोतापूरी, पायरी, बैंगनपल्ली इ. बाकीच्या आंब्याच्या जाती या सम्राटाचे जणू मांडलिक राजेच. उन्हाळ्यात दिग्वीजयाला निघालेला हा सम्राट पुण्या-मुंबईतच श्रीमंताचा पाहुणचार करत रमायचा. सोलापूरसारख्या कोकणापासून दूर रहाणार्‍या आम्हां सामान्य जनतेला आमच्या लहानपणी याची फारच वाट पहावी लागायची. सामान्य जनतेला हा सम्राट फारच “महाग” होता. आम्ही आपली “पायरी” ओळखूनच बाकीच्या मांडलीक राजांच्या कौतुकातच रममाण व्हायचो.


लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत बर्फाचा गोळा, वाळा/मोगर्‍याची फुले घातलेले माठातील थंडगार पाणी आणि क्रिकेट या साध्या गोष्टींचे अप्रूप होते. या गोष्टी केल्या म्हणजे लईच चंगळ केली असा (गैर) समज आम्हां मित्रात होता. त्यात हापूसचा आंबा म्हणजे सर्वात वरची कडी. आडनावाने कोकणस्थ असूनही गेल्या कित्येक पिढ्या ‘देश’स्थ, त्यामुळे तिखट झुणका आणि लसणीच्या तिखट चटणीबरोबरच घरात गोड पदार्थांना तेवढाच मान होता. प्रत्येक सणाला त्याप्रकारचे गोड पदार्थ भरभरून व्हायचे. पंगती झडायच्या, भरपूर आग्रह व्हायचे, पैजा लावून जेवण्याच्या पंगती चालत पण त्यांना आंब्याच्या मोसमातील आमरसाच्या पंगतीची सर नाही.


डोंबिवलीहून दर उन्हाळ्याच्या सुट्टीत येणारी आत्या हमखास हापूस आंब्याची पेटी व नानकटाई आणायची. मग या सम्राटाचे एकदम भव्यतेने स्वागत होई. अस्सल हापूस कसा ओळखावा याची प्रात्यक्षिके मग त्याचा दीर्घ श्वास नाकात भरून घेऊन, त्याच्या रंगावरून त्याची कशी पारख करावी इ. चर्चा वडिलधार्‍या मंडळीमध्ये रंगत. आमचे सगळे लक्ष मात्र आमरस कधी काढणार याकडे लागलेले असायचे. दरवर्षी यावेळची पेटी मिळवताना मागच्या वेळेपेक्षा किती जास्त त्रास झाला, किती घासाघीस करावी लागली आणि ही पेटी कशी स्वस्तात मिळवली अश्या तुलना/चर्चा व्हायच्या. मुंबईहून आलेली ती पेटी मात्र घरात नवीन आलेल्या सुनेसारखी सगळ्यांच्या आकर्षणाचा भाग ठरून, मनातल्या मनात भाव खात स्वयंपाक घराच्या मधोमध बावरून बसल्यासारखी वाटायची. सगळेजण तिच्याकडे कौतुकाने पहात. बाबा आणि काकांनी आणलेल्या पेटया तिच्या मैत्रिणीसारख्या भासायच्या.


पहिल्या आमरस पार्टीचा दिवस ठरला जाई, बहुतेक करून आत्त्या आल्यानंतरचा पहिला शनिवार हमखास ठरलेला असायचा. सकाळपासूनच घरात लगीनघर असल्यासारखी घाई उडलेली असायची. सकाळी आजोबांची देवपूजा झाली की बाबा, काका आणि आजोबा एकत्र बसून आंबे निवडत. आम्ही सगळी बच्चेमंडळी मागे उभे राहून आंब्याची मोजदाद करायचो. जो बरोबर मोजेल त्याला आजोबांची हमखास शाबासकी व एक साल-कोय ज्यादा मिळायची. मोठे कुटुंब असल्याने पिण्याच्या पाण्याच्या पिंपात रस काढला जाई. एरवी घरात मोजून होणार्‍या पोळ्यांसाठी लागणार्‍या कणकेचा गोळा हा त्यादिवशीच्या कणकेच्या गोळ्यासमोर म्हणजे हिमालयासमोर जणू पर्वतीची टेकडी (तुलनाच न करावी). पोळ्यांच्या थप्प्याच्या थप्प्या रचल्या जात. त्यात आई, धाकटी काकू, आत्तेबहिणी सगळ्यांचाच हातभार लागे.


पुरूषांना रस काढताना बघताना जाम धमाल येई. एक प्रकारचा धार्मिक भाव सगळ्यांच्या चेहर्‍यावर विलसतसे. आंबे पिळून मऊ करून देण्याच्या कामी परत आम्हा मुलांना बसविले जाई. रस काढून झाल्यानंतर सम्राटाच्या राज्यातील जहागिरी वाटल्यासारख्या त्या साली- कोईंचा गठ्ठा परत लहान मुलांमध्ये वाटला जाई. आपल्या साली-कोई लवकर संपवून इतरांच्या ‘मालमत्तेवर’ प्रत्येकाचा डोळा असायचा. डोळ्याच्या कोपर्‍यातून इशारेबाजी व्हायची आणि राजकारणात बनणार नाहीत येवढ्या लवकर गठबंधन तयार होत. गनिमी काव्याने मग त्या ‘मालमत्तेवर’ धाड टाकली जायची. लुटूपूटुच्या लढाया लढल्या जायच्या. त्या लढायात हमखास धारातीर्थी पडायचे ते आमचे पांढरे बनियन.


संपूर्ण मे महिना, या लढायांमधले बनियनवर पडलेल्या पिवळ्या डागांच्या त्या सगळ्या खुणा आम्ही एखाद्या विजयी वीरासारखे मिरवायचो. जेवताना इतरांच्या केलेल्या सगळ्या फटफजित्या आठवून सगळे विजयवीर 'वीर' रस विसरून ‘आम’रसावर उभा आडवा हात मारायचे. इतरांची केलेली गंमत रंगवून रंगवून सांगितली जायची आणि मग चिडलेल्याचा राग घालवण्यासाठी त्याला भाजी/कोशिंबीर खाण्यातून सूट मिळायची. पैजा लावल्या जात, वाढ रे वाढ त्याला असे आग्रहाच्या आवांजानी घर भरून जाई, वाट्याच्या वाट्या रिकाम्या होत आणि पोळ्यांच्या थप्यांची उतरंड कमी होत जायची. त्या पक्तींमधून, आग्रहातून डोकावणारा नात्यांतला गोडवा त्या आमरसाइतकाच अवीट वाटे. जेवणानंतर सगळ्यांच्या चेहर्‍यावरचे समाधान व तृप्तता ही त्या सम्राटाच्या कांतीवरील तेजाप्रमाणेच अलौकीक भासे.


आंब्याच्या रसाबरोबरच वाळा घातलेल्या माठातील थंड पाणी पिण्याची मज्जा काही औरच. त्यात मोगर्‍याची फुल घातली असतील तर लईच भारी!! अश्या पाण्याच्या चवी आणि थंडपणासमोर बाकी सगळी “थंडा मतलब ****” किंवा “असली प्यास बुझाव” वगैरे शीतपेये म्हणजे किस झाड की पत्ती!! पण त्याबद्दल नंतर कधीतरी सविस्तर लिहीन.


आजही मी आंबे निवडताना त्यांचे रंगरूप न्याहाळताना, प्रत्येक आंब्याचा सुवास नाकात भरून घेताना तासनतास हरवून जातो. माझ्या चिवटपणाची थट्टा करण्याची मजा माझी बायको व मुलगी भरभरून घेतात. पण घरात आमरस खाताना हेच थट्टेचे भाव कौतुकात बदलतात. मग त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद आणि समाधान पाहून मीदेखील तृप्तीची ढेकर देतो!!


Rate this content
Log in