रक्षाबंधन
रक्षाबंधन
नेहमीप्रमाणे दिपाआजीने रक्षाबंधनाला नविन रोपटे आणले व त्यांनी ते रोपटे अंगणात लावून त्या रोपट्याला राखी बांधली. हे सर्व त्यांची नात (ओवी) पाहत होती ओवी म्हणाली आजी मी नेहमी बघते, तु दरवर्षी नवीन रोपटे लावून त्याला राखी बांधतेस व नेहमी त्या रोपांची काळजी घेतेस हे तु अस का करतेस ?
दिपाआजी हसल्या व ओवीला मायेने जवळ घेतल व म्हणाल्या सांगते हं माझी लाडुबाई तु आणि जसा राम भाऊ बहिण आहात ना, तसे मी आणि माझा भाऊ (निरंजन), आम्ही खूप धमाल, मस्ती करायचो, एकमेकांच्या खोड्या काढायचो तुमच ते कार्टून आहे बग “टॉम ॲण्ड जेरी” अगदी तस होतो बग आम्ही. तुझ माझ जमेना अन् तुझ्या वाचून करमेना, यात्रेत मोठयान पिपाणी कोण जोरात वाजवणार, जेवताना लवकर कोणाचे होणार, पावसाळ्यात कागदाच्या होड्या कोण जास्त बनवून पाण्यात सोडणार अशा गमतीशीर स्पर्धा आम्ही करायचो. एखादा पदार्थ जर वाटून खायचा असेल तर पट्टीनेच मोजून मापून घेऊन मगच खाणार.
घरी बाबा असले की मला फारच मजा वाटायची. निरंजन मारायला येताच मी बाबा अशी हाक मारायचे तो बाबांना थोडा घाबरायचा व त्यामुळे छो पळून जायचा.
आम्ही काळजी देखील तितकीच एकमेकांची घ्यायचो. मी आजारी किंवा रडत असेल तर तो खूप मला हसवी. मी त्याला गृहपाठात मदत करायचे.
भाऊबीज, रक्षाबंधन हे सुपर स्पेशल दिवस होते आमच्यासाठी कितीही गडबड, गोंधळ असला तरी आम्ही या दोन दिवशी वेळ काढायचोच. अशाच एका रक्षाबंधनादिवशी तो म्हणाला ताई मला, आज तु एक वचन देशील का मी म्हणाले हो देईन. तो म्हणाला तू या दिवशी (रक्षाबंधनाच्या) मला राखी बांधायचीस व आणखी एक म्हणजे तू एक नविन रोपटे लावून त्यालाही राखी बांधायचीस. मी म्हणाले अरे पण मला सांग, रोपट्याला का राखी बांधायची यावर तो म्हणाला ताई मला राखी या शब्दाचा अर्थ सांग.
मी म्हणाले भाऊ-बहिणीच पवित्र नात सुंदर धाग्यात बांधल जात. राखी म्हणजे प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचे प्रतिक तसेच आपण एकमेकांचे रक्षण करू, काठीण काळात साथ देऊ या वचनांचे प्रतिकतो म्हणाला, मग मला सांग झाडे तर आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा देतात आपल्या पृथ्वीचे, पर्यावरणाचे रक्षण करतात, मग आपणही त्यांचे रक्षण करायला हवे ना.
मला त्याचे म्हणणे, विचार पटले. तो म्हणाला पुढे मी असेन, नसेन तु मात्र मला वचन दे की तु रक्षाबंधनाला नविन रोपटे लावून , त्याला राखी बांधणार व त्यांची काळजी घेणार. मी आनंदाने म्हणाले हो मी नक्की हे वचन पाळणार. आम्ही दोघांनी मिळून त्या दिवशी नविन रोपटे लावले व मी त्या रोपट्याला राखी बांधली व त्यानंतर प्रत्येक रक्षाबंधन या प्रकारे साजरी केली. तु (ओवी) साधारण एक वर्षाची असताना तो (निरंजन) आपल्याला सोडून गेला.
ओवीने दिपाआजीचे अश्रू पुसले व म्हणाली मी देखील आजी अशीच रक्षाबंधन साजरी करीन, चल आजी आपण रामला पण सांगू याबद्दल, म्हणून दोघी रक्षाबंधन साजरी करण्यास निघाल्या.
