प्रवास मातृत्वाचा प्रवास तिचा नि माझा
प्रवास मातृत्वाचा प्रवास तिचा नि माझा
भाग १
२४ मार्च २०१२ हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. कारण याच तारखेला मला पहिल्यांदा ही गोड बातमी कळाली होती की मी आई होणार आहे. विश्वास बसत नव्हता ,पण हे खरं होतं की माझ्या अस्तित्वाला पूर्णत्व प्राप्त करून देण्यासाठी ,मला मातृत्व प्राप्त करून देण्यासाठी माझ्यात एक जीव एक जन्म घेतोय हा अनुभवच मुळात सुखावणारा होता माझ्यासाठी .
माझी मातृत्वाची ही पहिलीच वेळ त्यात घरात मोठे कोणीच नव्हतं नवीन नवीन. सासुबाईंच्या आई आजारी असल्याने त्या त्यांच्या माहेरी गेल्या होत्या. आम्ही डॉक्टरांकडे चेक करायला गेलो कारण मला सारख्या उलट्या, मळमळ होत असायची आणि हा त्रास जर मला दुसऱ्या महिन्यापासून ते डिलीव्हरी पर्यंत होत राहिला. सुरुवातीच्या ४ महिने तर मला साधं पाणीदेखील पचायच नाही. प्रत्येक गोष्टीचा वास यायचा मळायचं सारख्या उलट्या व्हायच्या. पण तरीही माझ्या आत माझं बाळ आहे या कल्पनेनेच मी आनंदी व्हायची.
माझी पहिल्यांदा तीन महिन्याची सोनोग्राफी झाली त्यात मी पहिल्यांदा माझ्या बाळाच्या हृदयाचे ठोके एकूण व माझ्यात असलेला जीव हलताना पाहून मी हसत होते आणि रडत होते. ती सोनोग्राफी रिपोर्ट दिवसातून एकदा तरी पाहून मी आनंदी व्हायचे की माझं बाळ तीळ -तीळ वाढतंय. पण जशी काही "मी माझ्याच मातृत्वाला नजर लावत होते की काय" हे तर येणारा काळच ठरवणार होता.बरं जेव्हा साडेतीन महिने झाले तेव्हा मला पहिल्यांदा माझ्या माझ्या बाळाच्या हृदयाचे ठोके जाणवू लागले होते तुम्हाला सांगते मी नेहमी शांत होऊन बाळाच्या हृदयाचे ठोके अनुभवण्याचा ऐकण्याचा समजण्याचा , त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे.आनंदी व्हायचे की माझ्या बाळाला ही माझ्या हृदयाचे ठोके जाणवत असतील का? ऐकू येत असतील का? हा अनुभव शब्दात न मांडता येणार आहे.
दिवसांमागून दिवस जात होते बाळ पोटात असताना मी भागवत ऐकली बरेच पुस्तकही वाजती त्यात एपीजे अब्दुल कलाम, पांडुरंग शास्त्री आठवले "देह झाला चंदनाचा" (अर्धच) मंदिरा बेदीच "आय डेयर",स्वाध्यायाचे श्राद्ध भाग-1-2, "मरण कळा" इत्यादी बाळासाठीचे काही चांगलं ते सर्वच करण्याचा मी प्रयत्न करत होते. कारण मला वाटायचं की माझ्या बाळाने मोठं होऊन इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवावे. पण हे कुठे माहीत होतं मला की माझं बाळ इतरांपेक्षा वेगळं होण्यात घडण्यात बहुदा नियतीचा डाव होता. असो मला खूपदा पोहे खावेसे वाटायचे पण तेेंव्हा करून देणार कोणी नसल्याने मी कितीदा बनवायचे पण तोंडात घास येईपर्यंत ते नकोसे व्हायचे तशेच किती वेळेस टाकून द्यायची पण माझ्या पतीने मात्र काही अंशी माझे डोहाळे पुरवले असे म्हणायला हरकत नाही मला कांदा, लसणाच्या साध्या वासाने ही उलटी मळायचं, पण नंतर नंतर मला मंचुरियन आणि सोडा पिण्याचे डोहाळे लागले होते ते यांनी पूर्ण केले. ६ व्या महिन्यात बाळ पोटात खूप लाता मारायचं, हात चालवायचं चक्क दिसायची पोटाची हालचाल होताना.किती वेळा तर मी रात्र रात्र झोपायचे नाही. पण तरीही खूप सुखद व गोड आठवणी होत्या त्या.
डॉक्टर सांगायचे की बाळाच्या ठोक्यांकडे लक्ष ठेवत जा ते कमी व्हायला नको तेव्हा तर मी दिवस रात्र बाळाच्या हृदयाचे ठोक्याकडे लक्ष ठेवायची, मोजायची चक्क लिहून ठेवायची. तसेच सात महिने पूर्ण झाली आणि माझे वडील मला घ्यायला आले आणि आता मी वरून ध्ये्े माहेरी डिलीव्हरीसाठी आले. आई ही माझी खूप काळजी घ्यायची . स्वयंपाक करायचा असल्यास मला मळायचं म्हणून कधीच घरात थांबू देत नसे. रोज सकाळ-संध्याकाळ फिरायला न्यायची ९ व्या महिन्यात तिने माझं डोहाळजेवणाचा कार्यक्रम केला तेव्हा माझ्या सासरच्याना ही बोलवलं.
जशी जशी वेळ जवळ येत होती माझी भीती वाढत होती आई म्हणायची नॉर्मल डिलिव्हरी व्हावी पण मला वाटायचं की सिजर व्हाव टेंशन नको. पण सर्वांनी माझी समजूत काढली नि मी भीत भीत मनाची तयारी केली.प्रायव्हेट डॉ.जाधवांकडे मी डिलिव्हरी पर्यंत ट्रीटमेंट घेतली व फक्त नॉर्मल डिलिव्हरी साठी सरकारी हॉस्पिटल मध्ये डिलिव्हरी करायचं ठरलं. इथे आम्हाला स्पेशल रूमही मिळालं. दीदी आली माझ्या डिलीव्हरीसाठी आईची मदत करायला.डिलीवरीची तारीख 23 ते 27 च्या आत दिली होती पण त्रास काही होत नव्हता मग अखेर 26 तारखेपासून मला त्रास सुरू झाला पण तो किती वेळ कि दिवस देवच जाणे सहन करत मी 27 तारखेला डॉक्टर जाधव कडे चेक करून आले पण अजून बाळ यायला वेळ आहे असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. पण शेवटी 28 तारखेला रात्री खूप असहनीय वेदना सहन करत मी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाले. त्यात हेही रात्री कन्नडला यायला निघाले .जेवण जात नव्हतं,त्रास तर खूपच होत होता रात्र जागून काढली.
सकाळी यांना भेटून थोडा धीर आला. सकाळी होता गुरुवार गजानन महाराजांचा दिवस आई व मावशीने मला अंगारा लावला नि म्हणाली माझ्या मुलीला सुखरूप मोकळं करा महाराज. दिवस मावळत सहा वाजेपासून माझा त्रास आणखीनच वाढला आणि मला ओपीडी मध्ये नेलं डॉक्टर जोशी होत्या तेव्हा पण तरी माझ्या सोबत माझी आई ,मावशी, बहीण, मावस बहीण एवढे सर्वजण मला धीर देत होत्या मी अगदी थंडीत सुद्धा घामाने न्हाऊन निघाली होती. चार दिवस व्यवस्थित जेवण नसल्याने अशक्तपणा जाणवत होता शेवटी शेवटी तर डोळ्यापुढे अंधार पसरत चालला होता असं वाटत होतं आता मी वाचणार नाही पण माझ्या बाळाचा विचार डोक्यात कुठेतरी बेशुद्धी तही घोळत होता. मी म्हणाले महाराज माझं काही होऊ दे पण माझ्या बाळाला तुम्हीच वाचवा आता तेवढ्यात माझ्या मोठ्या वहिनी तिथे आल्या आणि त्यांनी सर्वांना धीर दिला. स्पेशली मला माझे पाय चोळले दाबले कारण माझे पाय खूप थरथर कापत होते शरीरात त्राण उरला नव्हता .थोडे प्रयत्न करा तुमच्या बाळासाठी नाहीतर त्याचा जीव आत गुदमरेल असा शब्द ऐकताच मी पूर्ण प्राण पणाला लावून जोर लावला आणि 29 नोव्हेंबर गुरुवारी सायंकाळी ६.४ मिनिटांनी माझ्या बाळाने जन्म घेतला खरंच तेव्हा वाटलं की डिलीवरीत एक स्त्री मृत्यूच्या दारातून परतते असं का म्हणतात तिचा नवा जन्म होतो असं का म्हणतात सर्वजण. पण एवढ्या वेदनेने नंतर जो मातृत्वाचा आनंद असतो तो कधीही न विसरता येणारा, हवाहवासा वाटणारा क्षण असतो.
माझ्या बाळाला पहिल्यांदा पाहणं माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर कलाकृती पाहणं आपलं प्रतिबिंब पाहण्यासारखं होतं.मी तिला जेव्हा पहिल्यांदा स्पर्श केला तो क्षण मी आजही विसरू शकत नाही पहिल्यांदा मी तो "मातृत्वाचे स्पर्श "अनुभव केला कारण तेव्हा मी हसतही होते नि रडतही होते काय करावं, काय बोलावं मला खरच काही सुचत नव्हतं. मी फक्त तेव्हा हसत हसत रडत होते एवढच. हेही तेव्हा खूप खुश होते तिला पाहून .मला तर मुलगीच हवी होती. तीन दिवसांनी हॉस्पीटलमधून सुट्टी मिळाली नि आम्ही घरी आलो . मी तिला मांडीवर घेतलं की सारखी तिच्याकडे पाहायची तेव्हा आई मला रागवायची असं बघू नये बाळाकडे नजर लागते आणि आईची तर आधी लागते टाकतिला खाली. "पण तिला तर नियतीची आधीच नजर लागली होती हे पुढे वेळ दाखवणार होती". बाळ रात्री खेळतात म्हणून जागवतात पण माझं बाळ रात्री जागवायची कारण आम्हाला भुकेपेक्षा झोप महत्त्वाची असायची. तिला उठवण्यासाठी जागव लागायचं.म्हणता म्हणता तीन महिने झाले मी सासरी आले. लहान बाळ घरात म्हणून सर्वांचे खूप कौतुक असायचे. नंतर सहा महिने झाले नि तिचे बारशे करून आम्ही तिचं नाव ठेवलं *साची*. ७ महिन्यांची असतानाच तिला दात आले व तेव्हापासून तिची तब्येत जरा खालावली बाबा ,मामा असे बोबडे मधुर शब्द तिच्या तोंडून ऐकायला मिळायचे आणि माझे कान तृप्त झाल्यासारखे मला वाटायचे. साचु आता मोठी होऊ लागली होती मी तिला वरचे सर्व काही खाऊ घालायची.मी तिच्या खाण्यापिण्याकडे खूप लक्ष द्यायचे कधी बारीक चुरुन भाजी पोळी, रोज नमकीन पेज, सप्तधान्य ची पेज, नाचणीची पेज, सफरचंद उकडून.रोज एक भाजी नियमित तिच्या पोटात जायलाच हवी असा नियम ठेवला होता मी.
.............................
भाग २
असे दिवस निघत निघत तिचा पहिल्या बर्थडे होता तेव्हा काही कारणाने माझ्या माहेरी झाला.तेव्हा ती चालत नव्हती धरून धरून चालायची तरी मला खूप कौतुक वाटायचं पण असं वाटलं की काही मुले उशिरा चालतात .पण पुढे काय होणार होतं हे तिच्या आणि माझ्या आयुष्यात हे परमेश्वरालाच ठाऊक. ती दीड वर्षानंतर चांगली चालायला लागली बोबडे बोलायची तिच्या मोठ्या आईला बडी मम्मी म्हणता यायचे नाही म्हणून मम्ममम्म मम्मी म्हणायची. आठवलं की अजूनही हसू येतं ती चालायला लागली खरी पण तिचं चालणं थोडं वेगळं होतं पण लहान आहे म्हणून लक्ष केले नाही. ती दोन वर्षाची झाली तोही बर्थडे पुढचा काही कारणांमुळे कन्नडला झाला.नंतर एकदा त्यांच्या एका मित्राने सहज म्हणून तिला हाडांच्या डॉक्टरांकडे दाखवण्याचा सल्ला दिला. दाखवलेली पण त्यात थोडा प्रॉब्लेम होता काय होतात ते माहीत नाही पण त्यांनी आम्हाला सुरतच्या "सांची हॉस्पिटलमध्ये" दाखवायला सांगितले. आम्ही तिथे दाखवलं. तेव्हा तिच्या भरपूर एक्सरे टेस्ट कराव्या लागल्या. ब्लड सॅम्पल घ्यायचे पहावया जायची नाही तिची अवस्था. यांच्यासमोर दाखवायची नाही पण आतून खूप रडायला यायचं. पुढे सर्व गोष्टींमधून शेवटी असं कळलं की तिला *Spondyloepiphseal dysplasia* हाडांचा अनुवंशिक आजार असल्याचं सांगितलं व त्यात तिची उंची जास्त वाढू शकणार नाही. किती ते माहित नाही व पुढे तिला काय काय त्रास सहन करावा लागणार आहे हेही सांगता येणार नव्हतं.
पण मग जेव्हा पहिल्यांदा कळले तेव्हा मी एकांतात खूप खूप रडले, किती दिवस स्वतःला दोष देत राहिले की का असं केलं देवाने माझ्या आणि माझ्याच मुलीच्या बाबतीत.रोज रात्री मी देवाला रडून सांगायची की देवा तुला जी शिक्षा द्यायची होती जे काही होते ते माझ्या नशिबी द्यायचे असते माझ्या नि फक्त माझ्या बाळाच्या नशिबात कठोर शिक्षा तु का दिलीस. गरिबांच्या रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे सर्व काही चांगलं पाहून तर मी कालही आणि आजही एकच प्रश्न विचारते की देवा माझीच मुलगी का कारण प्रत्येक मुलाला वाटत आपण मोठं व्हावं. प्रत्येक आईला ही वाटतं की आपल्या बाळाला मोठं होताना ,वाढताना पाहावं. पण माझ्या नशिबी हे सुख नव्हतेच. ती सात वर्षाची असूनही तीन वर्षाची दिसायची ,कदाचीत मला वाटतं विज्ञान एवढी प्रगती करूनही जेव्हा डॉक्टर हात वर करतात याविषयी काहीच इलाज नाही असे म्हणतात तेव्हा हा नियतीचा खेळ समजावा.
........................................
भाग ३
पुढे माझी पिल्लू साडेतीन वर्षांची असताना शाळेत जाऊ लागली. नवीन नवीन एक दिड महिना ती खूप रडायची तिला रडतांना पाहून मलाही त्रास व्हायचा. मी तिथेच बाहेर बसायचे. नर्सरी मध्ये तिने पहिल्यांदा मध्ये "बम बम बोले "या गाण्यावर ग्रुप डान्स केला होता. पण पहिलीच वेळ असल्याने ती खूप घाबरली होती मी तिचं लोकमान्य टिळकांचे भाषण पाठ करून घेतलं होतं. नंतर jr. kgमध्ये असताना तिची लोकमान्य टिळकांच्या भाषणाची तयारी करून घेतली होती मी त्यात तिने पहिला नंबर हि मिळवला पुढे annual function मध्ये तिने पहिल्यांदा मी शिकवलेल्या "काला चश्मा" या गाण्यावर सोलो डान्स केला होता. तो क्षण माझ्यासाठी खूप अविस्मरणीय होता. शिकवलेली एकही स्टेप न विसरता तिने पूर्ण कॉन्फिडन्ट तो डान्स केला होता. आणि तिला स्टेजवरून खाली आणताना प्रत्येक जण तिला माझ्याजवळ बघून ही तुमची मुलगी का, खूप छान डान्स करते ,किती गोड आहे असे कमेंट करत होते .माझा तो आनंद शब्दात सांगू शकत नाही.
तिचा नेहमीचा अभ्यास मी नेहमी पूर्ण करून घेत असे म्हणून तिला sr.kg ला अडचण आलीच नाही . मी तिला शाळेत सोडायला -घ्यायला जात असताना दुकानाच्या छोट्या पाट्या लागायच्या त्या वाचून दाखवायचे नी तिच्याकडून वाचून घ्यायची याप्रकारे मी तिला जोड शब्दही तोडून कसे वाचायचे हे सीनियर मध्येच शिकवले होते. शाळेच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये मी तिला पुढे ठेवायचे कारण ती कुठेच कमी पडू नये असं मला वाटायचं .या सर्व गोष्टी मागचा माझा हेतू हाच होता की या बाकी गोष्टींमध्ये ती इतकी परिपूर्ण व्हावी की ,तिच शारीरिक अपंगत्व कुणाला दिसूच नये जाणवू नये. पुढे फेब्रुवारी महिन्यात डॉक्टरांनी तिला तळ पाया पासून ती मांडी पर्यंतचे बेल्ट चे दिले. जे तिला रोज रात्री घालावे लागणार होते.कारण तिचा सीटचा भाग बाहेर येत होता आणि पाठीचा भाग मध्ये जात होता आणि पायांमध्ये बऱ्यापैकी वाक होता म्हणून मला खूप चिंता होती की ती शूज घालते की नाही कारण ते खूप पॅक असतात.देव माझा लेकराला काय काय दिवस दाखवतोय असं मला वाटायचं. कारण ते घातले की तिला झोपच यायची नाही तिला शूज घालायच्या आधी मला रोज रात्री खूप रडायला यायचं. पण दुसरा उपाय नव्हता आमच्याकडे.मी बऱ्याच वेळा रात्र-रात्रभर तिच्याकडे पाहत राहायची. एकदा तर मी आणि हे (माझे मिस्टर) दोघे खूप रडलो कारण तिची ती पायांना बेल्ट शूज लावलेली अवस्था अजिबात बघवत नव्हती आम्हाला. पायाला साधा रुमाल बांधून ठेवू शकत नाही आपण पण तिला हे सर्व सहन करावा लागत होतं.
............................................
भाग ४
पुढे आमच्या दोघींच्या जीवन प्रवासात नवीनच वादळ उठणार होतं. पण इच्छा नसतानाही त्याचा सामना आम्हाला करावा लागणार होता मी सुट्ट्यांमध्ये माहेरी आली खरी पण परत गेलीस नाही. यांनीच यायला नाही सांगितलं होतं मला. आमच्यातील प्रेमाची जागा आता गैरसमजाने घेतली होती. अचानक काय झालं होतं मलाही कळत नव्हतं. मनात टेन्शन असंख्य प्रश्न असताना मी तो विषय तेवढ्यापुरता बाजूला ठेवायचा निर्णय घेतला. कारण रागात निर्णय घेणं केव्हाही चुकीच. पण मुलीला सांगायचं काय हा मोठा प्रश्न माझ्यापुढे होता. त्यात तिला कमी वयात जास्त समजत होती एक दिवस हिम्मत करून मी तिला प्रेमाने सांगितलं की आता आपण ईकडेच राहूया का मामाच्या घरी. तिने लगेच प्रश्न केला का ?आपल्या घरी का नाही जायचं? तिला मला खोटं बोलावं लागलं की, तुझे पप्पा म्हणाले की मी तुम्हाला घ्यायला येईल तेव्हा तुम्ही यायचं आणि सध्या मला खूप काम आहे वेळ नाही. ते येतील मग आपण जाऊ. तिची खूप समजूत घालावी लागली मला काही केल्या ऐकत नव्हती सांगायची जाऊया ना आपण पप्पांना न सांगता. पप्पांनी घरात नाही घेतलं तर आपण बाहेर ओट्यावर झोपू पण तु चल असा हट्ट करायची .तेव्हा बाजूला जाऊन मी खूप रडायची तिच्यासाठी की जन्मापासूनच माझी मुलगी कोणत्या कर्माची शिक्षा भोगती तिची काय चूक. मग स्वतःची समजूत घालायची की होईल सर्व ठीक तिच्या पप्पांचा कॉल येत नसे. मी व ती करायची ते उचलत नसे. मग मी ही कॉल करणं बंद केलं.
पुढे वेळ आली ती शाळेत जाण्याची तिथूनच आम्हा दोघांचा खरा प्रवास सुरू झाला. मी ही स्कूल जॉईन करण्याचा निर्णय घेतला. माझे एम. ए., बी. एड. झालेले होते. मी जिथे त्याच स्कूलमध्ये तिला टाकण्याचा विचार केला. पण दहा वर्षांचा गॅप होता डोक्यात टेन्शन, विचार खूप होते, पण कधी न कधी तर सुरुवात करावी लागणारच होती हा विचार करत मी पाऊल उचललं बरेच इंटरव्ह्यू दिले चिकलठानची स्कुल मला तिच्या दृष्टीने चांगली वाटली .सीबीएससी पॅटर्न होते तिथं पण बसने ये-जा यामुळे तिची दगदग व्हायची यामुळे घरच्यांचा त्याला विरोध होता आणि तिला तू तुझ्या सोबत नेहमी ठेवशील तर ती स्वावलंबी कशी होणार .असे विचार चालू होते त्यात ती मराठी मिडीयम ची विद्यार्थिनी होती . तिला थोडा अवघड जाणार होतं. त्यात शाळेत पहिल्याच दिवशी मुलं तिला बुटकी बुटकी चिडवत होते ती रडायला लागली मी कशीबशी तिची समजूत काढली तिला हि ते वातावरण नवीन होतं. मग कळालं की विद्यार्थी संख्या कमी असल्याने पहिलीचा वर्ग सुरू होणार नाही. मग मी कन्नड मध्ये कृष्णा इंटरनॅशनल स्कूल मध्ये तिला पाठवलं ऍडमिशन करणारच की एक दिवस तिच्या स्कूलमधून सरांचा कॉल आला की तुमच्या मुलीचं छातीत दुखतंय तिला ती रडतीए, मी तिला घरी घेऊन आले आणि पुन्हा तिथे पाठवलं नाही जवळच कृष्ण तारा स्कूलमध्ये तिचा ऍडमिशन केलं आणि मीही चिकलठान चा जॉब सोडला तिला पहिल्यांदा शाळेत सोडायला गेले ती रडायलाच लागली.
नवीन वातावरण होतो तिच्यासाठी मला ही भीती वाटत होती पण मी मन पक्क करून तिला तिच्या टीचर कडे सोडल आणि बाहेर पडले .तिची टीचर माझी मैत्रीण होती तिने तिला वर्षभर छान सांभाळून घेतलं. मराठी मिडीयम ची असून सर्व गोष्टी तिने लवकर कॅच केल्या तिची cursu lipiची हॅन्ड रायटिंग इतकी छान झाली होती. की टीचर तिची नोटबुक सर्व पेरेंट्स ला दाखवत असे. पुढे मी ही साखरवेला जॉइन झाले.तिकडे जाताना तो घाटचा रस्ता लागायचा सकाळी सकाळी हिरवागार थंड वारा असं वातावरण असायचं. पण खरं सांगते माझ्या मनात रोज एकच विचार यायचा मी बस मधून उतरावे आणि घाटातून खाली उडी मारून घ्यावी. एक दिवस गेला नसेल की मी रडले नसेल पण फक्त मुलीचा आणि मुलीचाच विचार करून मी कधी चुकीचा निर्णय घेतला नाही माझ्या नंतर तिचं काय होणार, तिला कोण बघणार त्यात तिची कंडीशन अशी कि तीला भावनिक शारीरिक, मानसिक दृष्ट्या आईवडिलांची गरज आहे तर हे नाही आणि मी हि नाही हात तिच्यावर अन्याय आहे ना आधीच निसर्गाने तिला दिलेली शिक्षा कमी आहे का तिला.आम्हा दोघींना वेळोवेळी तिच्या पप्पांची आठवण यायची.जुलै महिन्यात ती खुप आजारी पडली तिच्या टॉन्सिल वर सूज आली होती. दहा दिवस ती रात्रंदिवस मांडीवर होती जेवण जात नव्हतं, सारखी रडायची मी नसताना तिची आजी मामा -मामी तिला बघायचे .शाळेतून आली की माझ्या मांडीवरुन तर उतरायचीच नाही. रात्रीही तसेच मग माझे पप्पा तिला झोपवायचे. डॉक्टरांनाही तीनवेळा दाखवून झाले. पण हा त्रास लवकर बरा होत नाही वेळ लागतो. तेव्हा मला तिच्या वडिलांची खूप कमी जाणवायची पण सांगणार कोणाला.
पुढे शाळेत कराटे क्लास मध्ये तिची कराटे कॉम्पिटिशन मध्ये सिलेक्शन झाले.माझी इच्छा नसतानाही तिच्या इच्छेसाठी मी तिला कन्नड च्या विनायकराव पाटील कॉलेजमध्ये टुर्नामेंट होती तिथे घेऊन गेले सुरुवातीला भावासोबत गेले मी तिथे पण तिथे टोटल जेन्टस पेरेंट्स होते.तेव्हा मला खूप वाईट वाटले की ,हे असते तर हेही तिच्याबरोबर आले असते .पण सध्याचा प्रवास फक्त तीचा आणि माझाच होता. तिला हि हि जाणीव कुठे ना कुठे होत असावी फक्त मला बोलून दाखवत नव्हती. त्या स्पर्धेत तिला दोन कांस्य पदक आणि प्रमाणपत्र मिळाले. तिने 15 ऑगस्ट ला इंग्लिश मधून खूप छान भाषण केले होते सर्वांनी त्याचे खूप कौतुक केले .तेव्हा आपण तिच्यासाठी घेत असलेल्या कष्टांच कुठे ना कुठे सार्थक झाल्यासारखं मला वाटायचं. तिच्या त्या प्रश्नां पुढे मी निरुत्तर असायचे की आई पप्पा आपल्याला घ्यायला का येत नाही? कधी येतील? तुला पप्पांची आठवण येते का ग? मला तर खूप येते ? पप्पानाही आपली आठवण येत असेल का? अश्या असंख्य प्रश्नांचे काहूर तिच्या डोक्यात असायचं, पण कधी कधीच ती माझा मूड बघून मला सांगायची पण काय बोलणार मी तिला, हो बाळा येतील आपल्याला घ्यायला तुझे पप्पा तू चांगला अभ्यास कर मग येतील. असं बोलत मी विषय टाळायची.
...............................................................
भाग ५
पुढे 29 नोव्हेंबरला तिचा ७ वा बर्थडे झाला. पण हळूहळू आता मला त्रास होईल अशा गोष्टी बोलूनही दाखवत नसे. काही गोष्टी तिला मी न सांगताच समजत होत्या.पण ती मनात कुढतीए हे मला कळत होतं कुठे ना कुठे आम्ही दोघेही एकमेकांच्या मनाचा विचार करत होतो. पण नंतर नंतर कधीकधी ती खूप चिडायला लागली होती. अबोला धरायची पण मी कधीच तिच्या हात उचलला नाही .वर्षभर मी तिला तिच्या पप्पांची कमी जाणवणार नाही हा प्रयत्न केला. तिला जवळ घेऊन समजवण्याचा प्रयत्न केला.त्यात तिचे ते आणखी न संपणारे प्रश्न ,आई सर्व मैत्रिणी मध्ये मीच का लहान दिसते ?मी कधी मोठी होणार? मला वरच्या शाळेतली मुलं का हसतात ?माझ्याकडे पाहतात तेव्हा मी तिला एकच गोष्ट समजवायचे की बाळा देवाने आपल्याला जसे शरीर दिले तसे राहावे लागते. कोणाला तर हात नसतात ,कुणाला पाय नसतात आपल्याला तर सर्वच आहे ना देवाने दिलेले आणि तू फक्त इतरांपेक्षा वेगळी दिसते म्हणून ते तुझ्याकडे पाहतात.
हसता तर हसू दे त्यांना म्हणायचं मी तर दिसायला लहान आहे पण तुम्ही तुम्ही तर डोक्यानेच लहान आहात .मी एक गोष्ट लहानपणापासून तिच्यात रुजवण्याचा प्रयत्न करत होते कि बेटा तू फक्त दिसायला इतरांपेक्षा वेगळी आहे आणि ते वेगळेपण तुझ्या मेहनतीने अभ्यास करून तू टिकवून ठेवायचा आहे. अर्थात या गोष्टीसाठी ती लहान होती पण काही गोष्टी तिला सांगणं गरजेचं होतं मला. कारण तिची ही गोष्ट स्वीकारण्यात मलाच खूप दिवस लागले की ती जशी आहे तशी बदलू शकत नाही आणि यात कोणाचा काहीच दोष नाही. म्हणून मला तिलाही पॉझिटिव्ह ठेवायचा प्रयत्न करायचा होता.मी तिला नेहमी सांगायची की कोण काय बोलतोय यावर अजिबात लक्ष द्यायचं नाही आपलं काम आपण करत राहायचं असतं. त्यांनी सुद्धा तुझ्या जवळ स्वतःहून आलं पाहिजे. असा पण स्वतःला तयार करायचं त्यासाठी मी तिला नेहमी मोटिवेशनल व्हिडिओ दाखवायचे. त्यात हात नसणारे सुंदर पेंटर असायचे, पाय असणारे सुंदर डान्स करणारे कलाकार असायचे. पुढे मार्च महिन्यात मुलीच्या स्कूलमध्ये annual day function मध्ये तिला मुक्ताईची गोष्ट बोलून दाखवायची होती. आणि एका डान्स मध्ये ती होती. पाच मिनिटाची ती गोष्ट मी तिची छान पाठ करून घेतली तिथे खूप लोक असतील घाबरायचं अजिबात नाही असं सांगितलं होतं .पण वेळेवर ती थोडी घाबरली रडायला लागली .आधी घाबरली पण स्टेजवर जाऊन नंतर छान बोलली स्टेजवर.
शाळेच्या सरांनी तर "ताटी उघडा ज्ञानेश्वरा साची बैरागी" असा एक व्हिडिओदेखील YouTube वर टाकला सर्वांनी भरभरून कौतुक केलं तिचं .तिथेच काही स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. त्यात पालक व पाल्य यांना स्टेजवर बोलावून सत्कार केला. साचीलाही कराटे कॉम्पिटिशन कडून एक कांस्य पदक आणि प्रमाणपत्र शाळेचे संस्थापक सर व संस्थेच्या अध्यक्षा जाधव मावशी यांच्या हातुन सन्मानित करण्यात आले. बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत त्यांचे आई-वडील दोघं स्टेजवर येत होतो पण मी मात्र एकटीच तिला घेऊन स्टेज कडे चढली वाईट वाटत होतं की ह्या आनंदी प्रसंगात हेही आमच्या सोबत हवे होते. पण कुठेतरी मला मी ह्या एका वर्षात माझ्या मुलीसाठी एक सिंगल पेरेंट्स ची भूमिका निभावली होती त्याची काही अंशी तरी ही पावती वाटत होती. माझ्या सोबत साचीला पाहून जाधव मावशी म्हणजे संस्थेच्या अध्यक्षांनी मला स्टेजवरच विचारलं की तुझी मुलगी का बेटा ही खूपच ऍक्टिव्ह आहे. प्रत्येक गोष्टीत हुशार, त्याचं श्रेय तुलाही जाते.त्यांनी मला ओळखलं कारण मी लहानाची मोठी त्यांच्यासमोरच झाली होती शेजारी राहत होतो आम्ही आधी. साचीच त्यांच्या तोंडून कौतुक ऐकून मी खरच स्वतःला धन्य समजत होते. पण तरी तिच्यासाठी मी कुठेतरी कमी पडते असं मला वाटायचं.
पुढे कोरोना लॉकडाउनच्या पिरेड मध्ये मी सहज फेसबुकवर गुरु सह्याद्री तर्फे जिजाऊंवर एक ऑनलाईन स्पीच आहे असं वाचलं आणि लगेच रात्री ते भाषण लिहून काढले. विषय होता "*मा जिजाऊ एक संस्कार*" ती कंटाळा करत होती पण थोडं लाडात घेऊन तिच्याकडून मी ते पाठ करून घेतलं .कारण त्रास देणार नाही ते लहान मुलं कसले ! थोडं रागवून लालूच देऊन तुला जे हवं ते मी घेऊन देईल, बनवून देईल तू फक्त व्हिडिओ चांगला कर असं करत आम्ही दोघेही एकमेकांचा हट्ट पुरवत आपला हेतू साध्य करत होतो. पण व्हिडिओ करायच्या वेळेस तीला रडू येत होते. ती घाबरत होती.पण मी तिला थोडं रागावून तो व्हिडिओ एका दमात खूप मेहनतीने घेतला आणि आयोजकांना पाठवला तेव्हा तो त्यांना इतका आवडला की त्यांनी कॉल करून साचीला स्वतः तिचे कौतुक केले. मी युट्युब ची ती लिंक माझ्या ग्रुप वर सेंड केली.सर्वांची दोन दिवस कमेंट काहींचे कॉल चालू होते त्यातील एक कमेंट तर मला खूप आवडली माझ्या मैत्रिणीने पाठवलेली होती की तिच्या भाषण प्रमाणे तुही तिच्यावर जिजाऊ सारखी उत्तम माता बनून संस्कार करते .तिचे श्रेय तुलाही जाते.
नंतर पुन्हा १ जूनला मी ऑनलाईन स्पीच बघितलं विषय होता "मी आमदार झाले तर" माझा तालुका कोरोनामुक्त होण्यासाठी काय उपाय योजना करेल. विषय थोडा किचकट होता ती नाही म्हणत असतानाही मी भाषण लिहिलेले आणि जेमतेम तिच्याकडून पाठ करून घेतलं कारण तिच्या दृष्टीने विचार करून ते भाषण लिहावं लागत होतं पण केलं तिने २० जूनला स्पर्धेचा निकालही लागला त्यात माझ्या मुलीला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.
तर असा हा आम्हा मायलेकींचा आजपर्यंतचा प्रवास आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की एक बाळ आणि आई ची जन्माची नाळ एकच नसून त्यांचे संपूर्ण आयुष्य एकमेकांशी जोडलेला न संपणारा मातृत्वाचा प्रवास आहे आणि यात कितीही लिहू तरी कमीच वाटतं तसे तोलून मापून शब्द वापरण्याची सवय नसल्याने वाचकांना परीक्षकांना कंटाळा आला नसावा अशी आशा करते.
थोडक्यात "माझं जीवन हे माझ्या मुलीने सुरू होतो आणि तिच्यावर येऊन संपतो "वाचकांनी(परीक्षकांनी) आम्हा मायलेकींचा आजपर्यंतचा "प्रवास मातृत्वाचा " कसा वाटला हे कळाले तर खूप आनंद होईल. काही चूक निदर्शनास आल्यास अवश्य कळवावे. पुन्हा अशाच एखाद्या विषयावरती लिहिण्याची संधी मिळेल अशी आशा करते. लिहिण्याची संधी दिल्याबद्दल स्टोरीमिरर (आयोजकांचे) मनापासून आभार.
प्रत्येक आई ही त्याच्या बाळासाठी जगातली सर्वात सुंदर ❤️सुपर मॉम ❤️ असतेच, यात शंकाच नाही. अश्याच माझ्या आईला व आई सारखे प्रेम देणाऱ्या माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
