Vilas Kumbhar

Others

4.7  

Vilas Kumbhar

Others

परत फिरा रे....!!

परत फिरा रे....!!

6 mins
402


     अखेर नव-यासह सासरच्या सगळ्यांचा पूर्ण संबध तोडून मी माझ्या पंधरा वर्षांच्या मुलीसह, मोठे धाडस करून वेगळे राहाण्यास मुंबईला आले. पण क्षणाक्षणाला मनात विचार येत होते की ह्या मुंबईच्या मोहमाई माया बाजारात माझं अस्तित्व टिकवता येईल का?  लग्न ठरले त्या वेळी किती हुरळून गेले होते मी. किती गुलाबी स्वप्न उराशी बाळगली होती. लग्नानंतरची काही वर्षे चांगली गेली. एक कन्यारत्न ही झाले. अश्विन महिन्यात जन्मली म्हणून अश्विनी हे नाव ठेवलं. नंतर मात्र संसाराला नजर लागल्या सारखी झाली. दिराचं लग्न झाले नी घरातला सगळा नूरचं बदलला. जाऊबाईंनी घराचा कब्जा घेतला. मामाची मुलगी नी शिकलेली त्यात मी जेमतेम चौथी झालेली म्हणून तर तिचा जास्तच रुबाब. हळूहळू मला कमीपणाची वागणूक मिळू लागली. सासूबाईंचंही वागणं बदललं. मला मोलकरणीचं जीणं आलं. मग माझ्या नवऱ्याचे कान भरणे सुरू झाले. त्यांच्याही वागण्यात फरक झाला. नको त्या कागाळ्या त्यांच्या कानावर जाऊ लागल्या. घरात वाद होऊ लागले, भांडणे होऊ लागली. माझा, माझ्या माहेरचा उद्धार होऊ लागला. नवरा अजय, तो ही त्यांच्याच तालावर नाचू लागला. मला मारु लागला. दारूच्या आहारी गेला. जीवनाचे सारे गणितच बदलून गेले. स्वप्न सारी धुळीस मिळाली. 

     मी एकाकी पडले. माझी बाजू घेणारेच कोणी राहिले नाही. शेजारच्या माने काकांचा आधार असायचा. पण पंधरा दिवसांपूर्वीच ते दक्षिण यात्रेला गेले होते. अजयंना परोपरीने सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न केला. त्याचा उपयोग झाला नाही. या सगळ्याचा अश्विनीच्या मनावर विपरीत परिणाम होऊ लागला. अभ्यासातही दुर्लक्ष होऊ लागले. ह्या अति मानसिक छळा मुळे मी खचून गेले होते. नी अखेर यातून मुक्त होण्यासाठी नवरा, सासर सोडून अश्विनीसह वेगळं राहून अश्विनीच्या भवितव्यासाठी वेगळं राहून एकाकी लढा देण्याचा निर्णय घेतला. 

     मी सासर जरी सोडले असले तरी कुठे तरी अजय विषयी एक अंतरीक असूया वाटत होती. कुठे तरी मनात एक अपराधीपणा जाणवत होता . खरे तर मी खूप कठोरतेने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मी बॅगा घेऊन घरातून बाहेर पडताना अजय माझी गयावया करताना, विनवणी करताना पाहून मन थोडं द्रवत होतं. क्षणभर वाटून गेले की आपण हा निर्णय घेतोय तो चुकीचा तर नाही ना?  

    आम्ही नवीन जागेत राहायला आलो. अश्विनीचं हायस्कूलचे अॅडमिशन झाले. आवश्यक त्या गोष्टींची खरेदी झाली. हळूहळू शेजा-यांच्या ओळखी होऊ लागल्या. त्यातूनच एक घरगुती काम मिळाले. कंपनीच्या वस्तूंचे घरी पॅकिंग करून द्यायचे. दिवसाला जवळ जवळ दिडशे दोनशे रुपये मिळू लागले. हळूहळू कामाचा वेग वाढू लागला. त्यात फावल्या वेळात अश्विनीही मदत करायची. माझ्या कामाची सचोटी व जिद्द बघून मला कंपनीत कामाला घेतले. महिन्याचा पंधरा हजार रुपये पगार ठरला. मला तर परमानंद झाला. आता कुठे गाडी रुळावर येऊ लागली.

      अश्विनीला बरोबर घेऊन जीवन जगताना आम्हाला खूप वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. अश्विनी अंगापिंडानी धष्टपुष्ट, दिसायलाही रूपवान होती. मी नव-याला सोडून वेगळी राहातेय म्हटल्यावर लोकांचा आमच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन एक अबला, एक दुर्बल स्त्री असा होता. त्या कित्येक भुताळ नजरांना सामोरे जावे लागत होते. मदत ह्या नावाखाली कित्येक जण लोचट लगट करू पाहायचे. काहीतरी निमित्त करून घुटमळत राहायचे. पलिकडच्या गल्लीतील पवार बाईचा मुलगा प्रविण यानेही आमच्याशी सलगी वाढवली होती. ह्या ना त्या निमित्ताने तो यायचा. गॅस सिलेंडर मिळवून दे, दुकानच्या सामानाच्या जड पिशव्या घेऊ लागायचा. सुरवातीला तो खूप सरळ साधा निरागस वाटला. पण हळूहळू त्याच्याही वागण्यातला फरक जाणवू लागला. तो वेगळ्याच भावनेने माझ्या कडे आकर्षित होऊ लागला. माझ्या हातातील पिशवी घेताना मला जाणवेल अशा प्रकारे स्पर्श करायचा. कधी कधी संधी साधून मला घसटून जायचा. मलाच कस तरी अपराध्यासारखे वाटायचे. आणि चटकन डोळ्यासमोर अजयची मूर्ती दिसायची. त्याच्या सान्निध्यात कधी अशी कोणाची हिंमत झाली नाही. पर पुरुषांच्या स्पर्शाने मनात काहूर माजायचं. प्रवीणच नव्हे तर जिथे जिथे मी वावरत होते तिथे मला एक निराधार अबला म्हणून माझ्या कडे पाहायचे. त्यांच्यातील विषारी वासनायुक्त नजरा मला कमजोर करायचा प्रयत्न करत होत्या. अश्विनी बाबतीत मी अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष देत होते. तिच्या बरोबर बोलताना किंवा वागताना कोणी दिसले तरी मनात भीतीची एक लाट निर्माण व्हायची. कळपातून वेगळी पडलेली बकरी लांडग्यांच्या कळपात सापडल्या सारखे वाटायचे. खूप खूप असुरक्षित वाटायचं. 

     ईकडे अजयच्याही खबरा उडत उडत कानावर पडायच्या. अलिकडे सासरच्या शेजारच्या माने काकांचेही वरचेवर येणे जाणे वाढले. ते अजय बद्दल, सासुरवाडीकडचं अगदी मोजकच बोलायचे. कधी कधी म्हणायचे तू केलेस ते योग्यच केलेस. तुझा सासरी निभाव नसता लागला. तू निघून गेल्या नंतर अजय एकदम सैरभैर झाला. वेड्या सारखे वागू लागला. पश्चात्तापानी होरपळून गेला. अशा या त्याच्या वागण्याने भावाने व त्याच्या बायकोने त्याला अतोनात त्रास दिला. आई बाबांबरोबर त्याची रोजच भांडणं व्हायची. त्यांना म्हणायचा "तुमच्या मुळेच मी माझ्या सुमनला आणि अश्विनीला पारखा झालो. तुम्ही सुमनला नीट वागणूक दिली नाही. तुम्हीच तिचा छळ केला. मलाही खोटेनाटे सांगून तिला त्रास द्यायला लावलात. ह्या ह्या वहिनींनी सगळ्या संसाराचा विध्वंस केला. " 

     एकदा भांडणं पार पराकोटीला गेली. अजयला भावाने, त्याच्या बायकोने आणि तुझ्या सास-याने बेदम मारला आणि घराबाहेर हाकलून दिले. मी अजयला वेळोवेळी बजावण्याचा प्रयत्न केला. तो ठार बेफाम झाला होता. एवढे होऊनही तो माझ्याकडे यायचा मन हलकं करायचा. त्या नंतर सगळ्यांचा रोष पत्करून अजयला आमच्या कडे ठेवून घेतला. काका बोलत होते नि ऐकता ऐकता माझे डोळे भरून आले. मानेकाका बोलत होते इकडे माझे काळीज चिरून नीघत होते, धडधड वाढत होती. श्वासोच्छ्वास वेगाने वाढत होता.

     " पोरी अजयला आम्ही आसरा दिला. हळूहळू जगण्यातला अर्थ त्याला पटवून देऊ लागलो. संसार काय असतो हे पटवून दिलं. प्रथम त्याला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढले. तो आता पुर्ण पश्चात्तापाने होरपळून निघाला आहे. तो तुला भेटण्यासाठी तरसतोय, बेचैन झालाय. पण त्याला आम्ही थोपवून धरलाय. त्याला आम्ही आश्वासन दिलेय जोपर्यंत तू एक चांगला माणूस बनत नाहीस, जोपर्यंत तू कर्तृत्ववान बनत नाहीस,जोपर्यंत तू व्यसना पासून दूर होत नाहीस तोपर्यंत तुझी सुमन तुला परत मिळणार नाही. आणि ते तुला सिद्ध करून दाखवावे लागेल. तेव्हाच सुमन व अश्विनी तुझ्या जीवनात परत येतील. आणि त्यांना परत मिळवून देणे ही आमची जबाबदारी. आणि खरंच पोरी अजयच्यात बदल घडला. सुमन पोरी, ह्याच करता आजपर्यंत मी तुझ्या संपर्कात आहे. खोटीनाटी कारणे सांगून तुझ्याकडे येत होतो, तुझ्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. आणि आज खास तुझा सल्ला विचारायला आलो आहे.  

     अजयला सुधारण्याचे व्रत आम्ही घेतले होते. त्याचा संसार पुन्हा एकदा नव्याने उभारताना आम्हाला पाहायचा आहे. सुमन तुला माहीत आहे आम्हाला ना मूल ना बाळ. त्यामुळे अजयच्या लहानपणापासूनच आम्ही त्याला आमच्या मुलाच्या ठिकाणी बघत आलोय. आम्ही दक्षिण यात्रेला गेलो आणि मागे हे तुमचं असं घडलं. खूप अस्वस्थ झालो होतो मी. हे असं घडलंय यावर माझा विश्वासच बसेना. अजयची आणि घरच्यांचे कडाक्याचं भांडण झाले नी अजयला घराबाहेर काढलं त्याच वेळी आम्ही तुमचा संसार पुन्हा जुळवायचा असा चंग बांधला.   

     सुमन , अजयला त्याची चूक पूर्णपणे कळून आलीय. तो आता व्यवस्थित आणि वेळेवर कामाला जातो. आणि तू नक्की परत येणार या विश्वासाने त्याने तुम्हां साठी एक स्वतंत्र असं घर घेऊन ठेवलय. आणि केवळ आणि केवळ तुम्ही परत याल या आशेने वाटेकडे डोळे लावून बसलाय. पोरी, निर्णय तुलाच घ्यायचाय.  मला सांग सुमन , तू आणि अश्विनी येथे राहाताय, किती सुरक्षित आहात तुम्ही? घायाळ हरणिच्या शिकारीला टपून बसावेत, असे किती लांडगे तुमच्यावर टपून आहेत? कुणा कुणाच्या वासनेने बरबटलेल्या नजरेला तुम्ही चुकवणार आहात? अश्विनी तीळामासाने मोठी होत चाललीय. तिचं सौंदर्य, जवानी खुलत चाललीय. सांभाळू शकशील तिला? सांग सुमन सांग तू जिथे काम करतेयस, ज्याने तुला काम दिले, त्याची तरी नियत साफ आहे का? केवळ एक नाइलाज, एक गरज म्हणून तू हे सगळं सहन करतेयस, पचवतेस. का तर केवळ तुझ्या अट्टाहासा पायी, नी अश्विनीच्या भवितव्यासाठी. हो ना? काका मोठा अवंढा घेऊन थांबले. मी मात्र गर्भगळित होऊन गेले होते. काय बोलावं काही काही सुचत नव्हते. अंगातला त्राणच गेल्यासारखे झाले होते.   

     काकांनी पुन्हा सांगायला सुरुवात केली. मी भानावर नाही लक्षात आल्यावर त्यांनी मला खांद्याला धरून हलवलं. मी एकदम तंद्रीतून जागे झाले. नी पुन्हा त्यांनी बोलायला सुरुवात केली.  

     "मग पोरी आता मला सांग, तू हा घेतलेला निर्णय कितपत योग्य होता? चला त्या क्षणा पर्यंत तो ठीक आहे असे मानू या. पण ह्याही पेक्षा तू ह्यातून आपल्या नव-याला कसा बाहेर काढता येईल, याचा अधिक विचार तू करायला हवा होतास. घराबाहेर पडणारच होतिस, तर अशा ह्या एकाकी, असुरक्षित जीवन जगण्या पेक्षा माहेरात राहूनही ते तुला साध्य करता आले असते. पोरी सारासार विवेक बुद्धीने विचार कर. पुढच्या सुखी संसाराची मी हमी देतो. अजयवर लहान मुलासारखे प्रेम केलेय. त्यांच्यातला अविचाराचा सैतान मी काढून टाकलाय. तसचं पोरी, हे तुझं वाकडं पडलेलं पाऊल मला पुन्हा योग्य मार्गावर आणायचेय. किती केला तरी नवरा एक आधार असतो. एक कवच असते. कपाळावरचं कुंकू समोरच्याला दहा वेळा विचार करायला लावतं. पण केव्हा? ते ज्या वेळी बळकट असते त्या वेळी. मी उद्या येईन. काय तो निर्णय विचारांती मला दे. 

     मी भांबावून गेले होते. विचारशक्ती गोठून गेली होती. येतो मी पोरी . म्हणत काका पाठमोरे झाले, माझ्या उत्तराची वाट न बघता झपाझप पावले टाकत दृष्टीआड झाले.  मी मात्र काकांच्या विचारांनी अजयच्या बाबतीत पूर्ण वितळून गेले. नी काका माझा होकार घ्यायला कधी येतायत त्या गोड सोनेरी ऊद्याच्या वाटेकडे मी डोळे लावून बसलेय.  


Rate this content
Log in