परिवर्तन
परिवर्तन


हर्षाली माझी बाल मैत्रीण आज बऱ्याच दिवसांनी तिला भेटण्याचा योग आला आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तशी आमची मैत्री जशी तळहाताच्या रेषा न मिटणाऱ्या अशी होती जणू युगांयुगे असलेली मैत्री. मला भेटताच तिला खूप आनंद झाला. एखाद्या बालकाला त्याची हरवलेली प्रिय वस्तू सापडावी तसा आनंद तिच्या चेहऱ्यावर उमटला आणि तसाच आनंद माझ्याही चेहऱ्यावर उमटला.
बऱ्याच वर्षाने भेटल्याने आज हर्षाली खूप आनंदी दिसत हाेती. तिचा तो आनंद पाहूनी मी मनाेमन सुखावले. चहापाणी कार्यक्रम पार पाडता पाडता आमच्या गप्पांचा ओघ सुरू झाला. पण एक गोष्ट कुठेतरी मनाला खटकत होती. तिच्या बाेलण्यात ती पूर्वीची सहजता नव्हती. जरी हर्षालीचा चेहरा आनंदी दिसत हाेता तरी त्यात काहीतरी कमतरता भासत होती. न जाणे का तिच्या हास्यात मला दु:ख लपलेलं स्पष्ट दिसत होते. नक्कीच ती हृदयाच्या तळाशी प्रयत्नपूर्वक काहीतरी दडवत होती.
मी तिला तसे न दर्शविता अंदाज घेऊ लागले. सरते शेवटी माझ्या मनाची खात्री होताच मी सरळ मुद्द्यालाच हात घातला. म्हणाले, हर्षली तू नक्की खुश आहेस ना? का माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करते आहेस? माझ्या प्रश्नावर ती काहीशी गडबडली व सावरण्याचा निष्फळ प्रयत्न करत उतरली, क..क..कुठे काय? काहीच लपवत नाही. त्यावर मी ठामपणे म्हणाले, नाही! माझी मैत्रीण तू नाहीस. मी पाहिलेली, जिच्या सोबत खेळलेली हर्षली ती तू नाहीस. माझी हर्षली निखळ होती. ती निखळता कुठेच दिसत नाही. आता जी हर्षाली दिसतेय ती निखळला ओढून घेतलेली औपचारिकता आहे. खरं सांग काय झालंय? इथे इतका वेळ काळजाच्या आत दडलेला हुंदका क्षणात उचंबळून आला आणि डोळ्यांच्या कडा ओलावत बाहेर पडला. तिला धीर देण्यासाठी मी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिचा बांध फुटला. ती नकळत मला बिलगली.
काही वेळात ती सावरली आणि कहाणी मला सांगू लागली. तिने जे सांगितले ते ऐकून मी सुन्न झाले. तिच्या जीवनकथेचे प्रत्येक पान संघर्ष आणि अत्याचाराने भरलेले होते ते ऐकून अंगावर काटा उभा राहिला. ती सांगत होती तसे माझ्या चेहऱ्यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत होते. मनाचा संताप होत होता.
हीच का किती हर्षली? जी कधी जरा कुठे खरचटलं की आकाशपाताळ एक करत असे. आज ती असीम सहनशक्तीची मूर्ती बनली होती. कुठून आली तिच्यात इतकी सहनशक्ती.कदाचित एकटेपणाचा जाणिवेतून तर नसेल?
हर्षलीचा जन्म सर्वसाधारण कुटूंबात झालेला. हे कुटूंब सुखी समाधानी होती. पण वडिलांचे छत्र दैवाने लहापणीच हिरावून घेतले आणि सात्विक हुंकारात जन्मलेली हर्षली नातेवाईकांच्या आश्रयाला आली. पुढचे संस्कार तिच्यावर तिथेच झाले.
लग्नाच्या वयात आली तेव्हा लग्न जमवून तिचे लग्न करून दिले. लग्नानंतर तिचे आयुष्य सुखकारक हाेईल असे वाटले हाेते पण घरातले ती एकटी म्हणून त्रास देऊ लागले. कुठच्याही छाेट्या गाेष्टीची बाऊ करून तिला बाेलू लागले सतत तिला दाेषी ठरवू लागले ज्याच्या साेबत लग्न झालेला ताे जीवनसाथी सुध्दा तिला साथ देत नव्हता. कुणाकडे तक्रार न करता ती गप्प बसून सर्व सहन करीत होती. सहनशील हर्षिता सर्व सहन करीत होती.
आई वडिलांचे नाव खराब होऊ नये म्हणून सासू देईल ते काम ती करीत असे. तशी हर्षिता लहानपणापासून हुशार होती, कामात सहसा चुका होत नसत पण एखाद्या चित्रपटात खाष्ट सासूचा सीन असतो ना अगदी तसाच सिन हर्षिता आपल्या खऱ्या खुऱ्या जीवनात अनुभवत होती. सासू तिला सतत घालून पाडून बोलत होती आणि तिचा जोडीदार ज्याने तिच्याबरोबर सुखात दुःखात साथ देण्याचे वचन दिले होते तो सुद्धा आपल्या आईचीच बाजू घेत होता. तिला आधार असा कुणाचाच उरला नव्हता.तिचे लग्न लावून आपली जबाबदारी पार पाडली त्यांना ती आपल्या दुःखात सहभागी करू इच्छित नव्हती. सगळा शारीरिक मानसिक छळ ती मुकाट्याने सहन करत होती पण कुठवर सहन करणार? कुठेतरी हे थांबणे आवश्यक होते पण ती हतबल होती.सहन करत होती पण एके दिवशी सहनशीलतेचा अंत झाला आणि तिने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. ह्या पृथ्वीवर आपणास सुख नाही निदान स्वर्गात तरी सुख मिळेल पण नियतीला ते मंजूर नव्हते. हर्षालीने घेतलेला टाेकाचा निर्णय पण तिचे बलवत्तर नशिबाने व शेजारांच्या प्रेमाने निष्फळ ठरला. हर्षिताचा नवरा व सासू झाल्या घटनेने हबकून गेले. आता पोलिसांचा ससेमिरा आपल्या मागे लागणार ह्या कल्पनेने दोघांना घाम फुटला. पण हर्षली आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करत होती. तिने झाला प्रकार केवळ एक अपघात होता अशी साक्ष दिली आणि तिच्या नवऱ्याचा जीव भांड्यात पडला
पण झाल्या घटनेने ज्या पालकांनी तिला आधार दिला होता,त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला व पाठीमागे ते ठामपणे उभे राहिले. ते हर्षालीला चांगल्या तऱ्हेने जाणत होते. मृदू स्वभावाची हर्षाली अशी टोकाची भूमिका घेणारी कधीच नव्हती. नक्कीच या घटनेला तिची घरातील व्यक्ती कारणीभूत असावी, नव्हे तीच असणार. तिच्या खाष्ट स्वभाव त्यांच्या कानापर्यंत पोहचले होते पण आजपर्यंत हर्षालीच्या मुखातून ते कधी बाहेर पडले नव्हते आणि ते पडणारही नव्हते हे ते जाणून होते म्हणूनच त्यांनी सुद्धा तो विषय कधी ती नवऱ्याला बोलून दाखवला नव्हता. संस्कारी हर्षालीला सुद्धा ते आवडले नसते. पण आता बोलून दाखवावे असे त्यांना मनापासून वाटत होते. तिच्या नवऱ्याला इतकेच म्हणाले की, झाले नातेवाईकांचे मन कुलुषित करणारा आहे. आपल्याकडून अशी अपेक्षा नव्हती. आपण सुशिक्षित आहात आम्ही आडण्यांनी आपणास काय सांगावे. घरात भांड्याला भांडे हे लागतेच. त्याने आवाज हा होतोच पण त्या आवाजाचे मधुर संगीत करण्याचे काम तुमचे होते. तुम्ही ते करायला हवे होते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही त्याची परिणीती म्हणून आज आमची लेक यातना भोगते आहे. सुदैवाने काही बरेवाईट झाले नाही. अन्यथा परिणाम वाईट झाले असते हे सुद्धा आपण जाणता. तेव्हा भविष्यात असे काही घडणार नाही ह्याची काळजी घेणे तुमची जबाबदारी राहील. हर्षाली पूर्णपणे सावरेपर्यंत इथेच राहू द्या नंतर हवं तर तिला घेऊन जा.
हर्षलीच्या पालकांच्या बोलण्याचा परिणाम तिच्या नवऱ्यावर सकारात्मक झाला. त्याने त्यांचा म्हणण्याचा मान राखला व तो हॉस्पिटल मधून घरी निघून गेला. तेव्हापासून हर्षाली आपल्या पालकांच्या घरीच राहत होती. नेमकी एक दिवस माझी तिची गाठ पडली. तिची कहाणी ऐकून मन सुन्न झाले. तसेच तिच्या सासूचा आणि नवऱ्याचा रागही आला. तसाच राग हर्षालीचा सुद्धा आला. त्याच रागात , म्हणाले, तू माणूस आहेस की दगड? अग किती म्हणून सहन करशील? आणि का म्हणून सहन करशील? पुरे झालं आता. खूप सहन केलंस. आता स्वतःला बदल. एक सांगू हर्षीली! मन खंबीर कर आणि स्वतःच्या पायावर उभी राहा. सुदैवाने तुझे पालक माता पिता तुझ्यासोबत आहेत. त्यांच्या आशीर्वादाने तू स्वतःचे विश्व उभे कर मग बघ हेच तुला छळणारे तुझ्या मागे मागे फिरतील. एक ना एक दिवस त्यांना तुझी गरज भासेल. पण त्यासाठी तुला सिद्ध व्हावे लागेल. मला विश्वास आहे. मिळालेल्या धड्यातून शिकून आपण पुढे जायचं असतं. त्याच धड्यात अडकून पडशील तर उर्वरित आयुष्य अधिक गडद होईल.
माझ्या शब्दांनी बहुतेक तिला धीर आला. तिने आपले डोळे पुसले व काही वेळातच मला ती बालपणीची खेळकर आणि खोडकर हर्षाली भासली. त्यानंतर बऱ्याच जुन्या आठवणींना उजाळा देत आम्ही संध्याकाळपर्यंत नुसते बोलत होतो. तिच्या चेहऱ्यावर आलेलं हास्य पाहून मला खूप आनंद झाला याच आनंदात तिचा निरोप घेऊन मी निघाले.
घरी परतल्यानंतर काही दिवस माझ्या मनाच्या पटलावर हर्षाली अधून मधून येत राहिली पण पुढे कामाच्या राेजच्या धावपळीत मी गुंतून गेल्यामुळे हळूहळू ती माझ्या मनातून लुप्त होऊ लागली. काही महिन्यात मी हर्षाली प्रकरण विसरून सुद्धा गेले.
जवळ जवळ चार एक वर्षांनी पुन्हा योग जुळून आला आणि माझी आणि हर्षालीची गाठ योगायोगाने पडली. ह्यावेळी मला भेटलेली हर्षाली खूप वेगळी होती. आत्मविश्वास भरलेली तशीच बालपणीची हसरी खेळकर आणि खोडकर हर्षाली पुन्हा परतली होती. तिला ह्या रुपात पाहून खूप आनंद झाला. विचारपूस करता समजले की, हर्षाली आता स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे. त्यांच्या घरात सासू आणि तिच्या नवऱ्यात परिवर्तन घडले आहे. हे ऐकून मला खूप आनंद वाटला. मी सहज तिला हसत विचारले, हर्षाली! इतका बदल कसा काय घडला? त्यावर ती हसून उतरली, त्यावेळी नाही का तू आत्मविश्वास भरला! ही त्याचीच परिणीती आहे. त्या दिवशी तू निघून गेली आणि मी मनापासून निर्धार केला. तसा तू असतानाच केला होता पण तू गेल्यावर त्यावर अंमलबजावणी केली त्यास घरच्यांची साथ मिळाली आणि पुढचा मार्ग सुकर झाला. जवळजवळ वर्षभर मी माहेरी राहिले. मी मनाशी ठरवले होते की जोपर्यंत सासूबाई येऊन सन्मानाने घेऊन जात नाहीत तो पर्यंत सासरी पाय ठेवायचा नाही.
हे अधून मधून येऊन विचारपुस करून जात होते. नंतर नंतर तर नेहमीच येऊ लागले. ह्यांच्यातील बदल सुखावणारा होता. माझ्या निर्णयाला ह्यांनी सुद्धा पाठींबा दिला. माझ्या नसण्याने सासूबाईंच्या मनात निर्माण झालेल्या पोकळीबद्दल हे मला सांगू लागले. तिच्यात घडणारा हा बद्दल मला त्यांच्यामार्फत कळत होता. हळूहळू ती अधून मधून ती माझ्याबद्दल वरचेवर ह्यांच्याकडे चौकशी करू लागले मला काही माहीत नाही असेच भासवले तर एके दिवशी ती ह्यांच्यावर जाम चिडली व म्हणाली, अरे असा कसा तू नवरा? तुला तुझ्या बायकोबद्दल अजिबात काळजी नाही? आधी जा आणि ती कशी आहेत बघून ये. त्यावर ते तसेच पण तुलाच ती नको होती ना? सारखी घालून बोलत होतीस? मग आता अचानक त्यावर ती निरुत्तर झाली म्हणाली, हो! चुकलंच माझं. पण आता मला माझी चूक सुधारायची आहे. तू नको जाऊ मीच जाते आणि तिची मनधारणी करून घेऊन येते. तिच्या दूर जाण्याने मला माझी चूक उमगली आहे. मग काय सासूबाई आल्या माझी माफी मागितली आणि मी सुद्धा माफ केले. त्या दिवसापासून दोघे मायलेक माझी सर्वतोपरी काळजी घेतात. आता तर घरी नंदनवन फुललंय. आमचं गोकुळ पाहायला कधीतरी सवड काढून ये. असं म्हणून तिची बस लागली तशी पटकन निघून गेली. जाता जाता आपला पत्ता आणि फोन नंबर देऊन गेली.
तिच्या जाणाऱ्या बस पाहत मी बराच वेळ विचार करत तिथेच घुटमळत राहिले. दूर वळणावर बस दिसेनाशी होताच मी भानावर आले. नकळत ओठावर समाधानाचे स्मित तरळले अन् मन म्हणाले,
खरं पहायला गेलं तर एका स्त्रीची स्त्रीच प्रथम शत्रू असते. मग ती कधी सासूच्या वेशात येते तर कधी नणंदेच्या वेशात येते. कधीतरी शेजारणीच्या वेशात येते तर कधी कधी ती मैत्रिणीच्या वेशात सुद्धा येऊ शकते. स्त्री मत्सराची आग ही स्त्रीच्याच हृदयात उत्पन्न होते. हर्षालीच्या बाबतीत सुद्धा असेच घडले होते. खरं तर हे प्रत्येक सासूचे कर्तव्य आहे की घरी येणाऱ्या सुनेला आईची कमी न भासू देणे. पण हुकूमत गाजवण्याच्या नादात आपणही आई आहोत हेच सासू विसरते. शेवटी हातपाय हालायचे बंद झाले की मग हेच त्रास परतफेड म्हणून काही सासूंच्या वाट्याला सुद्धा येतात. हीच नियती असते हे कोणाच्या लक्षात येत नाही आणि लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. परिणामी पश्चातापाशिवाय हाती काहीच उरत नाही. सुसंस्कारी हर्षाली सुद्धा आपल्या कर्तव्याला पुरेपूर जाणीव ठेऊन
म्हणूनच सरते शेवटी इतकंच ं वाटतंय की, स्त्री ने स्त्री ला प्रथम समजून घेतले पाहिजे तरच जग तुम्हाला समजून घेईल. स्त्रीने स्त्रीला मत्सराने किंवा द्वेष भावनेने न पाहता प्रेमाने समजून घेतले पाहिजे. तरच सुसंवाद घडून येईल आणि स्त्री जीवन सुकर होईल…