YUVRAJ PATIL

Others

3  

YUVRAJ PATIL

Others

प्रेमदूत

प्रेमदूत

4 mins
12K


    मुलांच्या परीक्षा संपून मे महिन्याची सुट्टी पडली होती. लगीनसराईचे दिवस सुरु झाले होते. कुसुमच्या घरात सर्वांची धावपळ सुरु होती. कारण तिला पाहण्यासाठी तिच्याच आवडीचे स्थळ येणार होते. कुसुम एक शांत आणि सुस्वभावी मुलगी होती. शिक्षिका म्हणून सातारा जिल्हयात नोकरी करत होती. तिचा दोन वर्षे शिक्षणसेवक कालावधी संपून शेवटचे तिसरे वर्ष सुरु होते. लग्नासाठी पाहुणे व शेजारी यांच्याकडून वेगवेगळी स्थळे येत होती. पण वडिलांची इच्छा होती की, कुसुमचा शिक्षणसेवक कालावधी संपल्यावर मगच तिचे लग्न करायचे. कारण कुसुम सर्वात मोठी होती. तिच्या पाठीवर तीन बहिणी आणि एक भाऊ होता. वडिलांची दीड एकर शेती होती. आर्थिक परिस्थिती बेताची होती. तरीही तिचे वडील मुलींनी खूप चांगले शिकावे यासाठी झटत होते. कुसुम नोकरीला लागल्यामुळे घरी बऱ्यापैकी तिची आर्थिक मदत होत होती. 

     तिला लग्नाची मागणी घालण्यासाठी येणारा केदार हा सुध्दा सातारा जिल्हयात उपशिक्षक म्हणून नोकरीला होता. पाच दिवसाच्या इंग्रजी प्रशिक्षणामध्ये केदारने कुसुमला पहिले होते. त्याला कुसुम ही आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे समजले होते. त्याने आपल्या केंद्रातील जोशी बाईंच्या कडून कुसुमची माहिती विचारून लग्नाबाबत विचारले. कुसुमला पाहताक्षणीच तो तिच्या प्रेमात पडला होता. कुसुम आपल्याच जिल्ह्यातील असल्यामुळे खडा टाकून बघायला काय हरकत आहे, असे केदारला वाटले. उंच,देखणा,उत्तम इंग्रजी बोलणारा केदार प्रशिक्षणामध्ये कुसुमलाही आवडला होता. जोशी बाईंकडून केदारने आपला बायोडाटा कुसुमला दिला. तिचाही बायोडाटा घेतला. 

प्रशिक्षणाचा पाचवा म्हणजेच शेवटचा दिवस संपला. कुसुमने त्या संध्याकाळी बायोडाटावरील माहितीवरून केदारच्या मोबाईलवर फोन केला आणि सांगितले. “तुम्ही माझ्या घरी लग्नाची मागणी घाला. कारण घरच्यांच्या निर्णयावरच माझे लग्न ठरेल.” त्यानंतर दोघे एकमेकांना फोन करू लागले. फोनवरून दोघांचा संवाद वाढत गेला. एकमेकांच्या आवडीनिवडी जुळू लागल्या. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. केदारने रितसर आपल्या घरी लग्नाची मागणी घालावी असे मात्र कुसुम सारखं केदारला सांगत होती. सुट्टीला घरी आल्यावर दोघांनीही आपआपल्या घरी एकमेकांबद्दल सांगितले होते. लग्नाची बोलणी करण्याचे ठरले. केदार कुसुमला रितसर मागणी घालण्यासाठी तिच्या घरी येणार होता. त्यामुळे कुसुम आनंदात होती. केदारच्या घरची सर्व मंडळी येऊन कुसुमला बघून गेली. त्यांनी होकार कळवला होता. त्यामुळे कुसुम व केदार दोघेही खूप आनंदात होते.

त्यानंतर दोन दिवसांनी कुसुमच्या घरची माणसे केदारचे घर बघण्यासाठी व बोलणी करण्यासाठी आली. पाहुण्यांनी घर ,शेती सगळे पाहून घेतले. चहापानानंतर बैठक बसली. लग्नाबाबत बोलणी सुरु झाली. चार -दोन गोष्टी बोलून झाल्या असतील नसतील आणि कुसुमच्या चुलत्याने एक प्रस्ताव टाकला. “लग्नानंतर कुसुमचा तीन वर्षांचा पगार तिने वडिलांना द्यावा.” ही गोष्ट केदारच्या घरच्यांसाठी थोडी नवीनच होती. या गोष्टीवर बराच वादविवाद झाला. आणि जणू ठरल्याप्रमाणे वाटणारे लग्न मोडले.

कुसुम व केदारच्या मनाची अवस्था दुभंगल्यासारखी झाली होती. त्यांच्यातील प्रेमाचे नाते इतके घट्ट झाले होते की, दोघे एकमेकांशिवाय जगू शकणार नाहीत अशी स्थिती निर्माण झाली होती. केदार कुसुमला फोन लावण्याचा प्रयत्न करत होता. पण सलग पाच दिवस तिचा मोबाईल बंद लागत होता. तिला केदारशी होणारे लग्न मोडल्यामुळे धक्काच बसला होता. केदारच्या घरच्यांना कुसुमकडच्या माणसांनी हेकेखोरपणा केला असे वाटत होते. घरच्यांना कसे समजवावे हे केदारला कळत नव्हते. त्यामुळे तो मूग गिळून गप्प होता. कुसुमचा फोन लागत नसल्यामुळे तो एकांतात जाऊन रडून मोकळा होत होता.

आणि एक दिवस कुसुमचा फोन लागला. कुसुमचा आवाज ओढल्यासारखा झाला होता. ती हळू आवाजात बोलत होती. “मी लग्नानंतर स्वतःच्या वडिलांना मदत केली म्हणून काय बिघडले? त्यांनी खूप कष्टातून मला शिकवलंय. माझ्या बहिणींना शिकवत आहेत. त्यांच्याही काही अपेक्षा असतीलच ना.”

केदार म्हणाला, “अग्ग..पण लग्नानंतर मुलीने बापाकडे पगार द्यायचा म्हणजे समाजातले लोक काय म्हणतील असं माझ्या घरच्यांना वाटणं साहजिकच आहे.”

कुसुम थोडं रागातच बोलत होती. “काय झालं एखाद्याला मदत केली म्हणून. माझ्या वडिलांनाही वाटत असेलच की,आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी कुणापुढे हात पसरायला लागू नयेत म्हणून.”

केदार म्हणाला , “कुसुम तुला असं वाटतंय का ...की मी तुझ्या पगारासाठी तुझ्याबरोबर लग्न करतोय ?

कुसुम थंड स्वरात म्हणाली, “नाही”

केदार भावनाविवश होऊन बोलत होता, “ कुसुम तुला माहीत आहे मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार! बोल.. मी काय करू?

कुसुम म्हणाली, “मी माझ्या मामांबरोबर बोललेय. ते बाबांना समजावून सांगतील. बाबांची अटही हेकेखोरपणाची आहे असं तेही म्हणत होते.

कुसुमने केदारला आपल्या दिलीप मामांचा मोबाईल नंबर दिला. केदारने घरच्यांना समजावलं. कुसुमच्या मामाला मध्यस्थी करायला सांगितली. मामाने कुसुमचा दोन वर्षांचा पगार वडिलांना देण्याचा सुवर्णमध्य साधत पुन्हा समेट घडवून आणली. दोन्ही बाजूंची मंडळी बोलावून नव्याने बोलणी केली. आणि त्याच दिवशी कुसुम आणि केदार यांचा साखरपुडा पार पाडला. दोन जीवांची होणारी ताटातूट थांबली होती. कुसुम आणि केदारच्या प्रेमाला न्याय देण्याचे काम कुसुमच्या मामानी केले होते. साखरपुड्यात कुसुम व केदार सर्वांना नमस्कार करू लागले. त्यांनी मामाच्या पायावर डोके टेकून नमस्कार केला. कुसुम ,केदार आणि मामाचेही डोळे त्यावेळी पाणावले होते. कुसुम तर मामाच्या गळ्याला पडून हुंदके देऊन रडत होती. त्यांच्या रूपाने तिचे प्रेम यशस्वी करणारा जणू प्रेमदूतच तिला भेटला होता.



Rate this content
Log in