STORYMIRROR

Panditji Warade

Others

2.5  

Panditji Warade

Others

पंकज आणि ट्रॅक्टर

पंकज आणि ट्रॅक्टर

7 mins
957


  "आजोबा! खरंच काहो भूत, चकवा, हडळ, असं काही असतं?" समोर बसलेल्या लहान मुलांचा हा निरागस प्रश्न ऐकून सखाराम पंत थोडे चमकलेच. 


   त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत होत्या परंतु या छोट्या बालकांना कशा सांगायच्या? त्यातून ही शाळेत जाणारी बालके, तर्क वितर्क करत बसतील, नको ते प्रश्न देखील विचारतील. त्यांना समजेल असे आणि मनातील भीती निघून जाईल असंच सांगितले पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितले..... 


     "नाही रे पोरांनो, तसं काही नसतं. हां! एक मात्र नक्की! मनात जर भीती बसली तर मात्र भूत असल्या सारखं वाटतं." 


     "ते कसं काय? आम्हाला जरा सविस्तर सांगा ना." मुलांचा लाडिक आग्रह. 


    "सांगतो. पण लक्ष देऊन ऐकायचं आणि समजलं नाही तर विचारायचं. मात्र कुणीही घाबरायचं नाही. बरं का?" आणि असे म्हणून सांगायला सुरुवात केली.......


     खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. पंकजचे दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले, पुढे परिस्थितीमुळे शिकणे शक्य नव्हते. म्हणून 'नोकरी मिळाली तर बरे' म्हणून खूप प्रयत्न केले. परंतु नोकरी मिळणे दुरापास्त होते. सवर्ण कुटुंबातला गडी, इतरांच्या आरक्षणामुळे सवर्णांसाठी जागा तशा कमीच शिल्लक रहायच्या. त्यातही ओळखी, वशिला, पैसा यामुळे पंकज सारख्या गरीब मुलाला नोकरी मिळणे म्हणजे दुर्लभ गोष्ट. खूप फिरला पंकज, खूप जोडे झिजवलेत, परंतु नोकरी काही मिळेना. शेतात काम करायचा पण तिथेही सर्वांचे भागत नव्हते. अर्धपोटी काम तरी करणार कसे? अगोदरच्या दोनचार वर्षांपूर्वीच्या दुष्काळाने सर्वजण होरपळलेले होते. त्यामुळे बरी परिस्थिती असलेले लोक सुद्धा हातचे राखून खर्च करत असत. छोटे मोठे काम स्वतःच करण्या कडे कल असायचा सर्वांचा. त्यामुळे गावातही फारसे काम मिळायचे नाही. पण पंकज खचला नाही, आला दिवस जसे जमेल तसा काढतच होता. 


    अशातच बाजूच्या गावात पाझर तलावाचे दुष्काळी काम सुरू झाले होते. तेथे ट्रॅक्टरमध्ये दगडं भरायचे काम मिळाले, त्याला खूप आनंद झाला. छोटेसे का होईना, काम मिळाले होते. तो आणि त्याचा समवयस्क मित्र, दोघे मिळून ट्रॅक्टरची ट्राली भरून द्यायची, जेवढ्या ट्रिप्स होतील त्यानुसार पैसे भेटायचे. अशक्त प्रकृती, परंतु तशाही स्थितीत पैशासाठी तो नेटाने रात्री उशिरापर्यंत काम करायचा, जास्त ट्रिप झाल्या तर जास्त पैसे मिळतील ही अपेक्षा. 


      एक दिवस खूप उशीरा पर्यंत ट्रॅक्टर भरायचे काम सुरू होते. सर्वजण काम आटोपून निघून गेलेले. ट्रॅक्टर ड्रायव्हर आणि हे दोघेजण असे तिघेच त्या ठिकाणी उरले होते. ट्रॅक्टर ड्रायव्हर सुद्धा यांच्याच वयाचा, त्याचे लग्न जवळ आलेले, म्हणून तो दुसऱ्या दिवसापासून रजेवर जाणार असल्या मुळे होईल तेवढे काम आज उशिरा पर्यंत उरकून घ्यायचे, असे ठरले होते. अंधार वाढला होता. ट्रॅक्टरच्या हेडलाईटच्या उजेडात रात्री उशिरा पर्यंत काम सुरूच होते. दोघेही मित्र खूप थकले होते, भूकही खूप लागली होती, पोटात कावळे ओरडत होते, दगड उचलणे जड झाले होते. कसे तरी ट्रॅक्टर भरून झाले होते आता निघायचेच होते. आणि अचानक........


      दूर कुठे तरी बालकाचा रडण्याचा आवाज आला, पंकजने मित्राला सांगितले. त्याने कान देऊन तो आवाज ऐकला परंतु त्याला बाळाचा नाही तर घुबडाचा आवाज आला ट्रॅक्टर ड्रायव्हरला तर दुसराच कसला तरी विचित्र आवाज आला होता. दुपारी कुणी तरी, 'आज अमावस्या आहे' म्हणून सांगितलेले आठवले. 'जास्त वेळ थांबू नका' म्हणून अनुभवी वयस्कर लोकांनी सांगितले सुद्धा होते. पण असे कुठे असते का? अमावस्या काय अन पौर्णिमा काय? सारे दिवस सारखेच. त्यात काय घाबरायचे? असे म्हणून हे तिघेजण थांबले होते. पण आताचा हा विचित्र प्रकार बघून त्यांना मनातून भीती वाटायला लागली होती. आहे ती ट्रिप पूर्ण करायची अन् काम बंद करायचे असे तिघांच्याही मनात आले, पण एक दुसऱ्याला सांगायचे कसे? असे म्हणून फक्त एकमेकांकडे पहात होते. तेवढ्यात दुरवर दहा बारा मशाली त्यांच्याच दिशेने येतांना दिसल्या. मग मात्र तिघांचीही भीतीने गाळण उडाली. काय करावे? कुठे जावे? या विचारात त्यांना काही सुचेनासे झाले. त्या मशाली जवळ येतांना दिसल्या, आता मात्र आपण धोक्यात आहोत, लवकर पळायला पाहिजे असा विचार करून ड्राइवरने ट्रॅक्टरचा वेग वाढवला, तो जोरात पळवायला लागला. 


    ट्रॅक्टर वेगाने पळत होते. ट्रॅक्टरच्या टायरने खालची वाळूमिश्रित माती जोराने उडून या तिघांच्याही पाठीत लागत होती. ड्रायव्हरच्या पाठीत जेव्हा खडा लागला तेव्हा त्याने वेग आणखीच वाढवला. खड्डे, दगड गोटे, काही म्हणता काहीच न पाहता तो ट्रॅक्टर पळवत होता. आदळून आदळून या दोघांचे कंबरडे ढिले झाले होते. मात्र थांबायची इच्छा कुणाचीच नव्हती. तिघांचेही डोके जणू सुन्न झाले होते, कुणीच कुणाशी बोलत नव्हते. येथून लवकरात लवकर सुटका व्हावी हा एकच विचार तेव्हा तिघांच्याही डोक्यात घोळत होता. तीन तास झाले होते, ते चालत होते. पण अजूनही कुणी मागे वळून बघायची हिंमत करत नव्हते. आणि एकाएकी ट्रॅक्टर बंद पडले.


     "काय झालं?" दोघांच्याही तोंडून एकदमच प्रश्न बाहेर पडला. 


     "बघतो काय झालं ते." असं म्हणत ड्रायव्हर खाली उतरला, या दोघांनी भीत भीतच मागे फिरून बघितले, मागे त्या मशाली दिसत नव्हत्या. ड्रायव्हरला काही मदत करता आली तर करावी, अशा हेतूने दोघेही खाली उतरले आणि तेवढ्यात काहीही न करता ट्रॅक्टर आपोआप सुरू झाले आणि ड्राइवर शिवाय पळायला लागले. हे तिघेही त्याच्या मागे पळत होते. मशीन आणि माणसाची बरोबरी थोडीच होणार? ट्रॅक्टर खूप दूरवर पळत गेले. बरे झाले रात्र होती, रस्त्यावर कुणी नव्हते, नाहीतर किती बळी गेले असते कुणास ठाऊक? हे तिघे पळून दमले, हताश पणे ट्रॅक्टर कुठवर जातो हे बघत ते तिथेच थांबले. आणि काय आश्चर्य! हे थांबताच ट्रॅक्टरही थांबले. 'बरे झाले थांबले, चला बघूया.' म्हणून ते चालायला लागले तसे ते ट्रॅक्टरही पळायला लागले. आता मात्र त्यांच्या हाता पाया मधले होते नव्हते बळ संपले होते. ते थांबले तसे ट्रॅक्टर परत फिरले आणि त्यांच्याकडे यायला लागले. अन् हे काय? कुणीतरी ते चालवत आणत होते. कुणीतरी ड्रायवर होता त्यावर, मात्र त्याने चेहरा पूर्णपणे झाकलेल

ा होता. ट्रॅक्टर जवळ आले आणि तसेच मागे तलावाकडे पळाले. आता मात्र पहात बसण्यावाचून काही पर्याय नव्हता. ट्रॅक्टर पुन्हा पहिल्या जागे कडे कुणीतरी घेऊन गेले होते. 'कोण होते ते?'.....


      तिघेही खूप घाबरले होते. काय करावे? त्यांना काही म्हणता काही सुचत नव्हते. रात्र खूप झाली होती, दिवस भराच्या कामाचा थकवा, झालेल्या प्रकाराने डोक्याला झालेला ताप. या साऱ्यांमुळे तिघेही गलितगात्र झाले होते. जे काही व्हायचे ते होवो, आता इथेच झोपायचे असे ठरवून ते तिघेही तिथेच झोपी गेले. 


     सकाळी तिघेही झोपेतून उठले, तेव्हा ते आणखीच आश्चर्यचकित झाले कारण ते जिथे झोपले होते ती जागा म्हणजे त्यांची ट्रॅक्टर भरण्याची नेहमीची जागा होती आणि त्यांचे ट्रॅक्टर भरलेल्या ट्राली सहित शेजारी उभे होते. त्यांना हे कळेना की, 'रात्री जे अनुभवले ते खरे? की आता जे पहात आहोत ते खरे?' त्यांनी तिथे आलेल्या वाचमनला विचारले तेव्हा त्याने जे सांगितले ते ऐकून हे तिघेही खूप घाबरले. 


      वाचमनने सांगितले, " अमावस्या पौर्णिमेला अशा घटना घडत असतात, आणि ज्याच्या राशीला असतात त्यांनाच दिसतात. काल अमावस्या होती."


      मात्र या तिघांनी त्या दिवसा पासून भीतीने त्या ठिकाणी काम करणेच सोडून दिले. बाकीचेही लोक अमावस्या पौर्णिमेला लवकर घरी जाऊ लागले आणि संधीसाधूंचे आयतेच फावले. त्या ठिकाणचे काही सामान नियमितपणे गायब होत राहिले. 


     "पण आजोबा, हे सारे कसे घडले? हा काय प्रकार होता?" मुलांनी एकदम विचारले. 


     "अरे, बरेच दिवस हा सारा भुताटकीचाच प्रकार आहे, असे सर्वांना वाटत होते. सर्वत्र हीच चर्चा होती." 


     "आजोबा, तुम्ही तर सांगता की असं काही नसतं, मग हे कसं काय?"


     "अरे, हा सुद्धा सारा बनवाबनवीचाच प्रकार होता, आणि त्यात त्या वाचमनचाही हात होता, हे नंतर उघड सुद्धा झालं."


     "ते कसं काय?"


     "त्याचं काय झालं? त्या ठिकाणी दर पंधरा दिवसाला काही ना काही सामान गायब होत राहिलं, तिथल्या अधिकाऱ्याला संशय येऊ लागला. त्याने त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला कळवले. शेवटी हा त्याच्या जबाबदारीचा प्रसन्न होता ना."


      "मग पुढे काय झालं?" मुलांच्या प्रश्नानंतर सखाराम पंतांनी सांगितलेली गोष्ट अशी.......


      त्या अधिकाऱ्याने खाजगी डिटेक्टिव्ह एजन्सीची मदत घ्यायचे ठरवले. आणि एका एजन्सीला ते काम देण्यातही आले. एक दिवस एकदम दुष्काळी भागातले, कळकट मळकट कपड्यातले चार जण कामासाठी त्या ठिकाणी आले. 


      हे चारही माणसं रोज लवकर कामाला लागायचे आणि लवकर काम संपवून घरी जायचे. घर म्हणजे तरी काय एक छोटेसे झोपडे, तेही गावाच्या बाहेर आणि तलावा पासून थोडेसे दूर. झोपडीत यायचे, स्वयंपाक करायचा, खायचं, अन् झोपी जायचं. असं त्यांचा नित्यक्रम चालायचा. 


      अशातच पौर्णिमा आली, नेहमी प्रमाणे आज सर्वजण लवकर काम आटोपून घरी गेले. हे चार जणही झोपडीत जाऊन स्वयंपाक करून, जेवण करून झोपले. त्यांच्या झोपडीतून तलावा कडचे सारे काही दिसत होते. ते मात्र कुणालाही जागे असलेले दिसत नव्हते. 


      त्यांनी बघितले, उत्तर रात्री काही माणसे तलावाकडे आलेत, चहूकडे नजर टाकली आणि एका छोट्या गाडीत सामान टाकायला लागले त्या गाडीला चारपाच जागी पेटत्या मशाली बांधलेल्या होत्या, ज्यांचा उपयोग रात्री भीती दाखवण्या साठी आणि गाडीत सामान भरण्या साठी उपयोग होत होता. या चौकडीने हे सारे बघितले, एका दूरस्थ कॅमेऱ्याने ते दृश्य टिपले आणि वरच्या बॉस कडे पाठवून दिले. 


      कुणाला काही संशय येऊ नये म्हणून ही चौकडी आणखी काही दिवस कामावर होती. 


      एक दिवस ही चौकडी काम सोडून निघून गेली अन दुसऱ्याच दिवशी तो वॉचमन आणि त्याला मदत करणारे पाच सहा जण पोलिसांनी पकडून नेले. 


      चौकशीत त्यांनी गुन्हा कबूल करून त्यांची कार्य पद्धती सांगितली. त्यांच्याकडे एक छोटा हत्ती गाडी होती जी कधीच तलावाकडे फिरकायची नाही. ती बाजूच्या एका गावात ठेवलेली असायची आणि फक्त अमावस्या पौर्णिमेच्या रात्रीच तलावा कडे यायची. त्या गाडीला मशाली बांधलेल्या असायच्या ज्या तलावाच्या जवळ आल्यावर पेटवल्या जायच्या. त्या गाडीत एक कॅसेट सापडली जिच्या मध्ये घुबडाचा, बालकाच्या रडण्याचा, इतर भीतीदायक चित्रविचित्र आवाज भरलेले होते. भीतीमुळे तो सारा परिसर निर्मनुष्य असायचा. त्यामुळे त्यांचे काम बिनबोभाट पार पडायचे. सकाळी पुन्हा वॉचमन, 'रात्री मशाली बघितल्याचे आणि त्याला चकव्याने फिरवल्याचे सांगायचा. अमावस्या पौर्णिमेलाच हे होत असल्याने सर्वांचा त्यावर विश्वासही बसायचा. 


       "आजोबा, पण त्या दिवशी ते ट्रॅक्टर कुणी तरी चालवले असे तुम्हीच सांगितलेत. मग ते कुणी तरी कोण होते?" मुलांचा प्रश्न.


      "अरे, तो वॉचमनच काळा झबला घालून, आणि तोंडावर काळा बुरखा घेऊन ट्रॅक्टर घेऊन फिरवत होता, की ज्यामुळे ते तिघे घाबरावेत. आणि त्यात तो यशस्वी देखील झाला होता." सखाराम पंत.


     "पण मग ते ट्रॅक्टर खूप फिरून सुद्धा जागेवरच कसे?" मुलांचा प्रश्न.


     "त्याने तर ट्रॅक्टर गोल गोल फिरवले आणि त्याच्या मागे ते तिघेही फिरून पुन्हा त्याच जागी आले. परंतु भीती मुळे त्या तिघांना ते समजलेच नाही." सखाराम पंतांनी खुलासा केला. 


     "म्हणून म्हणतो मुलांनो, कधीही अशा कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्या अगोदर आपली बुद्धी वरून खात्री करूनच घ्यावी आणि मगच विश्वास ठेवावा हे बरे. नाही का?"


Rate this content
Log in