पंढरीची वारी एक चालते बोलते विद्यापीठ
पंढरीची वारी एक चालते बोलते विद्यापीठ
होईन भिकारी । पंढरीचा वारकरी" असे संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलेच आहे. खरोखर तेवढी श्रेष्ठ भक्ती आपल्याला कधी जमेल का हो? नाहीच कधी जमणार पण महाराष्ट्राला लाभलेली हि संत परंपरा खरोखर महाराष्ट्राला समृद्ध करणारी आहे. संतांनी केलेली भक्ती जशी श्रेष्ठ तशीच अजून एक परंपरा जी शेकडो वर्षांपासून म्हणजेच संताच्याही आधीच्या काळापासून महाराष्ट्रात सुरु आहे आणि ती म्हणजे आषाढीची वारी. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आजोबांनी वडिलांनी सुरु केलेली हि वारीची परंपरा आजतागायत तशीच चालू आहे. आषाढीची वारी म्हणजे अचूक नियोजन अन शिस्तबद्ध पद्धतीने चालणारा दिमाखदार असा हा सोहळा जणू जगातील एक चालते बोलते विद्यापीठच आहे असे वाटते.
दर वर्षी उन्हाळा संपून पावसाळा सुरु झाला कि सगळ्यांना वेध लागतात ते आषाढी वारीचे जेष्ठ वद्य सप्तमी ला सुरु होणारा हा सोहळा आषाढ शुद्ध एकदशीला संपतो. तब्बल २० दिवस चालणारा हा दिमाखदार अन अदभूत असा सोहळा व्यवस्थापनचे जणू उत्तम विद्यापीठच आहे. शिस्तीत चालणाऱ्या दिंड्या टाळ मृदंगाच्या तालावर विठू माऊलीच्या गजरात ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात चालणारे वारकरी बंधू आणि त्याच जल्लोषात डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालणाऱ्या वारकरी भगिनी बघितल्या कि एकच म्हणावेसे वाटते ,
विसरले तहानभूक
जमला वारकऱ्यांचा मेळा
पांडुरंगाच्या भक्तीचा
लागलासे लळा
वारकरी निघाले वारीला
घेऊन टाळ अन मृदंग
जल्लोषात वारी चालली
ध्यानीमनी रंगला श्रीरंग
अश्या ह्या भक्तिमय वातावरणात अन शिस्तबद्ध पद्धतीने चाललेली हि वारी म्हणजे सामाजिक एकात्मतेचं एक प्रतीकच आहे.संत ज्ञानदेव, संत तुकाराम या दोन प्रमुख पालख्या तसेच इतरही अनेक संतांच्या पालख्या अतिशय शिस्तीत चालतात. संत तुकाराम महाराजांचे कनिष्ट पुत्र नारायण महाराज यांनी तुकारामांच्या निधनानंतर वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले.आजही ती परंपरा त्याच सुंदर पद्धतीनं साजरी केली जाते. वारीचे प्रमुख आकर्षण असलेला रिंगण सोहळा म्हणजे अदभूत सुंदरतेचे अन जगातील सर्व नृत्याविष्कार फिके पडतील अश्या पारंपरिक टाळ मृदंगाच्या तालावर रंगणारा सोहळा न अनुभवाला तर नवलच. लहान थोर राव रंक असा सर्व भेद विसरून दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथ कर माझे जुळती या उक्तीप्रमाणे माउली माउली म्हणून एकमेकांचे पाया पडण्याची अतिशय सुंदर पद्धत आपल्याला वारीतच पहायला मिळते प्रत्येकाच्या हृदयातील देवाला नमस्कार करताच मीपण क्षणात गाळून पडतो. समाजातील सर्व भेदभाव विसरून समाजातील सर्व घटक एकत्र येऊन साजरा करत असलेला हा अदभूत अन नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा एकदा अनुभवायलाच हवा. त्या मायबाप विठ्ठलाच्या नियोजनात चाललेली अन विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने उन वारा पाऊस ह्याची तमा ना बाळगता पाऊले न थकता पंढरीची वाट चालतच राहतात. धन्य ती वारी अन धन्य ते वारकरी.
।। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय ।।
