STORYMIRROR

Anjana Karnik

Others

3  

Anjana Karnik

Others

पहिला पाऊस

पहिला पाऊस

2 mins
206

तापल्या उन्हाच्या झळात 

ओल्या मातीच्या

वासात

दाटल्या कृष्ण

मेघात

आला पाऊस

वेगात

मोती तिच्या

बटात

अधीरता दाटे

मनात

भिजावे वाटे

पावसात 


घामाच्या धारा ,पाण्याची चणचण, धुळीच रिंगण, भेगळली भुई असं सारं काही नको नको झालं असतानाच एकाएकी हवा, नभ, दिशा सारच कुंद व्हायचं. मळभ दाटतंय असं वाटू

लागतानाच गार वारं पावसाच्या आगमनाची तार छेडायच. मधेच आकाशात ढोल वाजायचा आणि दाटल्या काळोखावर शुभ्र धारांचे सपकारे मारत पाऊस धरतीला सलामी द्यायला यायचा.

अगदी पंचांग वा कॅलेंडर पाहून यावा तसा इमाने इतबारे पाच वा सात जूनला शाळेच्या पहिल्या दिवशी पाऊस हजेरी लावायचाच!


टप टप करत छपरावर त्याची वाजंत्री वाजू लागायची आणि मग काही वेळातच धारांचा ताशा सुरु व्हायचा.


प्रियकराच्या पहिल्या स्पर्शाने सखी जशी रोमांचित होते, फुलारते तसा भुईचा कण न कण रोमांचित व्हायचा त्या पहिल्या पावसाने! मग तिच्यातून मृदगन्ध दरवळू लागे. चंदनाला मागे टाकणारा तो सुगंध दीर्घ श्वास घेत छातीत भरून घ्यावासा वाटायचा. अवघ्या सृष्टीच रुपच एकदम तजेलदार दिसू लागायचं.


पहिल्या पावसाच्या धारा अंगावर घ्यायला आम्ही बच्चे कंपनी तर धावायचोच पण मोठी माणसं देखील अंगणात यायची. आई,आजी काकू खिडकीतून हात बाहेर काढत पाऊस ओंजळीत घ्यायच्या.

आणि माणसच कशाला अगदी तापल्या भुईतले किडे देखील टण टण उडत ओल्या पानांवर बसायचे, पावसाचे गोल  किडे इथे तिथे ओल्या धुळीत लोळायचे. झाडां झाडावर ओल्या पानावर पावसाचे थेंब मजेदार नक्षी काढायचे. झाडावरून पक्षी जमिनीवरच्या खळग्यात साचलेल्या पाण्यात चक्क पंख फिस्कारून आंघोळ करताना दिसायचे. किती गंम्मत वाटायची त्यांची ती आंघोळ बघताना. पावसाच्या जरा आधी गिळगीळीत अंगाची दुतोंडी लाल गांडूळ देखील जमिनीतून बाहेर येऊन भीतीवर चढताना दिसायची.


पहिला पाऊस मग स्थिराऊ लागायचा. रेनकोट छत्र्या बाहेर यायच्या. शाळेच्या वह्या पुस्तकांच्या खरेदी बरोबरच पावसाच्या दिवसात घालायच्या प्लास्टिकच्या बूट चपलांची खरेदी व्हायची.


गावाकडेही पाऊस पडू लागल्याची खबर आजोबांकडून यायची. आणि त्याच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू इकडे

शहरात राहून आम्हाला दिसायचं. पेरणीची गडबड नजरेसमोर दिसायची. आणि मग डोळे आणि मन लागायचं ते एका मागोमाग एक येणाऱ्या सणाच्या दिवसाकडे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi story from Anjana Karnik