फेरफटका
फेरफटका
सूर्य मावळायला अजून थोडा वेळ आहे. पुस्तक वाचून वाचून कंटाळा आलाय. मी उठलो हात-पाय ताणुन आळस दिला. थोडावेळ डोळ्यासमोर अंधारी आली. पापण्यांची हळूवार उघडझाप करून डोळ्यांवरचा ताण कमी केला.आज थोडं अस्वस्थच वाटत होतं. याला कारण होतंच असं नाही. आई आत्ताच कामावरून आली होती तिला चहा करायला सांगितला व मी घराबाहेर आलो. समोरच्या बादलीतील पाणी तोंडावर शिंपडले. गार पाण्यामुळे थोडेसे बरे वाटले. घरात येऊन चहा घेतला. चहामुळे तरतरी आली. आईला सांगून घराबाहेर पडलो. काय करावं याचा विचार न करता वाटेवरून फक्त चालत राहीलो. एका घरासमोर येऊन थांबलो.
तिथे एक बाई एका लहान वासराला दूध पिण्यासाठी सोडत होती.ते इवलसं वासरू गाईच्या दिशेने ओढ काढत होतं. त्याचा जीव अगदी कासावीस झाला होता.गाय सुद्धा त्याच्याकडे पाहून मान हलवत होती ...ते वासरू किती सुंदर. त्याचे पांढरेशुभ्र शरीर, त्याचे गोंडेदार शेपूट ,कोवळ्या नाकावरील घामाचे थेंब , वाकडी चाल , आकर्षक व गरीब डोळे ,एकूण सगळंच.... ते गाईच्या स्तनांना धक्के मारत-मारत दूध पिऊ लागले. ते दृश्य जीवाला किती आराम देणार होतं. ती गाय तिच्या पिलाला किती प्रेमाने चाटतेय , ते वासरू किती समाधानानं दूध पीत आहे. ते दृश्य पाहून उगाच एक वेळ असं वाटलं की संपूर्ण जग तृप्त झालंय. पण क्षणात कुठल्या कुठे.त्या बाईने वासराला लगेच बाजूला नेऊन बांधले . ती धार काढू लागली. मला खूप राग आला. वाटले कि त्या बाईला जाऊन बोलावे की हे तुझे आजच्या दुधाचे पैसे घे पण त्या वासराला सगळे दूध पिऊ दे. पण ते तेवढ्या पुरतेच. तसेही खिशात पैसे कुठे? झालं.... मी तसाच पुढे चालत चालत गेलो. पुढे एक तरुण गृहिणी घरचा ओटा झाडत होती. झाडता झाडता तिचे लक्ष माझ्यावर आले व तिने क्षणात तिचा पदर सावरला. तोंडावरचा घाम पुसून खाली वाकून घर झाडू लागली. मी तिच्याकडे न पाहिल्यासारखं दाखवून पुढे निघून गेलो.
पुढे दोन इसम बोलत उभे होते. त्यातल्या एकाने माझ्याकडून दोनशे रुपये उसणे म्हणून घेतले होते. ठरलेली तारीख उलटून गेली होती तरीही त्याने पैसे देण्याचे नाव काढले नव्हते. यावेळी माझ्याशी पुसट अशी ओळख दाखवत त्याने छोटसं स्मित केलं. मी त्याला हसून प्रत्युत्तर देण्या ऐवजी फक्त मान हलवली. व मी पुढे .हा उगाच दिसला. सगळा मूड खराब. छे...
काल पाऊस पडला होता त्यामुळे रस्त्यावर चिखल खूप झाला होता. एका ठिकाणी तर वाहनामुळे खूपच रेंदा झाला होता. समोरून एक मुलगा सायकलीवरून येत होता. रस्त्यातील चिखल वाचवत वाचवत तो सायकल चालवत होता. एका ठिकाणी त्याने रस्ता सोडून रस्त्याकडेच्या बांधावरून सायकल घेण्याचा प्रयत्न केला पण तिरप्या भागावरून चाक घसरले व तो रस्त्यावरच्या पाण्यात जोरात आदळला. मी पटकन जावून त्याला उभा केले. तो घाबरलेल्या स्थितीतच हसायला लागला.त्याचे सर्व कपडे चिखलामुळे खराब झाले. मी म्हणालो अरे जरा जपून. तो म्हणाला जपूनच होतो पण चिखलाने घोटाळा केला. मी सावकाश जा असं म्हणालो व त्याच्याकडे बघत बघत चालू लागलो.
समोर लक्ष नसल्यामुळे माझा पाय घसरला. माझा तोल गेला पण पडण्यापासून थोडक्यात बचावलो. तो मुलगा बैलाला आवरताना म्हणतात तसा हो! हो! असं म्हणाला. दोघेही एकमेकांकडे पाहुन हसलो. तो निघून चालला . मी त्या पोरा कडे पाहत होतो .तो आता फारच वेगाने सायकल मारत होता , मुद्दाम पाण्यावरून, चिखलावरून ब्रेक मारून सायकल घसरवत होता, पाणी उडवत होता , आनंद घेत होता . त्याला आता पडण्याची भीती नव्हती.
खरंतर आज आबा हवे होते. आज त्यांची खूप आठवण येतेय. तशी रोजच येते. एकूलता असल्यामुळे त्यांनी मला प्रेमाने वाढवले. पण फालतू लाड नाही. चूक ते चूकच. रोज झोपताना माझ्या डोक्यावरून हात फिरवत एकच गोष्ट सांगायचे. व तीच वाढवत वाढवत पुढे. ती गोष्ट म्हणजे आजकालच्या मालिकांप्रमाणे असायची. अगोदरच्या रात्री गोष्ट जिथे थांबते ते मी लक्षात ठेवायचो.व पुढच्या रात्री गोष्ट तिथून पुढे चालू. त्या गोष्टींमध्ये सुसूत्रता नव्हती, तर्क नव्हता. कधीही कुठेही काहीही घडत असे. उदाहरणार्थ एकदा शंकर-पार्वती चालत चालले होते. चालत असताना पार्वतीच्या पायात काटा मोडतो. खूप रक्त वाहू लागते. शंकराला काही सुचेना. पार्वती जोराने ओरडू लागते. तेवढ्यात शंकराला समोर टिकाव पडलेला दिसतो. शंकर त्या टिकावाने काटा काढतो. मी खूप संभ्रमात पडायचो. मला ते पटायचं नाही. मी हे असं कुठं असतं का असं विचारायचो. मग आबा हसून म्हणायचे आमच्या गोष्टीत असंच असतं तुला ऐकायची असेल तर ऐक नसेल तर राहिलं. मग मी म्हणायचो मला चालते असली गोष्ट पुढे सांगा..
रोज सकाळी मी आणि आबा एकत्र आंघोळ करायचो ते मला जोर-जोरात चोळून आंघोळ घालायचे. काय दिवस होते ते. त्या अंघोळीची बरोबरी गंगास्नान ही करू शकणार नाही. आई-आबांनी मला लहानाचा मोठा केला. आबा शिकलेले नव्हते तरी त्यांना शिक्षणाचे महत्त्व माहीत होते. त्यांनी माझ्या शिक्षणात काहीही कमी पडू दिले नाही. मी ही मन लावून शिकलो. आज मला ते हवे होते. त्यांची खूप सेवा करायची होती. त्यांचे उरलेले दिवस सुखात घालवायचे होते. माझ्यासाठी त्यांनी किती कष्ट केलं. ही माझी वेळ होती. त्यांची सेवा करण्याची. सेवेत किती मोठ समाधान असतं. पण ते माझ्या नशिबातच नव्हतं... आबा वारले....
विचारांच्या तंद्रीत माणूस किती जोरात चालतो. आता अंधार पडलाय. सर्व घरांमध्ये चुली पेटल्या आहेत. सरा गाव भूकेजला आहे. आई तर आज खीर बनवणार आहे. या खिरीसाठी कितीतरी वेळा मी कॉलेज बुडवून घरी यायचो.
माझी देवावर श्रद्धा नाही पण देवळावर आहे. मी देव मानत नाही पण मला देऊळ आवडतं. देवळातील वातावरण खूप प्रसन्न असतं . मंदिरात प्रवेश करताना लोक मनातील राग, द्वेष ,लोभ ,सर्व वाईट भाव चपलांप्रमाणे बाहेरच सोडून येतात. मंदिरात येणाऱ्या लोकांमध्ये एकप्रकारचे तेज असते , आशा असते, समाधान असते .यामुळे सर्व वातावरण प्रसन्न व सकारात्मक होतं.
मी चालत चालत गावा मागच्या टेकडीवरच्या देवळाजवळ बसलोय. गावात एकूण तीन देवळे आहेत पण मला हे देऊळ खूप आवडतं. हे एका छोट्याशा टेकडीवर असलेलं छोटंसं देउळ आहे. हे बऱ्याचदा निर्मनुष्य असतं. आता सुद्धा इथे माझ्याशिवाय कोणीही नाही. मी शांत बसलोय. गार वारा सुटलाय. रातकिड्यांची किरकिर चालू झलीये. हा अंधार बरा वाटतोय. इथे फक्त मी आणि माझा एकांत आहे. एकांतात आपण स्वतःच्या किती जवळ येतो. स्वतः ला पूर्णपणे समजू शकतो. बऱ्याचश्या प्रश्नांची उत्तरे एकांतातच मिळतात. एकांत ही सुद्धा एक गरज आहे. खूप वेळ मी असाच शांत बसलोय. भुकेच्या जाणिवेनं मी परत घराच्या दिशेने चालू लागलो. आता मन शांत होते. गावासोबत मनाचाही फेरफटका झाला.
